- ‘विज्ञानदूत’ श्रीकांत शंभू नागवेकर
डॉ. जयंत नारळीकर गेल्याने खगोलशास्त्राबरोबर विज्ञान प्रसार व विज्ञान साहित्य अशा क्षेत्रांत आभाळाएवढी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु, पुण्याच्या ‘आयुका’ संस्थेच्या दर्शनाने त्यांच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील. डॉ. जयंत नारळीकर व त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.
मंगळवारी, 20 मे रोजी दुपारी व्हॉटस्ॲपवर बातमी वाचून मन बधिर अन् अस्वस्थ झाले. मागील अनेक वर्षे भारतीय खगोलशास्त्रात चमकणारा एक तेजस्वी तारा निखळला- डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन झाले होते. बालपणी आमची एक समजूत होती, जेव्हा एखादा माणूस हे जग सोडून जातो तेव्हा आकाशात तारा होऊन राहतो. पण डॉ. नारळीकरांची सगळी कारकीर्द जमिनीवर तेजस्वी ताऱ्यासारखीच होती. तेव्हा बालपणातील निरागस विचारांतून आलेला हा समज डॉ. नारळीकरांच्या बाबतीत चुकीचा होता व डॉक्टरांच्या जीवनकार्याला लागू होत नव्हता. त्यांचे कार्य व लिखाण भविष्यातही नेहमी चमकत राहील.
डॉक्टर जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापुरात 1938 साली झाला. त्यांचे वडील विष्णू नारळीकर संस्कृत व गणित पंडित होते. त्यांच्या गणितातील प्रावीण्याबद्दल त्यांना ‘रँग्लर’ ही पदवी मिळाली होती. बनारस युनिव्हर्सिटीचे ते प्राध्यापक होते. जयंत नारळीकरांना शिक्षणाचा वारसा घराण्यातूनच मिळाला. वडिलांप्रमाणे त्यांनी संस्कृत व गणित विषयांत प्रावीण्य मिळवले. बनारस विद्यापीठात ‘बीए’चा अभ्यास पूर्ण करून ते कँब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ लागले. त्याच विद्यापीठात त्यांच्या वडिलांनी शिक्षण घेतले होते व त्यांच्याप्रमाणे ‘रँग्लर’ मॅडल मिळवले.
त्याकाळी विश्वाच्या उत्पत्तीविषयी नवे सिद्धांत येत होते. 1948 साली हर्मन बॉन्डी, थॉमस गोल्ड व फ्रेड हॉयल यांनी ‘स्थिर विश्वाचा सिद्धांत’ (डींशरवू डींरींश णपर्ळींशीीश) मांडला होता. सुदैवाने फ्रेड हॉयल हे जयंत नारळीकरांचे पीएच्.डी.चे मार्गदर्शक होते. 1964 साली नारळीकरांनी फ्रेड हॉयलसोबत वरील स्थिरतेच्या सिद्धांताला समर्थन देणार ‘हॉयल- नारळीकर’ मांडला.
विज्ञान संशोधनाचे मुख्यत: दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे निरीक्षणे करून त्यातून योग्य निष्कर्ष काढणे व दुसरा प्रकार वेगवेगळ्या स्त्रोतांतून माहिती एकत्र करून त्यातून एक सिद्धांत निर्माण करणे. अल्बर्ट आइस्टायनचा सापेक्षता सिद्धांत अशाच प्रकाराचा आहे. त्याला सैद्धांतिक (ढहशेीशींळलरश्र) विज्ञान म्हणतात. डॉक्टर जयंत नारळीकर सैद्धांतिक शास्त्रज्ञ होते व त्यांचा सिद्धांत उच्च गणितावर आधारीत होता.
1972 साली ते भारतात परतले व मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूटमध्ये (ढरींर खपीींर्ळीीींंश ेष र्ऋीपवराशपींरश्र ठशीशरीलह) प्रोफेसर पदावर रुजू झाले. 1988 मध्ये ‘आयुका’ची (खणउअअ : खपींशी-णपर्ळींशीीळूीं उशपीींश ेष अेीीींपूेा अेीीीं-झहूीळली) स्थापना झाली व त्याचे ते डायरेक्टर झाले.
तसे पाहिले तर डॉक्टर नारळीकरांचे नाव मला खूप वर्षांपासून परिचित होते. मी तारुण्याच्या उंबरठ्यावर होतो तेव्हा एक बातमी वर्तमानपत्रांत छापून आली होती व डॉक्टर नारळीकरांचे नाव लोकांच्या तोंडी गाजत होते. नेमके काय झाले होते हे तेव्हा मला कळले नाही, पण डॉक्टरांनी नवा शोध लावला एवढेच समजले होते. कसला शोध व कोणता शोध हे समजण्याची तेवढी कुवत त्यावेळी नव्हती. माझ्या विज्ञानप्रेमामुळे आणि भारत देशाचा अभिमान म्हणून डॉक्टर जयंत नारळीकरांचे नाव मनात कोरून राहिले. पण या महान व्यक्तीशी माझा संबंध येईल असे कधी वाटले नव्हते.
