*एकवीस दिवसांचा चित्रकवितेचा प्रवास*

0
204
  •  योगेश प्रभुगावकर

दुसर्‍या लॉकडाऊनच्या काळात सामाजिक माध्यमांवर अनेकजण एकमेकाला आव्हान करीत होते. दुसर्‍याला आव्हान देणं सोपं आहे, पण स्वतःच स्वतःला आव्हान देणारे नि ते पार पाडणारे विरळाच असतील. असं एक व्यक्तिमत्त्व पैंगीण येथील योगेश प्रभुगावकर ऊर्फ योगी. एकवीस दिवसात रोज एक याप्रमाणे रेखाचित्र काढण्याचं आव्हान त्यांनी स्वतःलाच दिलं. कुणाचं रेखाचित्र? ज्यांनी कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता कोविद-१९च्या काळात कोरोना पीडितांना आपल्या क्षमतेनुसार साह्य केलं अशा ज्ञात-अज्ञात लोकसेवकांची छायाचित्रं काढली. याविषयी स्वतः चित्रकाराच्या आंतरिक ऊर्मीची नि समाजऋणाच्या भावनेची झलक दाखवणारी रेखाचित्र नि त्याचं मनोगत…

लॉकडाऊन होऊन आठवडा होत आला होता. दिवस कसा घालवायचा हा यक्षप्रश्न डोळ्यांसमोर होता. काहीच सुचत नव्हतं. काही करण्यात मन लागत नव्हतं. असाच बसलो होतो मोबाईल घेऊन. फेसबुक चाळताना आदरणीय रतन टाटाजींनी विविध टाटा ग्रूपच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात लढायला मोठी मदत केल्याची बातमी वाचली. बरोबर इतर काही लोकांचे उल्लेखही होते. मन म्हणाले.. एक इनका स्केच हो जाए! त्यांचा चांगला फोटो निवडला. त्यांच्या स्केच (रेखाचित्र)ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण तो प्रतिसाद अर्थातच माझ्याइतकाच त्या रतन टाटाजींच्या व्यक्तिमत्वाला होता. दिवस संपत आला. उद्या काय असं मन विचारु लागलं. असंच फेसबुक चाळायला लागलो. फेसबुक मेसेंजरवर आलेली श्री. भास्कर रिवणकर यांनी कुणालातरी मदत हवीय म्हणून मारलेली हाक वाचली. त्याला मी दोघा-तिघांचे नंबर पाठवून दिले. काही वेळाने बघितले तर कितीतरी लोकांना संपर्क करीत, मी दिलेल्या नंबरांचा उपयोग करीत त्याने काम फत्ते केले होते. एकंदर या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या वेळेचा असा समाजोपयोगी वापर करणारा एक भला माणूस मला त्यांच्या रूपात दिसला. म्हटलं उद्या यांचे रेखाचित्र काढू.

