– रामनाथ न. पै रायकर
हिंदी चित्रपटसृष्टीच्या रंगमहालात अनेक युगप्रवर्तक दिग्दर्शकांनी अत्तरदिवे लावून अगणित सिनेरसिकांचे आयुष्य सुगंधित करून ठेवले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात व्ही. शांताराम, बिमल रॉय, राज कपूर, मेहबूब खान, सोहराब मोदी, के. असिफ, गुरुदत्त यासारख्या दिग्गजांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा गडद ठसा उमटवून स्वतःच्या प्रतिभेचा अलौकिक आविष्कार सिद्ध केला. अशा या प्रज्ञावंत दिग्दर्शकांच्या मांदियाळीनंतर तयार झालेली दुसरी फळी केवळ चित्रपटांच्या आशयघनतेलाच एका उच्च पातळीवर नेऊन ठेवणारी नव्हती, तर चित्रपट निर्मितीमधील तंत्रातही प्रयोगशीलतेची चमक दाखवणारी आणि त्याद्वारे स्वतःच्या सर्जनशीलपणाचे दर्शन घडविणारी अशी होती. १९५५ ते १९७० या पंधरा वर्षांमधील हिंदी चित्रपटसृष्टीच्या संक्रमण कालखंडादरम्यान उदयास आलेल्या अशा दिग्दर्शकांमध्ये प्रामुख्याने विजय आनंद, नासिर हुसैन, शक्ती सामंत, राज खोसला, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई, यश चोप्रा आणि रमेश सिप्पी या धुरंधरांचा समावेश करावा लागेल.
विजय आनंदसारखा काळाच्या पुढे असलेला दिग्दर्शक ज्याप्रमाणे आपल्या सिनेतंत्रावरच्या हुकमतीमुळे जाणला जाऊ लागला, त्याचप्रमाणे यश चोप्रा यांना ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणजे प्रणयकथांवर आधारित चित्रपट निर्माण करण्यात हातखंडा असलेला दिग्दर्शक म्हणून कीर्ती मिळाली. पण यश चोप्रांचे कार्य हे सिनेरसिकांनी त्यांना दिलेल्या या किताबापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी गेल्या पाच दशकांहूनही अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानात अनेक पैलूंचा समावेश होता. उत्कृष्ट कथानके, अर्थपूर्ण गाणी, कर्णमधुर संगीत, नेत्रदीपक लोकेशन्स, कसदार अभिनय, दर्जेदार निर्मिती… एक ना दोन. शिवाय प्रणयकथांवर आधारलेल्या चित्रपटांइतकीच मारधाडवाल्या चित्रपटांवर पकड! यश चोप्रा यांच्या कर्तृत्वाचा आढावा घ्यायचा म्हटले तर आपल्याला काही दशके मागे भूतकाळात जाऊन तपशील शोधणे क्रमप्राप्त आहे.
