– डॉ. सोमनाथ कोमरपंत
मी : अरुण दाभोलकरसर, नमस्कार!
दाभोलकर : नमस्कार!
मी : एक प्रतिभासंपन्न चित्रकार म्हणून एका वैभवपूर्ण अशा बिंदूवर तुम्ही उभे आहात. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर तुमची कीर्ती पसरलेली आहे. ‘नवप्रभा’च्या असंख्य वाचकांसाठी तुमचा कलाप्रवास समजून घेणे ही उद्बोधक बाब ठरेल. आपण मनमोकळेपणाने गप्पागोष्टी करूया का?
दाभोलकर : हो, का नाही, माझ्यासाठीही ती आनंददायी बाब ठरेल. मला माझ्या मागच्या मंतरलेल्या दिवसांत फेरफटका मारून येता येईल.
मी : दाभोलकर, आपला जन्म, बालपण आणि शिक्षण यांबद्दल थोडक्यात काही सांगाल का?
दाभोलकर : मी मूळचा वेंगुर्ल्याजवळच्या दाभोली गावचा. माझा जन्म ५ जानेवारी १९५४ रोजी झाला. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. ते नाट्यवेडे होते. संगीत हाही त्यांचा अत्यंत आवडीचा विषय. नाट्यशिक्षणाच्या निमित्ताने ते गावोगाव भ्रमंती करायचे. त्यात ते रमायचे. प्रपंचाकडे लक्ष कमीच. मी चित्रकलेकडे खास वळावे असे वातावरण घरात नव्हते. पण संगीत, नाट्य हेदेखील एका परीने चित्रकलेची अभिरुची वाढविणारे असते असे बालपणापासून मानणार्यांपैकी मी एक होतो. अभ्यासात मी हुशार नव्हतो. अभ्यासक्रमाच्या दृष्टीने कच्चाच म्हणा ना. पण पुस्तकात एकाग्रता नसली तरी चित्रकलेत मात्र मी तन्मय होत होतो. चित्र बघितले, मूर्ती बघितली तर मी तासन्तास टक लावून बघतच बसे. अशाने हळूहळू चित्रकलेची गोडी लागली. घरची गरिबी. नाटकाच्या शौकिनतेमुळे बाबा परागंदा असायचे. अर्थातच घरात थोरला म्हणून कुटुंबप्रमुखाची जबाबदारी माझ्याकडेच आली. प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत कसाबसा एस.एस.सी.ची परीक्षा पास झालो. इकडे तिकडे धडपड करून उपजीविकेचा मार्ग शोधला. एका दुकानात सेल्समन म्हणून नोकरीला लागलो. ही झाली उदरनिर्वाहाची बाब.
पण काहीतरी जीवनात वेगळे करावे ही ऊर्मी मनात होतीच. बालपणी घराशेजारी, परिसरात गणपतीच्या दिवसांत गणपतीच्या शाळा भरायच्या. मूर्तिकारांसमवेत दिवसांतल्या कैक घटका मी घालवीत असे. त्यांचे कलानैपुण्य न्याहाळताना मन हरखून जाई.
त्या वयात मी समुद्राची सुंदर गाज, समुद्राचा किनारा, समुद्राचे रंगविभ्रम आणि सूर्यास्तकालीन रंगबदल मनसोक्त न्याहाळले. सगळे रंग डोळ्यांत साठविले. त्यातून मला आकार मिळाले. कोकणच्या संचिताची ओळख पटली. अंतर्मनातील माझ्यातील बालकलाकाराला निसर्गाच्या गहराईने पुरते भारावून टाकले. चित्रकार बापाच्या पोटी जन्म घेतल्यावर एखादा माणूस चित्रकार होतो हे खरे नव्हे. ज्या परिसरात त्याचे बालपण जाते तेथे, शेजार्यांकडून, शिक्षकांकडून, मित्रांकडून कळत वा नकळत संस्कार मनावर होत जातात. कलाकार घडत जातो. मघाशी मी म्हणालो की, आमच्या परिसरात ‘गणपतीची शाळा’ असायची. सुबक मूर्ती घडायच्या. त्या भागात मूर्तिकार प्रचंड प्रमाणात झाले. लहानपणापासून त्यांची कला मी पाहत आलो. गणपतीचे सुंदर आकार, सुंदर रंगसंगती, सुंदर आयुध, सुंदर पोत, लहानमोठे आकार पाहिले.
