एका महिन्यात खाणींवरील ताबा सोडा

0
9

>> खाण खात्याकडून 159 लीजधारकांना आदेश

राज्य सरकारने राज्यातील यापूर्वीच्या 159 लीजधारकांना खाण लीजांवरील आपला ताबा सोडण्यासाठी एका महिन्याचा अवधी दिला आहे. त्याचबरोबर लीजांवरील ताबा एका महिन्याच्या मुदतीत न सोडल्यास त्यांच्याकडील लीज ताब्यात घेण्याबरोबरच एमएमडीआर कायद्याखाली त्यांची यंत्रसामुग्री ताब्यात घेण्याचाही इशारा दिला आहे. यासंबंधीचा आदेश राज्याच्या खाण खात्याने सोमवारी काढला.

या लीजधारकांचा खाण लीजांवरील हक्क 31 मार्च 2020 रोजी संपुष्टात आला आहे. या खाण लीजधारकांना यापूर्वीची नोटीस दिल्यास आता सहा महिन्यांचा काळ उलटला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने या लीजधारकांना लीजांवरील आपला ताबा सोडण्यासाठी एका महिन्याचा अवधी दिला असून ही अंतिम नोटीस असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारने आदेशाद्वारे खाण लीज सोडण्याबरोबरच तेथे असलेली यंत्रसामुग्री व अन्य यंत्रणा आणि सर्व साहित्य एका महिन्याच्या आत हलवावे, असे आदेशात म्हटले आहे. लीजधारकांनी तसे न केल्यास ही मालमत्ता गोवा सरकारची होईल व नंतर त्या मालमत्तेचे काय करायचे याचा निर्णय सरकार घेईल. तसेच या मालमत्तेसंबंधीची कोणतीही भरपाई सरकार लीजधारकांना देणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.