मनात विचारधारा सुरू झाली. लोकांनी एव्हाना फेसबुकवर इतर मित्रांना टॅग करून एकवीस दिवसांची वेगवेगळी आव्हाने द्यायला सुरुवात केली होती. म्हटलं मी दुसर्‍यांना का कामाला लावू? मारूनमुटकून का मनापासून हे न तपासता… म्हटलं हे एकवीस दिवसात एकवीस रेखाचित्रं काढण्याचे सेल्फ चॅलेंज मीच का नाही स्विकारावं? ठरवलं मग आणि भास्कर रेवणकरचं रेखाचित्र झाल्यावर पोस्ट करतांना त्याखाली लिहिले, ‘‘मी २१ दिवसात २१ व्यक्तींची रेखाचित्रे काढण्याचे आव्हान स्वीकारले आहे, ज्या व्यक्ती समाजाला या लॉकडाऊनच्या काळातील कठीण परिस्थितीत उपयोगी पडल्या’’ आणि हा प्रवास सुरू झाला. वेगवेगळे चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्या. काहीनी विचारलं भास्कर का? मग विचार केला प्रत्येक रेखाचित्राबरोबर माहितीही देणे संयुक्तिक ठरेल. मी चांगले लिहिणार्‍यातला नाही. मग एक विचार सुचला, कविता रुपाने ही माहिती सांगावी. माझा मित्र कविराज अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्त्व असलेला विराज प्रभुदेसाई. म्हटलं विचारून तर बघू. मला नकार न देण्यामध्ये त्याचा नंबर पहिला. त्यानेही आढेवेढे न घेता ‘हो’ म्हटले.
मग तिसरा कोण? हा प्रश्न उभा राहिला. म्हटलं अशावेळी फेसबुकच कामाला येईल. शोधून तर बघू. फेसबुक उघडलं. एकच नाव डोळ्यासमोर आले डॉ. केतन भाटीकार. लॉकडाऊन सुरू झाल्यावर पहिल्या दिवसापासून पायाला भिंगरी बांधल्यागत मदतीसाठी अखंड धावपळ करत होते. विराजला म्हटलं लिही बाबा या माणसावर कविता. मी उद्या त्यांचं चित्र रेखाटतो. सांगितल्याप्रमाणे त्याने कविता केली. म्हणाला हा एक वेगळाच अनुभव आहे. काम थोडं कठीणच आहे. पण जमेल. मनात एक आत्मविश्‍वास होता, विराजची गाडी एकदा व्यवस्थित चालू झाली की मग तो थांबणार्‍यातला नाही. त्याने प्रत्येकाला आधी फोन करायचा, माहिती घ्यायची, मग सुचतं तसं लिहीत जायचं.
यानंतर परत एकदा मी फेसबुक उघडलं नवीन चेहरा शोधण्यासाठी. बघितलं तर आमचे आमदार स्वतःच सामान उचलून नेताना कुणीतरी त्यांचा फोटो टाकला होता. त्यांनी बरोबरच्यांना घेऊन पैंगीणमध्ये कुणालाही त्रास होणार नाही याची सुरवातीपासूनच काळजी घेतली होती. म्हटलं आज यांना चितारु. एवढ्यांत फेसबुकचं नोटिफिकेशन आलं की इजिदोर फर्नांडिस आणि आणखी नऊ जणांचा आज वाढदिवस आहे. म्हटलं.. हा तर दुग्धशर्करा योग! चौथं रेखाचित्र तयार झालं. कविराजने कविता पण छान लिहिली. कविराज टॉप गियरमध्ये गाडी चालवायला लागला होता. एका दिवसात माहिती घेऊन शीघ्र कविता करणे हे महाकठीण काम.. ही कल्पना होतीच. त्यामुळे सुरवातीला थोडी धाकधूक वाटायची. कालांतराने ती कधी नाहीशी झाली कळलेच नाही.

