– शशिकांत अर्जुनराव सरदेसाई
दोन व्यक्ती किंवा दोन संस्था आणि झालेच तर दोन सरकारे म्हणजेच पर्यायाने दोन राजकीय पक्ष यांची तुलना करीत असताना दोघांमध्ये काही समान गोष्टी आपणास आढळल्यास आपण ‘एकाच नाण्याच्या दोन बाजू’ हा शब्दप्रयोग आपण उपयोगात आणतो. मी आज या ठिकाणी दोन राजकीय पक्ष म्हणजेच कॉंग्रेस आणि भाजपा यांच्या कार्यपद्धतीवर माझ्या शक्तीनुसार सिंहावलोकन करून हे दोन्ही पक्ष म्हणजेच ‘एकाच (खोट्या) नाण्याच्या दोन बाजू’ आहेत हा विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
गेली सुमारे ४०-४५ वर्षे मी कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात माझ्या कुवतीनुसार कार्य करणारा एक लहानसा कार्यकर्ता आहे. माझ्या कला क्षेत्रातील (नाट्य) योगदानाची राज्य सरकारने दखल घेऊन २००७ साली ‘कला गौरव’ पुरस्कार देऊन, तर सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल २००८ यावर्षी ‘उत्कृष्ट समाजसेवक’ पुरस्कार देऊन माझा गौरव केला आहे. क्रीडा क्षेत्रात कबड्डी, खो-खो, क्रिकेट, रस्सीखेच या खेळांशी माझा निकटचा संबंध आहे. राजकीय क्षेत्रात मात्र मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. परंतु गोवा विमोचनानंतर गोव्यातील राजकीय क्षितिजावर उगवलेले म.गो. आणि यु.गो. हे स्थानिक पक्ष होते आणि त्यातील म.गो. हा पक्ष मला जवळचा वाटला म्हणून मी त्याचा समर्थक बनलो. भाऊसाहेब बांदोडकर आणि त्यांच्या निधनानंतर शशिकलाताई काकोडकर यांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली आहे. १९८० मध्ये म. गो. पक्षाचा पराभव झाला आणि एका रात्रीत अरस कॉंग्रेस म्हणून निवडून आलेला पक्ष इंदिरा कॉंग्रेसमध्ये विलिन झाला आणि कॉंग्रेसची सत्ता सुरू झाली. हा पक्ष मला कधीच आपला वाटला नाही. १९९० च्या सुमारास भाजपा उदयास आला आणि १९९४ च्या निवडणुकीत या पक्षाचे चार आमदार निवडून आले. त्यानंतर १९९९ मध्ये दहा, २००२ मध्ये सोळा, २००७ मध्ये चौदा आणि आता २०१२ मध्ये २१ असे चढत्या भाजणीत उमेदवार निवडून एकवीस अधिक इतर सात मिळून चाळीस पैकी अठ्ठावीस उमेदवारांचे भरभक्कम सरकार सत्तेवर आले. म. गो. नंतर भाजपाबद्दल थोडीशी आत्मियता निर्माण झाली. कारण लहानपणापासून संघाच्या शाखेत आणि त्यानंतर १९७३ पासून विश्व हिंदू परिषद संस्थेत काम केले असल्यामुळे तेथे झालेले भारतीयत्वाचे संस्कार.
कॉंग्रेस पक्षाबद्दल…..
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर कॉंग्रेस (ही त्याकाळी स्वातंत्र्य चळवळ) बरखास्त करण्याचा विचार पुढे येऊनही काही सत्तालोलुप मंडळींने त्याला विरोध केला आणि कॉंग्रेस राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आला. हिंदू आणि मुस्लिम समाजांना वेगळे ठेवून त्यांच्यात दुही माजवून ‘डिव्हाईड अँड रुल’ तत्त्वाचे आचरण करीत इंग्रजांनी दीडशे वर्षाहून अधिक काळ या भारत देशावर राज्य केले. त्यांचाच कित्ता गिरवत कॉंग्रेसने सर्वधर्मसमभाव या गोंडस शब्दांचा साळसूदपणे वापर करीत अल्पसंख्यकांचे लांगुलचालन करून या देशावर राज्य केले. १९८० मध्ये गोव्यात या पक्षाचा उदय झाल्यावर येथेदेखील अल्पसंख्यक समाजाच्या लांगुलचालनाने सत्ता भोगत आले. १९८० ते २०१२ पर्यंत सत्तेसाठी काय वाटेल ते पवित्रे अवलंबून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो धिंगाणा घातला गेला तो गोमंतकीय जनतेला ज्ञातच आहे. वर निर्देश केलेल्या कालावधी