एक हजार नागरिकांना आज ‘माझे घर’च्या सनदांचे वितरण

0
8

उत्तर गोव्यातील सुमारे 1 हजार नागरिकांना ‘माझे घर’ योजनेंतर्गत घराच्या मालकी हक्क प्रमाणपत्राचे (सनद) वितरण मंगळवार दि. 9 जून रोजी सकाळी 11 वाजता येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्य सरकारच्या माझे घर योजनेंतर्गत दक्षिण गोव्यातील लाभार्थ्यांना सुमारे 1 हजार सनदांचे वितरण नुकतेच वितरण करण्यात आले होते. आता, उत्तर गोव्यातील नागरिकांना माझे घर योजनेंतर्गत सनदांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात आणि उत्तर गोव्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिली.

माझे घर योजनेंतर्गत उत्तर गोव्यातून सादर केल्या जाणाऱ्या अर्जांची प्रत्येक आठवड्यात पडताळणी केली जात आहे. आत्तापर्यंत सुमारे 1 हजार अर्जांना मान्यता देण्यात आली असून, त्या नागरिकांना घराची सनद दिली जाणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या योजनेखाली अर्ज केलेल्या नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून आपल्या अर्जाबाबत चौकशी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.