Home बातम्या एका राजहंसाचा प्रवास…

एका राजहंसाचा प्रवास…

0

– सुधाकर नाईक

‘जन्टलमन्स गेम’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्रिकेटवर गेली दोन तपे आपल्या असामान्य खेळाने, अनेक विक्रमांसह अधिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणजे तमाम क्रिकेटरसिकांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. अलौकिक फलंदाजीने  क्रिकेट विश्‍वातील महान खेळाडूंच्या मनातही आदराचे स्थान मिळविलेला सचिन आजपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार्‍या वेस्ट इंडीजविरुध्दच्या दुसर्‍या व अंतिम कसोटीत कारकीर्दीतील दोनशेवा व निरोपाचा कसोटी सामना खेळेल.
२४ एप्रिल १९७३ रोजी मुंबईत जन्मलेल्या या ‘वंडर बॉय’चे नाव त्याचे पिता प्रा. रमेश तेंडुलकर यांनी आपले आवडते संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून ठेवले. मुंबई हे एकेकाळी भारतीय क्रिकेटचे माहेरघर, त्यामुळे बालपणापासूनच क्रिकेटविषयक अनेक गोष्टी त्याच्या कानावरून गेल्या होत्या. ज्येष्ठ बंधू अजितने त्यांच्यातील क्रिकेटचे कौशल्य ओळखून त्याला मोलाची साथ दिली. त्यानेच त्याला रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या गुरूकडे सुपूर्द केले.