दरम्यान १९८९-९० मध्ये जेमतेम दहा महिने पुलोआचे खिचडी सरकार १९९९ मध्ये गोवा कॉंग्रेस-भाजपाचे सहा ते सात महिने सत्तेवर आलेले सरकार आणि त्यानंतर २००० ते २००५ या कालावधीतील भाजपाचे सरकार अशा प्रकारे १) कॉंग्रेस २) पुलोआ, ३) गोवा कॉंग्रेस आणि ४) भाजपा अशी चार सरकारे आणि दहा मुख्यमंत्री पाहण्याचा दुर्लभ योगदेखील गोमंतकीयांच्या नशिबी आला. त्यातल्या त्यात भाजपाने २००० ते २००५ या काळात चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. परंतु मनोहरपंतांचा एककल्ली स्वभाव आणि सत्तेविना जगता न येणारा कॉंग्रेस यांच्या धबडग्यात मनोहरपंतांचे सरकार सत्ताभ्रष्ट होऊन पुनश्च कॉंग्रेस पक्ष सत्ताधीश झाला. त्यानंतर २००५ ते २००७ प्रतापसिंग राणे आणि २००७ ते २०१२ दिगंबर कामत यांच्या कॉंग्रेसी सरकारांनी जे दिवे उजळले ते आम जनतेला माहीत आहेत आणि त्याचे परिणामदेखील जनता भोगत आहे. या पार्श्वभूमीवर दिगंबर कामत यांच्या काळात झालेली भा. भा. सु. मंच, दिगंबर कामत गेट वेल सून, मराठीला राजभाषेचा दर्जा या जनतेने सुरू केलेल्या आंदोलनावर आरुढ होऊन आणि आपला पाठिंबा या आंदोलनाला दाखवून जनमताचा कौल आपल्या बाजूने वळवीत भाजपाने सत्तेचे सिंहासन मिळविले. परंतु ते मिळविण्यासाठी जनतेला दिलेली आश्वासने, त्यांच्याशी केलेले वायदे यांचा विसर पडला की पुनश्च एकदा सत्तेसाठी काहीही…
भाजपाबद्दल थोडेसे….
कॉंगे्रस पक्षाचा पाया सर्वधर्मसमभाव या बेगडी संकल्पनेवर, तर भाजपाचा हिंदुत्वावर. परंतु दोघांचेही खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. ‘पार्टी विथ डिफरन्स, झिरो टॉलरन्स टू करप्शन, ट्रान्स्परन्सी अँड गुड गव्हर्नन्स’ या आभूषणांनी अलंकृत असलेला भाजप वास्तवात तसा आहे काय? कॉंग्रेसने आश्वासनांची घोंगडी भिजत ठेवली तर भाजपने ती खुंटीला अडकवून ठेवली. ‘पीपल्स मेमरी इज शॉर्ट’ असे समजून कदाचित जनता विसरली असेल किंवा आंदोलनातील नेते मंडळींना संतुष्ट करण्यात भाजपा यशस्वी झाला असेल. नाहीतर त्यांनी दिलेल्या खालील आश्वासनांची पूर्ती केव्हा होणार आहे?
* गेली पन्नास वर्षे भिजत पडलेला ‘मये स्थलांतरित मालमत्ता’ प्रश्न सत्तेवर आल्यास शंभर दिवसांत सोडवू असे आश्वासन भाजपाने मयेवासियांना दिले होते. अलिकडेच १९ डिसेंबरपूर्वी हा प्रश्न निकालात काढू असेही आश्वासन दिले होते.
* म्हापसा येथील बोडगेश्वराच्या मैदानात झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात आमचे सरकार आल्यास मराठीला राजभाषेचा दर्जा अवश्य देऊ असे राणा भीमदेवी थाटात नेत्यांनी जाहीर केले होते.
* प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच दिले जाणे आवश्यक आहे या आंदोलनात भाग घेतलेल्या भाभासुमंचचे नेते आता गप्प बसले आहेत की त्यांना गप्प बसवण्यात आले आहे?
* मांडवीतील कॅसिनोंचा प्रश्न कधी निकालात काढणार?
विरोधात असताना ज्या सनबर्न पार्टीला बेंबीच्या देठापासून उच्चरवाने विरोध करणार्या भाजपाने या पार्टीला परवानगी देऊन सांस्कृतिक क्षेत्रात चालेल्या अतिक्रमणाला रोखण्याऐवजी प्रोत्साहन दिले आहे.
* गोवा कला अकादमी, बालभवन, मिनेझिस ब्रागांझा संस्था, झालेच तर फोंड्याचे राजीव गांधी कला मंदीर, मडगावचे रवींद्र भवन, कुडचडेचे रवींद्र भवन यांसारख्या सांस्कृतिक संस्थांवर आपल्याच पक्षाच्या सदस्य, कार्यकर्त्यांना नेमणूक देऊन कॉंग्रेसने या संस्थांना पक्षीय अड्ड्यांचे स्वरुप दिले होते.