यश चोप्रा यांचा फाळणीपूर्व भारतामध्ये लाहोर येथे २७ सप्टेंबर १९३२ साली एका भल्यामोठ्या पंजाबी कुटुंबात जन्म झाला. आठ भावंडांमधील सर्वात धाकटे अपत्य असलेल्या यशजींचे क्रमाने दुसरे असलेले बंधू म्हणजे बी. आर. तथा बलदेव राज चोप्रा. सुरुवातीला पत्रकारितेचा व्यवसाय पत्करलेल्या बी. आर. चोप्रा यांनी फाळणीनंतर मुंबईला जाऊन चित्रपटसृष्टीत आपला जम बसविला. याच घटनेने प्रेरित होऊन यश चोप्रा यांनी आपले लंडनमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याचे उद्दिष्ट पूर्णपणे दुर्लक्षिले व थेट मुंबईला चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळविला. सुरुवातीला चरित्र अभिनेता/लेखक/दिग्दर्शक आय. एस. जोहर यांच्याकडे चित्रपट दिग्दर्शनाचे धडे गिरविल्यानंतर त्यांनी आपले थोरले बंधू बी. आर. चोप्रा यांच्या छत्रछायेखाली चित्रपट प्रशिक्षणाला सुरुवात केली. ‘एक ही रस्ता’ (१९५६), ‘नया दौर’ (१९५७) आणि ‘साधना’ (१९५८) अशी बी. आर. फिल्म्सच्या झेंड्याखाली तयार झालेल्या तीन चित्रपटांमध्ये बी. आर. चोप्रांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिल्यानंतर यशजींना १९५९ साली ‘धुल का फुल’ या चित्रपटाचे स्वतंत्र दिग्दर्शन करण्याची संधी प्राप्त झाली. त्यानंतर ‘धर्मपुत्र’ (१९६१), ‘वक्त’ (१९६५), ‘आदमी और इन्सान’ (१९६९) आणि ‘इत्तफाक’ (१९६९) अशा इतर चार चित्रपटांचे बी. आर फिल्म्ससाठी दिग्दर्शन केल्यानंतर यशजींनी आपली वेगळी चूल थाटायचा निर्णय घेतला. लोकप्रिय कादंबरीकार गुलशन नंदा आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते/ वितरक गुलशन राय यांच्या पाठबळावर यशजींनी आपल्या यश राज फिल्म्स या बॅनरखाली राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि राखी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दाग’ या यशस्वी चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर गुलशन राय यांच्यासाठी ‘जोशिला’ (१९७३) व ‘दीवार’ (१९७५) या दोन, त्याचप्रमाणे स्वतः निर्मिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘कभी कभी’ (१९७६) अशा चित्रपटांनंतर यशजींनी इतर दिग्दर्शकांसाठी यश राज फिल्म्स बॅनरखाली चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला. सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते व यशजींचे मित्र मनमोहन कृष्ण यांनी दिग्दर्शित केलेला ‘नुरी’ (१९७९) त्याचप्रमाणे त्यांचा प्रमुख साहाय्यक दिग्दर्शक रमेश तलवार याने दिग्दर्शिलेले ‘दूसरा आदमी’ (१९७७) व ‘सवाल’ (१९८२) आणि आणखी एक साहाय्यक दिलीप नाईक याने दिग्दर्शित केलेला ‘नाखुदा’ (१९८१) हे असेच काही चित्रपट. त्यानंतर १९९३ साली प्रदर्शित झालेला ‘आइना’ आणि १९९४ सालचा ‘ये दिल्लगी’ हे चित्रपट यश राज फिल्म्ससाठी अनुक्रमे दीपक सरीन आणि नरेश मल्होत्रा या यशजींच्या साहाय्यकांनी दिग्दर्शित केले होते.
दरम्यान १९७९ साली गुलशन राय यांनी निर्मिलेल्या ‘त्रिशूल’ या अत्यंत यशस्वी चित्रपटाचे यशजींनी दिग्दर्शन केले. मात्र तद्नंतर त्यांचे ग्रहमान बदलले. ‘काला पत्थर’ (१९७९) या कोळशाच्या खाणीची पार्श्वभूमी असलेल्या संहारपटाची (डिझॅस्टर मूव्ही) निर्मिती- दिग्दर्शन करताना यशजींनी बरेच कष्ट उपसले असले तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी करामत दाखवू शकला नाही. त्यानंतर आलेले यश राज फिल्म्सचे ‘सिलसिला’ (१९८१), ‘मशाल’ (१९८४), ‘फासले’ (१९८५), ‘विजय’ (१९८८) व ‘लम्हे’ (१९९१) असे पाच चित्रपट पार कोसळले. यावेळी आपण आपला ‘फॉर्म’ गमावलेला नाही तर माझे निर्णय चुकले होते असे सांगून यशजींनी ‘चॉंदनी’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती- दिग्दर्शन केले आणि त्यानंतर ‘डर’ (१९९३) या आणखी एका चित्रपटाला यशाच्या शिखरावर नेत अजून आपली कारकीर्द संपलेली नाही हे सिद्ध केले.