त्यानंतर ज्यांना देवासमान म्हटलं जातं, ज्याच्या नुसत्या गोड बोलण्याने रोग बरे होतात अशी ख्याती असलेल्या डॉ. सुरज प्रभुदेसाई यांची इतर डॉक्टरांना बरोबर घेऊन या दिवसातील सरकारला मदत करण्याची धडपड बघितली व सगळ्या खाजगी डॉक्टरांचा प्रतिनिधी म्हणून यांचे रेखाचित्र चितारायचं ठरलं. हे डॉक्टर कविराजांचे सख्खे बंधू. सख्ख्या भावावरच कविता करायची? कविराजचा यक्षप्रश्न. पण हो-नाही, हो-नाही करत त्याने छोटीशी पण सुंदर कविता रचली. मग पुढे कोण हा प्रश्न मागे पडला. एक एक माणसं सुचत गेली.
नगरसेवक म्हटलं की भ्रष्ट, खुर्चीमागे लागणारा व पैशांमागे धावणारा असाच समज आहे. ह्याला अपवाद असणार्‍यातील एक असा आमचा पाळोळे मधला दयानंद पागी. खर्‍या अर्थाने नगर-सेवक. एकदम साधा, लोकांत मिसळणारा व कसलीही अपेक्षा न धरता हाकेला धावून जाणारा. यांचे रेखाचित्र काढायचं ठरवायला जास्त वेळ लागला नाही. त्यांच्यावरची कविराजची कविता जरा जास्तच खुलली.
एक विचार आला, एका हाडाच्या समाजसेवकाचं रेखाचित्रण करावं आणि डोळ्यांसमोर एक नाव आलं सतीश पैंगीणकर. अक्षरशः कुठलेही काम असू दे.. नेहमी स्वतःहून धावून जाणारा हा माणूस. सर्पमित्र म्हणून ओळखळा जाणारा व अनेक चांगले गुण असलेला असा हा. रेखाचित्र काढले, कविराजकडून सुटसुटीत व झकास कविता मिळाली. आणखीन एक व्यक्ती लोकांपर्यंत पोचली.
आता म्हटलं एक तरुण निवडू. यालाही मोठासा वेळ नाही लागला. पर्तगाळचा जयराज पुराणिक. व्यवसायाने वकील, पण नेहमीच समाजासाठी काही ना काही करावे हा ध्यास. लहान मूर्ती पण विचार थोर अशी वागणी. बरोबर वाचन, अध्यात्माची गोडी व भारतीय संस्कृतीशी याची नाळ जुळलेली. कविराजला कविता करणं फारच सोपं झालं. अत्यंत सकारात्मक स्पंदनांमध्ये रेखाचित्र व कविता तयार झाली.
नगरसेवक झाला आता एक पंच निवडू असा विचार मनात येत असतानाच फेसबुकच्या माध्यमातून एक बातमी वाचनात आली. एक कर्तव्यनिष्ठ अशा कोरोनाग्रस्तांना बघणारी डॉ. सजिया सिद्दीकी वर इंदोरमध्ये हल्ला झाला तरीही ती न डगमगता, न घाबरता परत कोरोनाग्रस्त रूग्णांच्या सेवेला रूजू झाली. डोकं जरा सुन्न झाले. महाभारत चालू असल्यामुळे म्हणा जिथे सुयोधन आहे तिथे दुर्योधन असेलच की अशी मनाची समजूत घालत तिलाच चितारण्याचं नक्की केलं. आजपर्यंत सर्वांना फोन करून त्यांचे अंतरंग जाणून घेऊन कविराजाने कविता केल्या होत्या. पहिल्याच खेपेला त्यात खंड पडणार होता. कविराज जरा साशंक होता. त्याला म्हटलं एकदा प्रयत्न करून तर बघ. नेटवरून मिळेल तेवढी माहिती त्याला गोळा करून दिली. एक छानसा फोटोही मिळाला आणि काय आश्चर्य! कविराजला एक छानशी कविताही जमली. नववी चित्रकविता पूर्ण झाली.

ह्या सगळ्या गडबडीत व्हॉट्‌सऍप चाळताना एक संस्कृत भाषा विद्वान व अत्यंत धार्मिक असा विराज पै खोत बर्‍याचशा ग्रूपवर झळकत होता. वेगवेगळी माहिती लोकांपर्यंत पोचवून जमेल ती मदत करायला धडपडत होता. इतरांनाही आव्हान करीत होता. म्हटलं दहावा नंबर याचाच. चित्र चांगले आले व कविता चांगली जमली.
डोक्यातून पंच मंडळींचा विचार गेला नव्हता. त्यासंदर्भात कोण असा विचार करण्याचा प्रश्नच नाही उद्भवला. एकच नाव डोक्यात आले अजय लोलयेंकर. पूर्वीपासून अडिअडचणीला धावून जाणारा. पहिल्या दिवसापासून हा कामाला लागलेला. गरजेच्या वस्तू लोकांपर्यंत पोचवणारी लोलये पंचायत ही गोव्यातील बहुतेक पहिलीच पंचायत असावी. त्याचं श्रेय याला आणि इतर पंच मंडळींना. कविराजने कवितेतून त्याचे सगळे गुण दाखविले. आता कविराजची कविता जास्तच खुलायला लागली होती. अकरावी चित्रकविता उत्तम साकारली.
बाराव्या चित्रकवितेसाठी आमच्या सर्वांचा मार्गदर्शक, मित्र.. मूर्ती लहान पण कीर्ती महान.. असा हाडाचा शिक्षक अनिल कामत सर यांना निवडलं. या मालिकेत चपखल बसणारी अशी ही व्यक्ती. फक्त काणकोण मध्येच नव्हे तर संपूर्ण गोव्यांत याची महती. याचा परिवार खूप मोठा. सेवा रक्तात भिनलेली. माणसाने सकारात्मक कसं राहावं याचं हे उत्तम उदाहरण. कविराजने त्यांची कवितेतून सुंदर ओळख करून दिली. मुद्दाम मला त्यांच्या कवितेतील दोन ओळी इथे नमूद कराव्याशा वाटतात… ‘‘हय गा ह्या दोन तूज्या शब्दांनी जगाक जिकपाची ताकद गा’’. चित्रकविता साकारून झाली. नेहमीप्रमाणे प्रतिसादही उदंड मिळाला. सगळे चित्र व कविता दोघांचीही भरभरून वाखाणणी करायचे. त्या माणसातील चांगुलपणाला दिलेली ती दाद होती.