एरव्ही गणपतीचा अमूर्त आकार, पण त्याच्यामध्ये हत्तीच्या रूपाचे- प्राण्याचे- आणि मानवी रूप यांचे संकलित रूप असते. तरीही गणपतीला जे मूर्त स्वरूप प्राप्त होते ते मनाला भावणारे असते. अतिशय प्रसन्न. अत्यंत चैतन्यदायी.
मी : तुम्ही तर चित्रकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रतिभावंत कवी आहात.
दाभोलकर : मला स्वतःला तसे वाटत नाही. मी फार मोठा प्रतिभावंत नाही. माझ्या कलेतून मी कुटुंबाचे पालनपोषण करण्याची किमया साधली. चित्रकला शिक्षकाच्या प्रशिक्षणात संपूर्ण महाराष्ट्रात पहिला आलो. आत्मविश्वास वाढला. मुंबई गाठली.
मी : मुंबईच्या वास्तव्यातील ठळक घटना सांगाल?
दाभोलकर : सांगतो ना. मुंबईत आलो त्यामागे विशिष्ट प्रेरणा होती. कोकणात राहिलो असतो तर जन्मभर शिक्षकच राहिलो असतो. येथे आल्यावर चित्रकलेच्या विस्तीर्ण क्षितिजाचा शोध लागला. त्याच्या विकसित शाखा आहेत हे कळले. फोटोग्राफी आहे, इंटरनल डेकोरेशन आहे, फाइन आर्ट आहे. पुष्कळ काही आहे. चित्रकाराची दृष्टी असली आणि कॉम्प्युटरचे साहाय्य असले तर किमया करता येते हे उमजले. प्रगतीच्या महामार्गाकडे मला जायचे आहे आणि मुंबई हाच महामार्ग आहे याचा शोध लवकरच लागला. पुढे काय काय घडणार आहे याची खरीच कल्पना नव्हती. १९७३ चा तो काळ. रात्रीच्या वेळी ‘रातराणी’ सुटायच्या. सकाळी पोचलो. इंटरव्ह्यू दिला. लगेच दुपारी नोकरी मिळाली. सकाळच्या वेळी चित्रकलेचे अध्ययन करायचे. दुपारच्या वेळी चित्रकलेचे प्रगत शिक्षण घ्यायचे हा क्रम सुरू झाला. तसे सांगणारी, प्रोत्साहन देणारी जाणकार मंडळी हा जीवनातील सुयोग. ‘बांद्रा स्कूल ऑफ आर्ट’मध्ये कमर्शियल आर्ट शाखेमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी शिक्षण सुरू झाले. प्रख्यात निसर्गचित्रकार आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन डीन प्रल्हाद अनंत धोंड यांचे जामात किसन कामत स्कूलचे प्रमुख होते. उत्तम मार्गदर्शन मिळाले. धोंडांचे जलरंगांवर विलक्षण प्रभुत्व होते. ते कैकदा न्याहाळण्याची अपूर्व संधी मिळाली. त्यांचा वरदहस्त होताच. संपूर्ण महाराष्ट्रात जी. डी. आर्ट (कमर्शियल) या परीक्षेत पहिला आलो. प्रल्हाद अनंत धोंड यांची शिफारस होती, फर्स्ट क्लास द्यायचा असला तर एकच माणूस पात्र वाटतो. उपयोजित कलेकडे मी वळलो याला कारणे अनेक होती. फाइन आर्टकडे वळलेली माणसे कलंदरच राहतात असा एक समज आहे. म्हणून व्यापारी चित्रकार व्हायचे ठरवले. पण मनाने घेतले, आर्ट मास्टर व्हावे. याही सर्वोच्च परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात पहिला आलो.