शारदाश्रम विद्यामंदिरात ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकर यांच्याकडे सचिनने क्रिकेटचे शास्त्रशुद्ध धडे गिरवले.  सुप्त गुणांना योग्य प्रशिक्षणाची जोड मिळाल्यावर त्याचा खेळ लहान वयातच अधिक परिपक्व बनत गेला. आंतरशालेय क्रीडा जीवनापासूनच सचिनने विश्वविक्रम नोंदण्यास सुरुवात केली. १९८५-८६ ला आंतरशालेय हॅरिस शिल्ड स्पर्धेत त्याने शालेयमित्र विनोद कांबळीसह ६६४ धावांचा पर्वत रचला, त्यात सचिनचा वाटा  ३२६ धावांचा होता. सचिनने १५ व्या वर्षीच रणजीमध्ये पदार्पण  केले.  रणजी, दुलीप आणि इराणी या तिन्ही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदार्पणातच शतकी खेळीचा पराक्रम नोंदवित राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. 
या दरम्यान, एमआरएफ पेस फौंडेंशनमध्ये डेनिस लिलीच्या मार्गदर्शनाखाली तेज गोलंदाजीचे प्रशिक्षण घेण्यासाठी सचिन गेला होता, पण ऑस्ट्रेलियाच्या महान गोलंदाजाने त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि या निपुण क्रिकेटपटूच्या जीवनाला नवी दिशा लाभली.
१५ नोंव्हेंबर १९८९ रोजी, कराची येथे पाकिस्तानविरुध्द १६ वर्षीय सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. वकार युनूस, वासिम अक्रम, इम्रान खान अशा उपखंडातील तुफानी गोलंदाजी त्रिकुटापुढे कोवळ्या सचिनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली. या मालिकेत सचिन विशेष ठसा उमटवू शकला नाही, तरी त्याच्या धीरोदात्तपणाचे कौतुक झाले. या दौर्‍यात १८ डिसेंबर १९८९ रोजी गुजरानवाला येथे सचिनने पाकिस्तानविरुध्दच  एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणानंतर १९९० पर्यंत सचिनने आपल्या एकाग्रचित्त, दृढनिश्‍चियी आणि धीरोदात्त खेळीने आपली ओळख निर्माण केली, पण तीन अंकी जादुई आकडा गाठण्यासाठी  बरीच प्रतीक्षा करावी लागली.  १४ ऑगस्ट १९९० रोजी ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर इंग्लंडविरुध्द सचिनने पहिले आंतरराष्ट्रीय शतक नोंदवले. त्यानंतर १९९१-९२मधील ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सिडनी आणि पर्थ येथे शानदार शतके झळकवित आपल्या आपल्या आगमनाची ग्वाही दिली. परदेशातील या शानदार कामगिरीनंतर सचिनचा खेळ बहरला, त्याच्या फलंदाजीला अलौकिक झळाळी प्राप्त झाली आणि एकामागोमाग एकेक नवे नवे विक्रम प्रस्थापित झाले. आपले पहिले तब्बल ३५ कसोटी सामने विदेशातील मैदानावर खेळलेल्या सचिनने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलकता येथे भारतीय मैदानावरील पहिली कसोटी खेळली. या मालिकेतील चेन्नई येथील दुसर्‍या सामन्यात  १६५ धावा नोंदवित मायभूमीतील आपले पहिले कसोटी शतक झळकावले.
वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या कसोटीतील नाबाद ४०० आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नाबाद ५०१ धावा वगळता अन्य एकही विक्रम सचिनकडून अबाधित राहू शकलेला नाही. १९९० ते २००० या दहा वर्षांच्या कालखंडात सचिन तळपला. ग्लेन मॅक्ग्रा, शेन वॉर्न, ऍलन डोनाल्ड, वासिम अक्रम, वकार युनूस, माल्कम मार्शल यांच्यासह अन्य दर्जेदार गोलंदाजांच्या पर्वात सचिनने आपले श्रेष्ठत्व सिध्द केले  आणि त्याचा हा प्रवास एवढा वेगवान होता की याच दशकात लिटल मास्टर  सचिन  प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा कर्दनकाळ, मास्टर ब्लास्टर ठरला.
सचिन तेंडुलकरचे विक्रम हा एखाद्या प्रश्‍नमंजूषेतील गहन प्रश्‍न ठरावा. कसोटी (१५८४७), एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (१८३९१) क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांच्या विक्रमांसह आंतरराष्ट्रीय शतकांचे शतक, सहा विश्‍वचषकातील ४५ सामन्यांत सर्वाधिक २२७८ धावा, सर्वाधिक सामनावीर (६४), मालिकावीर पुरस्कार (१७) सर्वाधिक द्विशतकी, शतकी भागी, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक नोेंदणारा फलंदाज ( वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा हे वनड़ेत द्विशतके नोंदणारे अन्य फलंदाज) असे तब्बल ६९ विक्रम या विक्रमादित्याच्या नावावर आहेत.
विलक्षण फलंदाजीने क्रिकेटरसिकांना तृप्त केलेल्या सचिनचे दिग्गजांनीही मनापासून कौतुक केले.  सचिनच्या खेळीत मला माझ्या शैलीचा आभास होतो असे कौतुकोद्वार ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी काढले होते. सर व्हिवियन रिचर्डससह बहुतेक आजी माजी कसोटीपटूंनी सचिनच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. भारतीय क्रिकेटशौकिन सचिनला देव मानतातच, पण ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने ‘हो मी देव पाहिला तो भारतातर्फे कसोटीत चौथ्या क्रमावर खेळतो’ असे दिलखुलास मतप्रदर्शन करीत सचिनच्या श्रेष्ठत्वाचा आदर केला.
सचिनने जिगरबाज तथा झंझावाती खेळीने  भारतीय संघाला  क्रिकेट विश्‍वात मानाचे  विशेष स्थान मिळवून दिलेल्या भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनाला सर्वाधिक भिडलेली त्यांची खेळी म्हणजे ‘डेझर्ट स्टॉर्म’ म्हणून प्रसिद्ध असलेली, शारजा येथील कोकाकोला कपच्या उपान्त्य सामन्यातील खेळी होय. ऑस्ट्रेलियाच्या २८४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था ४ बाद १४३ अशी झाली होती. त्याच वेळी भरीस भर म्हणून मैदानावर  तुङ्गान वादळ सुटले होते. सचिनने या प्रतिकूल परिस्थितीत झंझावाती खेळीत  ५ षटकार आणि ९ चौकारांसह  १४२ धावांची ‘मॅच-विनिंग  खेळी करीत संघाला अंतिम ङ्गेरीत नेले.  एवढेच नव्हे तर त्यानंतर दोन दिवसातच ऑस्ट्रेलियाविरुद्धच अंतिम सामन्यात १३१ चेंडूत १३४ धावा फटकावीत भारताला विजेतेपदही मिळवून दिले. 
१९९४ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सचिनला सलामीवीर म्हणून बढती देण्यात आली आणि क्रिकेटविश्‍वाला  आघाडीचा एक उत्तम, आक्रमक ङ्गलंदाज अनुभवण्यास मिळू लागला. सौरव गांगुली व वीरेंद्र सेहवाग या त्यांच्या जोडीदारांचा खेळ बहरण्रयातही सचिनच्या साथीचा मोठा वाटा आहे. आपल्या देशाशी आणि खेळाशी बांधिलकी मानणारा सचिन व्यक्तिगत विक्रमापेक्षा संघाला, सांघिक कामगिरीला, देशाच्या विजयाला अधिक महत्त्व देतो. एका विश्वचषक स्पर्धेच्या वेळी त्यांचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. त्या वेळी ङ्गक्त एका सामन्यात सचिन अनुपस्थित राहिला.  संघाला असणारी आपली गरज आणि खेळाबद्दलची बांधिलकी यांचा विचार करून पुढील केनियाविरुद्धच्या सामन्यात सहभागी झाला, एवढेच नव्हे तर शानदार शतकही झळकवीत सामनावीर पुरस्कारही त्याने मिळविला. अर्जुन, राजीव गांधी खेल रत्न, पद्मश्री, पद्मविभूषण असे चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला सचिन हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू होय. राज्यसभा खासदारपदी सचिनची नियुक्ती करून केंद्र सरकारने सचिनचा गौरव केलेला आहेच, पण प्रतिष्ठेचा ‘भारतरत्न’ पुरस्कारही सचिनला द्यावा अशी मागणीही सातत्याने होत आली आहे.
भारतीय क्रिकेटचा  ‘संकटमोचक’ म्हणून अवतरलेल्या सचिनपासून प्रेरणा, स्फूर्ती घेत देशभरातून नवनवे दर्जेदार फलंदाज निर्माण होत आहेत. क्रिकेट विश्‍वात भारताला मानाचे स्थान मिळवून देण्यात सचिनचा सिंहाचा वाटा असून लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच हा विक्रमादित्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेत आहे. ‘जन्टलमन्स गेम’च्या या राजदूताला अभिवादन!