नंतर पणजीच्या ‘फ्रेंड्स ऑफ ॲस्ट्रोनॉमी’ या संस्थेचा एक कार्यकर्ता या नात्याने डॉ. नारळीकरांना अनेक वेळा भेटण्याची संधी मिळाली. वरील संस्थेचे अध्यक्ष आणि मला गुरुस्थानी असलेले माझे मित्र दिवंगत पेरसिवाल नोरोन्हा यांचे नारळीकरांशी मित्रत्वाचे संबंध होते व वरील संस्थेच्या कोणत्याही आमंत्रणाला नारळीकर आवर्जून हजर राहायचे. त्यानिमित्ताने डॉक्टरांशी आमचा सहवास वाढायला मदत होत गेली.
केवळ प्रयोगशाळेत बसून व मोठमोठे प्रबंध लिहून सामान्य लोकांमध्ये विज्ञानावरील निष्ठा वाढणार नाही हे डॉक्टरांनी बरोबर ओळखले होते. त्याकरिता त्यांनी विज्ञान लोकशिक्षण व विज्ञान प्रसाराच्या कामाला झोकून दिले. त्याचबरोबर भारतात विज्ञान लोकप्रिय करण्यास प्रादेशिक भाषेत लिहिणे सुरू केले. त्यांनी अनेक विज्ञान कथासंग्रह व कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या. त्यांच्या दर्जेदार विज्ञान लेखनाला साहित्य दर्जा मिळाला. सर्व पुस्तकांना बरीच लोकप्रियता प्राप्त झाली. त्यांच्या ‘चार नगरातील माझे विश्व’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. एवढेच नव्हे तर 2021 वर्षाचे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. केवळ त्यांच्या विज्ञान साहित्यामुळे विज्ञानाला साहित्यक्षेत्रात सन्मान प्राप्त होऊ शकला, असेच म्हणावे लागेल.
ते दूरदर्शी, प्रागतिक विचारांचे व सच्चे विज्ञाननिष्ठ होते. एका वैज्ञानिकाबद्दल असे बोलणे काहीसे विपरीत वाटते; परंतु वैज्ञानिक असणे व विज्ञाननिष्ठा या दोन्ही भिन्न प्रक्रिया आहेत. वैज्ञानिक विज्ञाननिष्ठ असतातच असे म्हणता येणार नाही. भारतात तर नाहीच नाही. अनेक शास्त्रज्ञ आधी देवालयात जाऊन देवाची प्रार्थना करूनच प्रयोगशाळेत प्रवेश करतात. आपल्या वेद व पुराणात सर्व ज्ञान अवगत होते अशा विचारसरणीला व प्रसाराला त्यांनी कडाडून विरोध केला. आपल्या अनेक मुलाखतींतून वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी वरील विचार खोडून काढले आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात ते सक्रिय भाग घेत. फलज्योतिष कसे चुकीचे हे समजून देण्यात त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत. हे सर्व साहित्य पुढेच्या पिढीला एक ज्ञानभांडार ठरेल.
भारतातील विज्ञाननिष्ठेच्या प्रसाराबाबतीत त्यांचे धोरण स्पष्ट होते. ते नेहमी म्हणायचे, समाजातील वयस्क घटकांकडून विज्ञाननिष्ठेची अपेक्षा करता येणार नाही, कारण तो वर्ग वेगळ्या संस्कारातून आलेला आहे. तेव्हा शालेय बालमनावर जास्तीत जास्त वैज्ञानिक संस्कार बिंबवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. पण एवढेच सांगून ते आपल्या प्रयोगशाळेत बसून राहिले नाहीत. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात ते आपुलकीने भाग घ्यायचे. गोवा विभाग मराठी विज्ञान परिषदेने भरविलेल्या मुलांच्या शिबिरात त्यांच्या प्रश्न-उत्तरांच्या कार्यक्रमाला हजर राहण्याची संधी मला मिळाली. मुलांच्या बौद्धिक पातळीवर जाऊन विज्ञानातील कठीण प्रश्न अत्यंत सोप्या भाषेत कसे स्पष्ट करून सांगावे, ही त्यांची खुबी शिकण्यासारखी होती. खासा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पोस्टकार्ड उपक्रम राबवला होता. मुलांनी एका पोस्टकार्डवर विज्ञानावरील प्रश्न लिहून पाठवयाचा व ते न चुकता प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाठवयाचे.
महाराष्ट्राबरोबर गोव्यातही डॉ. जयंत नारळीकर नावाभोवती एक वलय होते. कला अकादमीत त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. प्रत्येक वेळी सभागृह भरलेले असायचे. त्यांच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकणे शक्य होणार नाही.
पद्मविभूषणपासून अनेक विभूषणांनी त्यांच्या कार्याचा सन्मान झाला आहे. ते गेल्याने खगोलशास्त्राबरोबर विज्ञान प्रसार व विज्ञान साहित्य अशा क्षेत्रात आभाळाएवढी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु, पुण्याच्या ‘आयुका’ संस्थेच्या दर्शनाने त्यांच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील. डॉ. जयंत नारळीकर व त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.