याच काळात आपल्या पित्याच्या खांद्याला खांदा लावत, यशजींचे थोरले चिरंजीव आदित्य चोप्रा यांनी १९९५ साली ‘दिलवाले दुल्हनियॉं ले जाऐंगे’चे दिग्दर्शन केले. हा चित्रपट यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण झालेला आजवरचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. आज तब्बल सतरा वर्षे हा चित्रपट मुंबई येथील मराठा मंदिर चित्रपटगृहात चालतोच आहे. या चित्रपटामधून मिळालेल्या अफाट उत्पन्नाद्वारे यशजींनी मुंबईत यश राज स्टुडिओ उभा केला. यशराज म्युझिक ही संगीताला वाहिलेली कंपनी सुरू केली. आपल्या बॅनरची अमेरिका, इंग्लंड व आखाती देशांमध्ये कार्यालये थाटली. इतकेच नव्हे तर जमेल तसे यश राज फिल्म्सचे विस्तारीकरण केले. सोनी टेलिव्हिजनसोबत हातमिळवणी करून यश राज फिल्म्स टेलिव्हिजनने काही कार्यक्रम, काही मालिकाही छोट्या पडद्यावर सादर केल्या. अशा या अत्यंत यशस्वी गरुडझेपेनंतर यशजींनी ‘दिल तो पागल है’ (१९९७), ‘वीर-झारा’ (२००४) आणि अजून प्रदर्शित होण्याची वाट बघणारा ‘जब तक है जान’ असे तीन चित्रपट दिग्दर्शित केले. आदित्यनेही ‘मोहब्बतें’ (२०००) व ‘रब ने बना दी जोडी’ (२००८) असे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. मात्र यश राज फिल्म्सद्वारा २००० नंतर ३० हून अधिक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली ज्यामध्ये ‘हम तुम’ व ‘धूम’ (२००४), ‘‘धूम- २’ (२००६), ‘सलाम नमस्ते’ व ‘बंटी और बबली’ (२००५), ‘फना’ (२००६), ‘चक दे इंडिया!’ (२००७) व ‘एक था टायगर’ (२०१२) अशा यशस्वी चित्रपटांचा समावेश होता. हे सर्व चित्रपट कुणाल कोहली, महेश गाडवी, सिद्धार्थ आनंद, कबीर खान यांसारख्या अनेक नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले होते. यशजींचे निधन होईपर्यंत यश राज फिल्म्सची कमान बरीच उंचावली होती.
अलीकडेच वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या यश चोप्रा यांनी शाहरुख खान- कतरिना कैफ- अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जब तक है जान’ हा आपला शेवटचा दिग्दर्शित चित्रपट असेल असे जाहीर केले होते. आपले वाढते वय हे यामागचे कारण आहे असेही त्यांनी सांगितले होते. मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये दाखल व्हायला सज्ज झालेला हा चित्रपट आता सर्वार्थाने खरोखरच यशजींचा शेवटचा चित्रपट ठरला आहे.
यश चोप्रा यांचे चित्रपट संगीत
यश चोप्रा हे कविमनाचे दिग्दर्शक होते. बी. आर. फिल्म्समध्ये असताना त्यांचा प्रसिद्ध उर्दू शायर साहिर लुधियानवी यांच्याशी संपर्क आला. साहिर यांनी बी. आर. फिल्म्सच्या बहुतांश चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती. जेव्हा यशजींनी आपल्या यश राज फिल्म्सची स्थापना केली तेव्हा त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या ‘दाग’पासून ‘काला पत्थर’पर्यंत सर्व चित्रपटांसाठी साहिर यांच्याच काव्यरचना वापरल्या. पुढे १९८० मध्ये साहिर यांचे निधन झाले. सुरुवातीच्या काळात बी. आर. फिल्म्ससाठी चित्रपट दिग्दर्शित करताना यशजींच्या सर्व चित्रपटांना एन. दत्ता किंवा रवी यांचेच संगीत होते. ‘धुल का फुल’पासून (१९५९) ‘वक्त’ (१९६५) आणि ‘आदमी और इन्सान’पर्यंत (१९६९) त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये श्रवणीय गाणी होती. ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूँ’, ‘ए मेरी जोहराजबीं’, ‘आगे भी जाने ना तू’, ‘जिन्दगी इत्तफाक है’ अशा गाण्यांनी हे चित्रपट सजले होते. पुढे यश राज फिल्म्ससाठी ‘दाग’ची निर्मिती केल्यावर त्यांनी त्यावेळचे चलनी नाणे लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना संगीतकार म्हणून करारबद्ध केले, तर ‘जोशिला’ (१९७३) आणि ‘दीवार’साठी (१९७५) संगीतकार म्हणून राहुल देव बर्मन यांची निवड केली. ‘दाग’मध्ये ‘मेरे दिल में आज क्या है’, ‘हम और तुम, तुम और हम’, ‘अब चाहे मॉं रूठे या बाबा’ यांसारखी उत्कृष्ट गाणी दिल्यामुळे साहजिकच ‘कभी कभी’साठी (१९७६) लक्ष्मीकांत- प्यारेलाल यांची फेरनिवड झाली. पण ‘कभी कभी’ हा एक वेगळ्या पातळीवरचा चित्रपट आहे आणि त्यासाठी वेगळ्या पातळीवरच्या संगीतकाराची गरज आहे, असा साहिर यांनी यशजींना सल्ला दिला. त्यामुळे शेवटी ‘कभी कभी’साठी खय्याम या चिंतनशील संगीतकाराला पाचारण करण्यात आले. ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है’, ‘मैं पल दो पल का शायर हूँ’, ‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती’, ‘मेरे घर आई एक नन्ही परी’ अशा अनेक श्रवणीय गाण्यांनी ‘कभी कभी’ला ‘चार चॉंद’ लावणार्या खय्याम यांनी केवळ या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कारच जिंकला नाही तर पुढे यश राज फिल्म्समध्ये मुक्कामाला राहून ‘त्रिशूल’ (१९७८), ‘नुरी’ (१९७९), ‘नाखुदा’ (१९८१) आणि ‘सवाल’ (१९८२) अशा चित्रपटांना संगीत दिले. पुढे ‘दूसरा आदमी’ (१९७७) आणि ‘काला पत्थर’ (१९७९) या चित्रपटांसाठी यशजींनी तरुण, होतकरू संगीतकार राजेश रोशन याला हाताशी धरले. १९८१ साली जेव्हा यश राज फिल्म्सद्वारा ‘कभी कभी’सारखाच वेगळ्या पातळीवरचा ‘सिलसिला’ हा चित्रपट निर्माण करण्यात आला तेव्हा पुन्हा वेगळ्या पातळीवरचे संगीतकार सुप्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा आणि नामवंत बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना एकत्र आणून यशजींनी शिव-हरी ही जोडी तयार केली. ‘सिलसिला’ अपयशाच्या गर्तेत सापडला तरी त्याचे उपशास्त्रीय थाटाचे नितांत सुंदर संगीत सगळ्यांना मोहून टाकण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर शिव-हरी या जोडीने ‘मशाल’ (१९८४- संगीत ः हृदयनाथ मंगेशकर) हा चित्रपट वगळता यशजींच्या ‘फासले’ (१९८५), ‘विजय’ (१९८८), ‘चॉंदनी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘परंपरा’ (१९९२) आणि ‘डर’ (१९९३) या सहा चित्रपटांना सुमधुर संगीतसाज चढविला. या दरम्यान हिंदी चित्रपट संगीतामध्ये आमूलाग्र बदल होत होता. १९९० च्या दशकात व तद्नंतर यश राज फिल्म्सच्या चित्रपटांसाठी दिलीप सेन- समीर सेन, जतिन- ललित आणि उत्तम सिंग यांच्यापासून ते थेट विशाल- शेखर, प्रितम आणि शंकर- अहसान- लॉयपर्यंत अनेक संगीतकारांनी संगीत दिले. ‘दिलवाले दुल्हनियॉं ले जाऐंगे’ (२०००), ‘धूम’ व ‘घूम- २’ (२००४/२००६), ‘बंटी और बबली’ (२००५), ‘बचना ए हसीनों’ (२००८) अशा यश राज फिल्म्सच्या चित्रपटांमधील संगीत लोकप्रियही झाले.