मग म्हटलं एक छानस जोडपं चितारु. लोकांच्या मुलांना आपलीच मुलं समजून काळजी घेणारा, स्पेशल मुलांकरिता ट्रस्ट स्थापन करणारा, डॉक्टर हा व्यवसाय न समजता लोकसेवा म्हणून काम करणारा डॉ. निलेश उसगांवकर व त्याला तेवढीच मोलाची साथ देणारी त्यांची अर्धांगिनी सौ. दीपा यांच्याशिवाय योग्य आणखी कोण असणार? कविराजाने त्यांचा मोठेपणा कवितेत सुरेख मांडला. रेखाचित्र दोघांचे असल्याने थोडा वेळ लागला खरा पण अशा सेवाभावी जोडप्याचं चित्र चितारताना वेळेचं भान नाही राहात हेच खरं.
नंतर साकारला आमच्या मोखर्ड गावातील शिरीष पै ज्याची ओळखसुद्धा करून द्यायची गरज नाही असं व्यक्तिमत्त्व. कविता व रेखाचित्र छान जूळून आलं. त्याची एकेक वैशिष्ट्य सांगताना कविराजाची कविता जरा जास्तच लांबली. पण तरीही रसाळ वाटली. सतत धडपडत राहणारं हे व्यक्तिमत्त्व या कठीण प्रसंगातही मागे कसे राहील? चौदावी चित्रकविता पूर्ण झाली.

गोव्यातील इतरही भागातील कोणी चितारायचं म्हणून व्हॉट्‌सऍप व फेसबुक धुंडाळलं. काही मिनिटातच एका युवकावर शिक्कामोर्तब केलं. नाव सागर प्रभू लवंदे. इंजिनिअर असूनही ऑनलाईन सागरवार्ता चालवणारा हा युवक. ह्यालाही सतत काहीना काही समाजासाठी करण्याचा ध्यास. ह्यांच्या घरातच समाजसेवेचे बाळकडू. सागरचं रेखाचित्र तयार झालं, पण वेगळीच अडचण आली. विराज म्हणाला, आज कसंच शक्य नाही. घरातील कामामुळे आज एक दिवस ब्रेक असे कविराज म्हणाला. पण मला आता थांबायचं नव्हतं. त्याच्याच परवानगीने मी कठीण समयी नेहमी उपयोगी पडणार्‍या आणखी एका कवी मित्राला श्रीवल्लभ दुभाषी ला हाक मारली. त्याने एका पायावर तयारी दाखवून माझं काम एकदम सोप्पं टरून टाकलं. कवी वल्लभने एक छानशी कविता लिहून दिली.. सागरची सर्व गुणवैशिष्ट्ये दाखवणारी. आणखी एक चित्रकविता साकारली.

आता म्हटलं थोडे वैद्यकीय क्षेत्राकडे वळू. काही फार्मसीनी खूप चांगली सेवा या अडचडणींच्या काळातही लोकांना देणं चालू ठेवलं होतं, अडीअडचणींचा सामना करून. हिंदू फार्मसी व राज वैद्य हे यातलं मोठं नाव. गोव्यात तरी त्यांना न ओळखणारा माणूस सापडणं कठीण. पण मला कुणा तरुण युवकाला लोकांपर्यंत पोचवायचं होतं. मडगावी फार्मसी घातलेल्या या युवकाने नुसती फार्मसी चालूच नाही ठेवली तर अडचणीत आलेल्या लोकांना औषधे घरीही पोचवली, कसलीही अपेक्षा न बाळगता. कविराजने छोटी पण गोड कविता लिहून दिली. आणखी एक रेखाचित्र कवितेसह साकारलं ते अक्षय प्रभूगांवकर यांचं.