कलेच्या क्षेत्रात महत्त्वाचा प्रश्न असतो तो आर्थिक क्षेत्रात स्थिर होण्याचा. तो अपघात असतो. नोकरी मिळेलच. गुणवत्ता प्राप्त झाली तरच त्याला साजेसे क्षेत्र मिळते. ‘बाप दाखवा; नाही तर श्राद्ध करा’ ही उक्ती आमच्या या क्षेत्राला तंतोतंत लागू पडणारी आहे. खरे म्हणजे जाहिरातक्षेत्रात मी नेमके काय करावे असा प्रश्न होता. कारण मी कोकणात जन्माला आलो होतो. येथील निसर्गसान्निध्यातील मी चित्रकार आहे याची जाणीव प्रबळ होती. कमर्शियलसाठी मी नाही. चित्रकलेच्या क्षेत्रात माझ्याकडून अभिनव घडावे ही अंतःप्रेरणा होती. सही नसताना हे दाभोलकरांचे चित्र आहे हे ओळखता आले पाहिजे अशी आकांक्षा मनी धरली. येथून अभिजात कलेने वळण घेतले. १९७८ ते १९८४ हा तो काळ होता. मी या काळात शेकडो ग्रीटिंग कार्डस् बनविली. ही स्नेहपत्रे आहेत याची जाणीव ठेवून वेगवेगळे आकार दिले. पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळत होती. चित्रकला शिक्षक म्हणून ८०० रुपये मिळायचे. वर्षाकाठी दोन हजार ते तीन हजार ग्रीटिंग काडर्स मी बनवीत असे. पैसा आपोआप येत गेला. दाभोलकरांची शैली म्हणून माझ्या चित्रशैलीला लोकांनी नाव दिले. ही शैली आपण तयार करायची नसते, लोकांनी ओळखायची असते. मी ब्रशकाम करीत गेलो. डोळ्यांसमोर आदर्श होता दीनानाथ दलाल यांचा. रघुवीर मुळगावकरांचा. ग्रीटिंग कार्ड्समुळे मी घराघरांत पोचलो.
मी : दाभोलकर, तुमच्या गणेशप्रतिमांबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे…
दाभोलकर : अवश्य सांगतो. माझ्याकडून गणपती घडला. हा अपघात चुकून घडला. त्या दिवशी संकष्टी होती. त्या दिवशी कोणतेही काम करायचे नव्हते. दुसर्या दिवशी प्रारंभ करायचा होता. त्या काळात मी मुंबईत होतो. त्या काळात रंगीत शाई चित्रकार आपल्या कलेसाठी वापरत नव्हते. ‘कॅमल’ कंपनीने अनेक ‘शेड्स’ची शाई तयार केली होती. दांडेकरांनी माझ्यासमोर अनेक रंगांच्या शाईच्या बाटल्या धरल्या. ते म्हणाले, ‘‘तुला यातले काय जमतंय काय ते बघ!’’ मी ‘ग्लोसी’ पेपर्सवर अनेक रंगांची शाई ओतली. वाकडे-तिकडे रंग मिसळले. त्यांतून सुंदर सुंदर आकार निर्माण झाले. अनेकजण म्हणायला लागले, ‘हा गणपती कधी काढलास?’ मी म्हणालो, गणपती कधी काढला? मी फक्त रंगांशी खेळलो. मला गणपती काढायचाच नव्हता काही. खेळ पूर्ण झाला. गणपतीला विशिष्ट आकार प्राप्त झाला. अष्टविनायकांना कुठे आकार आहे? वास्तव आकार आहे का त्यांना? ते तर अमूर्त (रलीींीरलीं) आकार आहेत. एखाद्या अमूर्त आकाराला जिवंत माणसे मूर्त स्वरूपासारखे ओळखतात आणि त्याला गणपती म्हणतात. ती माणसाची श्रद्धा आहे. त्याच्या मनाच्या कोपर्यात गणपतीचा आकार दडलेला असतो. तो कसाही असला तरी. त्याला सोंड असली म्हणजे झाले. माणसाच्या अंतरंगातील श्रद्धेच्या रंगांनी त्याला आकार लाभलेला असतो. हे कलावंताचे स्वातंत्र्य मला अमर्याद मिळाले. गणपतीवाले दाभोलकर म्हणून मला लोक ओळखू लागले. महाराष्ट्रातच नव्हे तर सार्या देशभरातून. गेल्या तीस वर्षांत मी हजारो विविध आकाराचे गणपती काढले. या चित्रनिर्मितीतून मला स्वतःला आनंद मिळाला आणि सहस्रावधी माणसांनादेखील. थोडक्यात म्हणजे मी चित्रकलेचा बाजार केला. गणपतीचा व्यवसाय केला. ऑफसेट पद्धतीने अनेक चित्रे छापली. आकार मी रंगीत केले. पैसाही मिळविला. चित्रकार कलंदर असतो या कल्पनेला मी छेद दिला. माझे एक स्वप्न आहे, येत्या दहा वर्षांत गणपतीच्या माध्यमातून मला देशाच्या अनेक भागांमध्ये जायचे आहे, ज्याप्रमाणे राजा रविवर्मा गेले…
मी : चित्रकला सांस्कृतिक समृद्धीला हातभार लावू शकते असे तुम्हाला वाटते का?