जेव्हा यशजींनी २००४ साली भारतीय युवक आणि पाकिस्तानी युवती यांच्या प्रेमकहाणीवर आधारित ‘वीर-झारा’ बनविण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी उपलब्ध संगीतकारांकडे न वळता १९७५ साली कालवश झालेले दिग्गज संगीतकार मदनमोहन यांच्या ध्वनिमुद्रित अवस्थेत साठवून ठेवण्यात आलेल्या चालींवर आधारित गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून गाणी तयार करून घेण्याचे नक्की केले. अर्थातच ‘वीर-झारा’चे संगीत लोकप्रिय झाले व त्यातील ‘तेरे लिए’सारखे गाणे जुन्या काळातील अभिजात संगीताची प्रचिती देऊन गेले.
यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट ‘जब तक है जान’ गुलजार- ए. आर. रहमान या जोडीच्या गीत-संगीताने सजलेला आहे. याच जोडीने यश राज फिल्म्सच्या ‘साथीया’ या चित्रपटाला सुमधुर गीत-संगीताने न्हाऊ घातले होते.
यशजींना संगीताचा कान होता आणि अंगही होते. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट हे सुश्राव्य संगीताने नटलेले तर होतेच, शिवाय त्यांची ‘सॉंग पिच्चराइझेशन’ अर्थात गाण्याचे चित्रीकरण करण्याची पद्धतही अफलातून होती. राज कपूर, गुरुदत्त, विजय आनंद व राज खोसला यांच्याप्रमाणे उत्तम गाणी आणि त्यांचे चित्तवेधक चित्रीकरण असा दुग्ध-शर्करा योग यशजींच्या चित्रपटांमध्येही बघायला मिळत असे.
सौंदर्यसक्त कारागीर
साधना, शर्मिला टागोर, मुमताज, राखी, हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी, जुही चावला, माधुरी दीक्षित, प्रीती झिंटा, कतरिना कैफ… या सार्या खरे तर स्वर्गलोकीच्या तारका! या सौंदर्यदेवतांच्या दिमाखाचा आणि त्यांच्या आरसपानी सौंदर्याचा मान राखत यश चोप्रा यांनी आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांमधून त्यांना प्रेक्षकांसमोर अविस्मरणीय ढंगात सादर केले. ‘वक्त’मध्ये तंग चुडीदार-कुर्ता व गळ्याभोवताली ओढणी घेतलेली अवखळ साधना असो, ‘सिलसिला’मध्ये पांढर्या साडीतील मोकळे केस सोडलेली रेखा असो, ‘चॉंदणी’मध्ये वेगवेगळ्या रंगांच्या शिफॉन साड्यांमध्ये मिरविणारी श्रीदेवी असो, ‘दिल तो पागल है’मध्ये पिवळ्या छटांच्या सलवार-कमीजमध्ये खुलणारी माधुरी दीक्षित असो अथवा ‘वीर-झारा’मध्ये पठाणी ढंगाचा सलवार-कुर्ता व दुपट्टा घेणारी चंचल प्रीती झिंटा असो, यशजींच्या चित्रपटातील नायिकांनी प्रेक्षकांना भुरळ घातली नाही असे कधीच झाले नाही.
यशजींना सौंदर्यदृष्टी होती आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला उच्च दर्जा असण्याबरोबर एक प्रकारची खानदानी श्रीमंती होती. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची हर एक फ्रेम, प्रत्येक चौकट ही एका चित्ताकर्षक तैलचित्राप्रमाणे भासत असे. आपल्या चित्रपटांना स्टुडिओच्या तुरुंगात कैद न करता त्यांनी बाहेर फिरविले. ‘वक्त’चे बाह्यचित्रण दिल्लीमध्ये तर ‘दाग’ व ‘कभी कभी’ काश्मीरमध्ये चित्रित करण्यात आले होते. निसर्गाबद्दल जिव्हाळा बाळगणार्या यशजींनी ‘सिलसिला’साठी हॉलंड, ‘चॉंदनी’साठी स्विर्झलँड, ‘लम्हे’साठी लंडन, तर ‘दिल तो पागल है’साठी जर्मनीला जाऊन चित्रीकरण केले. याच परंपरेला जागत त्यांनी आपल्या ‘जब तक है जान’ या अंतिम चित्रपटासाठी लंडनपासून लडाखपर्यंतची लोकेशन्स वापरली आहेत.