एक वेगळ्या प्रकारची व्यक्ती सतराव्या रेखाचित्राकरिता मी निवडली, ज्याचा आदर्श आजच्या युवकांनी घ्यावा, असा हा युवक. इंजिनीयरची पदवी घेऊनही शेतीकडे वळून अत्यंत यशस्वीरीत्या गीर गायीपासून दुध, तूप वगैरे आणि भाजीपाला व तत्सम वस्तू पिकवणारा हा अवलिया. स्पष्ट वक्ता, कष्टकरी, हुशार व असे अनेक गुण असलेला हा युवक. फक्त चांगले गुणच नाही तर वाचन, फोटोग्राफी व अशा अनेक चांगल्या आवडी असणारा हा अवलिया. याचा एक एक गुण सुरेखपणे मांडत कविराजने कविता लिहिली. अशा या थोर अवलियाचे रेखाचित्र चितारताना मला मोठे कष्ट पडले नाहीत. आणखी एक चित्रकविता सहज साकारली.

दिवस जात होते. दैनिक तरुण भारत मिळायला लागले होते. सकाळी ते वाचताना डॉ. एडविन गोम्स या देवमाणसावरचा लेख वाचनात आला. म्हटलं या देव डॉक्टरचे चित्र माझ्या या माळेत हवेच. या देवमाणसाचे व त्यांच्या टीमचे कठोर परीश्रम गोव्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण पूर्णपणे बरे होण्यास कारणीभूत आहेत हे कळल्यावर ीज्ञशींलह करण्यात जो आनंद मिळाला तो अवर्णनीय होता. फोटो मिळवण्यासाठी पत्रकार मित्र श्री. निलेश करंदीकरची मोलाची मदत झाली. चित्रकवितेची माळ पूर्ण होत होती.

एकोणीस व वीस चित्रकविता साकारून झाल्या. आता शेवटचे रेखाचित्र. सामान्य माणसाला प्रतिनिधित्व देण्यावर आमचे दोघांचे एकमत होते. पण नक्की कोणाचं काढावं हे ठरत नव्हतं आणि फेसबुक चाळताना एक सुंदर चित्राने माझा ठाव घेतला. या लॉकडाऊनच्या काळात वडलांबरोबर खिदळत असलेल्या मुलीचे चित्र रेखाटायचे ठरवले. त्यांनी अत्यंत आनंदाने हा सुंदर फोटो मला मेलवर पाठवला आणि शेवटचं चित्र साकारलं, वडील शेखर नाईक व त्यांची मुलगी श्रियाच्या हसर्‍या रूपात. यावर कविता लिहिताना कविराजने वेगवेगळ्या श्रेत्रांतील सर्वजणांचा उल्लेख करून, त्याप्रति आदरणीय भाव व्यक्त करून एक छानसा संदेशही त्याने या कवितेतून दिला.
ही एकवीस चित्रकवितांची माळ या कविराजाच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हती. त्याने जी साथ दिलीय त्याला तोड नाही. घरच्या मंडळींचा खंबीर आधार जेवढा मोलाचा तेवढाच तुम्हा मित्रमंडळींचा व देवदेवतांचे आशीर्वाद ह्यामुळेच हे आव्हान आम्ही या अशा कठीण परिस्थितीतही यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो. तुम्हा सर्वांची साथ आहेच ती अशीच निरंतर रहावी अशी विनंती करून आणि ही परिस्थिती लवकरच पूर्ववत होवो अशी प्रार्थना करून हा चित्रकवितेचा प्रवास मी इथेच संपवतो. माझं रेखाचित्रे काढण्याचं वेड मात्र यापुढेही असेच चालू राहील.

दोन मोठी माणसं सुरवातीपासून डोळ्यांसमोर होती. त्यातले एक म्हणजे गोव्याचे आरोग्य मंत्री एक तडफदार व्यक्तिमत्त्व श्री. विश्वजित राणे. आज गोवा ‘सेफ झोन’ किंवा ‘ग्रीन झोन’ मध्ये जाण्यामागे यांचा मोलाचा वाटा. पहिल्या दिवसापासून उसंत न घेता कार्यरत असलेला हा मंत्री महोदय आणि दुसरे म्हणजे आमच्या सगळ्या जनतेचे लाडके प्रधानमंत्री, एक जागतिक पातळीवरील महान व्यक्तिमत्त्व श्री. नरेंद्र मोदीजी. आज महान राष्ट्रप्रमुखांच्या यादीत यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. दोघांची काम करण्याची पद्धत किंवा शैली मला फार आवडते. दोघांवर कविराजने कविताही जबरदस्त लिहून दिल्या.