दाभोलकर : चांगला प्रश्न विचारलात. मी चित्रकार आहे. माझी स्वतःची सामाजिक आणि सांस्कृतिक बांधीलकी आहे. सर्वप्रथम मी भारतीय माणूस आहे. या संस्कृतीचे मी महत्त्व जाणतो. संस्कृतीचे असंख्य आकार, सौंदर्य माझ्या मनाला आकृष्ट करतात. भारतीय माणसांची घरे, येथील प्राणी, पक्षी, येथील निसर्ग, गरीब-श्रीमंत माणसे आणि मंदिरे यांविषयी मला ममत्व वाटते. भारतीय संस्कृतीचे आकार लोकांपर्यंत पोचावेत असा माझा प्रयत्न असतो. ‘माझ्या चार भिंतीतील एक भिंत दाभोलकरांसाठी राखून ठेवावी’ अशी सौंदर्याभिरूची येथील माणसांमध्ये निर्माण व्हावी असे मला वाटते. स्वप्न भव्य असावे. भारताचे सौंदर्य ज्या ज्या ठिकाणी आहे त्याचा आविष्कार मला करता यावा. त्याच्या योगे घराघरांचे सौंदर्य वाढावे. लोकांची सौंदर्यदृष्टी वाढावी अशी माझी धारणा आहे. चित्रांच्या माध्यमातून स्नेहाची देवाणघेवाण करता येते. साहित्य, संगीत हे चित्रकलेला पूरकच आहे. कसे जगावे, कसा विचार करावा याविषयी या कला मार्गदर्शन करतात. आपले जीवनातील सौंदर्य कसे टिकवावे, आस्वाद कसा घ्यावा हे त्यामुळे कळते.
सातत्याने चित्राकडे बघत राहिलो, चित्रे वाचायला लागलो तर त्यातील सौंदर्य प्रत्येकाला कळायला लागते.
मी : हा आंतरसंबंध तुम्ही छान विशद केला.
दाभोलकर : तो आहेच. माझी चित्रे बघून कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणाले, दाबोलकरांची चित्रे म्हणजे कविताच आहेत. त्यांच्या प्रशंसेने मी भरून पावलो.
मी : हा तुम्हाला लाभलेला मोठा पुरस्कारच म्हणा ना!
दाभोलकर : हो ना. शासनाच्या कुठल्याही पुरस्कारापेक्षाही मोठा. हा सुंदर अनुभव होता. मी प्रामाणिकपणे जगलो त्याची ही पावती. बालपणीच चित्र काढणारा मोठेपणी चित्रकार होतो हे काही खरे नाही. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही कलासाधना करू शकता. कविश्रेष्ठ रवींद्रनाथांनी साठाव्या वर्षानंतर चित्रकलेची साधना केली. ऍडॉल्फ हिटलर यासारख्या हुकूमशहाला या कलेची साधना करावीशी वाटली. इंग्लंडचे पंतप्रधानपद भूषविलेल्या विन्स्टन चर्चिलला चित्रकलेत गती होती. चित्रकलेची दृष्टी प्रत्येकाकडे असते. सौंदर्यदृष्टी असते. मूलतः या कलेसाठी जो वेळ देतो तो उत्तम चित्रकार होऊ शकतो. प्रत्येकजण ‘अ’च काढतो, पण त्या ‘अ’मध्ये आपले व्यक्तिमत्त्व ओतत असतो तो चित्रकार होतो. देवाने सारे दिलेले आहे. या संधीचे सोने करता आले पाहिजे. मी चित्रकार आहे. चित्रे काढणे हा माझा धर्म आहे. नव्या नव्या चित्रांची निर्मिती मी सातत्याने करीत असतो. दिवसाकाठी एखादे चित्र काढले गेले नाही तर मला चैन पडत नाही. तुम्ही लिहिले नाही तर तुम्हाला वाईट वाटते की नाही?
मी : दाभोलकरसर, तुम्ही तुमच्या जीवनप्रवासाबद्दल, गणपतीच्या चित्रांबद्दल आणि एकूणच तुमच्या चित्रकलासाधनेबद्दल प्रांजळपणे आणि तन्मयतेने बोललात. मी व्यक्तिशः आणि ‘नवप्रभा’ परिवारातर्फे तुमचे मनःपूर्वक आभार मानतो.
दाभोलकर : तुमचेही आभार. पुन्हा लवकरच भेटू. नमस्कार!