प्रेमासारख्या तरल भावनेला वेगवेगळ्या रंगछटांमध्ये रुपेरी पडद्यावर साकार करणार्या यश चोप्रांना जरी ‘रोमान्सचा बादशहा’ म्हणून संबोधण्यात येत असले तरी ते आपल्या या इमेजमध्ये अडकले नाहीत. ‘दीवार’, ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’ आणि ‘डर’सारख्या हिंसेचा टिळा लागलेल्या चित्रपटांनाही त्यांनी तितक्याच सफाईने हाताळले, यशस्वी करून दाखविले.
दादासाहेब फाळके पुरस्कार या भारत सरकारतर्फे चित्रपटसृष्टीतील कर्तृत्वासाठी देण्यात येणार्या सर्वोच्च सन्मानापासून ते फ्रान्स सरकारच्या लेजॉं दू ऑनर या सर्वोच्च नागरी पुरस्कारापर्यंत अनेक गौरव प्राप्त झालेले यश चोप्रा कधीच भारतीय चित्रपटसृष्टीतील महान दिग्दर्शकांच्या पंगतीत जाऊन बसलेले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले २२ चित्रपट त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव भावी पिढ्यांना करून देण्यासाठी समर्थ आहेत. किंबहुना त्यांचा ‘दीवार’सारखा एकच चित्रपटदेखील हे काम सहजरीत्या करू शकेल.
यश चोप्रा यांचे ‘टॉप फाइव्ह’ चित्रपट
‘वक्त’ (१९६५) :
‘वक्त’ हा बी. आर. फिल्म्सचा पहिला रंगीत चित्रपट. त्यामुळे त्याच्या निर्मितीवर बराच पैसा खर्च झाला होता. बलराज सहानी, सुनिल दत्त, साधना, शशी कपूर, शर्मिला टागोर, रहमान, मोतीलाल आणि राजकुमारसारखा विक्षिप्त नट अशा अफाट संचात यश चोप्रांनी लहानपणी हरवलेली तीन भावंडे मोठेपणी एकत्र येतात हा मनमोहन देसाई छापाचा फॉर्म्युला ‘वक्त’मध्ये मोठ्या सफाईने हाताळला. या चित्रपटाच्या शेवटी असलेला सुमारे वीस-पंचवीस मिनिटांचा ‘कोर्टरूम ड्रामा’ म्हणजे यशजींच्या दिग्दर्शनाची कमालच म्हणावी लागेल. त्यांना या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार पहिल्यांदा लाभला.
‘इत्तफाक’ (१९६९) :
यश चोप्रा हे बी. आर. फिल्म्ससाठी ‘आदमी और इन्सान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना अभिनेत्री सायरा बानूला उपचारासाठी लंडनला जावे लागले आणि या मोकळ्या काळात एखादा चित्रपट झटपट बनवून टाकावा असे चोप्रा परिवाराचे मत झाले. त्यानंतर लगेच ‘धुम्मस’ या गुजराथी नाटकावर आधारित ‘इत्तफाक’ नावाचा चित्रपट हाती घेण्यात आला. राजेश खन्ना नामक नवीन अभिनेत्याला घेऊन केवळ एका रात्रीचे कथानक असलेला १०० मिनिटांहून कमी लांबीचा, हा गीतविरहित चित्रपट यशजींनी फक्त २८ दिवसांमध्ये पूर्ण केला. ‘इत्तफाक’ भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मध्यांतर नसलेला एकमेव चित्रपट ठरला. मोठ्या जोखमीने बनविलेल्या या चित्रपटाने यश तर संपादन केलेच, शिवाय यशजींना त्यांचे दिग्दर्शनासाठीचे दुसरे फिल्मफेअर पारितोषिक मिळवून दिले.
‘दाग’ (१९७३) :
१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला बी. आर. फिल्म्सच्या छत्रछायेखालून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर यश चोप्रा यांनी ‘दाग’ या यश राज फिल्म्सच्या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी लोकप्रिय कादंबरीकार गुलशन नंदा यांच्या कादंबरीचा आधार घेतला. राखी व शर्मिला टागोर या ‘दाग’मधील दोन अभिनेत्रींदरम्यान चालू असलेले शीतयुद्ध व ‘सुपरस्टार’चा किताब मिळाल्यामुळे नखरे करण्यास प्रारंभ केलेला अभिनेता राजेश खन्ना अशा समस्यांना तोंड देत यशजींनी ‘दाग’ बनविला. चित्रपटाच्या शेवटी नायक दोन्ही नायिकांबरोबर संसार थाटण्याचा निर्णय घेतो, या गोष्टीची जोखीम पत्करून यशजींनी ‘दाग’ प्रदर्शित केला व परत एकदा यशाचे धनी झाले. या चित्रपटाने यशजींना तिसर्यांदा उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दलचे फिल्मफेअर पारितोषिक मिळवून दिले.
‘दीवार’ (१९७५) :
अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीप्रमाणेच यश चोप्रांच्या कारकिर्दीतील ‘दीवार’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. एका बाजूने ‘गंगा जमुना’ व ‘मदर इंडिया’ यांचा संकर व दुसर्या बाजूने मुंबईवर ‘राज्य’ करणारा तत्कालीन तस्कर हाजी मस्तान तसेच मार्लोन ब्रॅण्डो यांची भूमिका असलेला ‘ऑन द वॉटरफ्रंट’ हा इंग्रजी चित्रपट, अशा जालीम मिश्रणातून लेखकद्वयी सलीम-जावेद यांनी ‘दीवार’चे कथानक तयार केले होते. राजेश खन्ना व नवीन निश्चल ते अमिताभ बच्चन व शशी कपूर आणि वैजयंतीमाला, सुचित्रा सेन आणि नूतन ते निरूपा रॉय असे बदल घडत ‘दीवार’ तयार झाला. या चित्रपटाच्या शेवटी येणार्या शिवमंदिरातील कळसदृश्यासाठी अमिताभ बच्चन व यशजींनी अपार मेहनत घेतली होती. १९७५ साली ‘आंधी’ व ‘शोले’ हे चित्रपट स्पर्धेमध्ये असताना गुलजार व रमेश सिप्पी यांना हरवून यश चोप्रा यांनी आपले दिग्दर्शनासाठीचे चौथे व शेवटचे फिल्मफेअर पारितोषिक पटकाविले.
‘कभी कभी’ (१९७६) :
हा चित्रपट म्हणजे एक तरल काव्य आहे. या कलाकृतीचा जन्मच मुळी साहिर लुधियानवी यांच्या ‘कभी कभी’ या काव्यापासून झाला. एका धीरगंभीर, पोक्त पण असफल प्रीतीची भावकहाणी सांगणारा हा चित्रपट एका पिढीतून दुसर्या पिढीकडे स्नेहबंधाचे सुंदर गोफ विणत जातो. या चित्रपटाचे लेखन सागर सरहदी या अत्यंत संवेदनशील लेखकाने केले होते, तर साहिर यांच्या हृदयस्पर्शी काव्याला खय्याम यांनी स्वर्गीय सुरांमध्ये गुंफले होते. अमिताभ बच्चन, शशी कपूर, वहिदा रेहमान, राखी, ऋषी कपूर, नीतू सिंग अशा भल्यामोठ्या नटसंचामध्ये हा चित्रपट काश्मीरच्या पार्श्वभूमीवर तयार झाला. या चित्रपटासाठी यशजींना उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे फिल्मफेअर नामांकन लाभले. मात्र त्या वर्षी ‘मौसम’ चित्रपटासाठी हा पुरस्कार गुलजार यांना प्राप्त झाला.