एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी लागू

0
21

>> प्रतिबंधित वस्तूंची यादी जाहीर; नियम मोडल्यास १ लाखांचा दंड

देशात एकल वापराच्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालपासून म्हणजेच, १ जुलैपासून देशभरात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. या अंतर्गत प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू बंद केल्या जाणार आहेत. त्यामध्ये दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या अनेक गोष्टींचाही समावेश आहे. नव्या नियमांतर्गत ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे, त्यांची यादी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केली आहे.

एकल वापर प्लास्टिक म्हणजे, प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो. त्या वस्तूंचा एकदा वापर केल्यानंतर फेकून द्यायच्या असतात. जर या वस्तूंचा वापर सातत्याने केला, तर त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचण्याचा धोका संभवतो.

जर कोणी एकल वापर प्लास्टिकचा वापर करताना आढळले, तर त्यांना शिक्षा केली जाईल, असे पर्यावरण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. बंदी घातलेल्या उत्पादनाची निर्मिती किंवा विक्री केल्यास पर्यावरण कायदा कलम १५ अंतर्गत ७ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

सध्या एफएमसीजी क्षेत्राला या बंदीतून सूट देण्यात आली आहे; पण पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य आहे का, याची काळजी घ्यावी लागेल.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, देशात दररोज २६ हजार टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यापैकी फक्त ६० टक्के कचरा गोळा केला जातो. उर्वरित कचरा नदी-नाल्यांमध्ये मिसळतो किंवा तसाच पडून राहतो.

भारतात दरवर्षी २.४ लाख टन एकल वापर प्लास्टिक तयार होते. त्यानुसार, प्रत्येक व्यक्ती दरवर्षी १८ ग्रॅम एकल वापर प्लास्टिक कचरा निर्माण करते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०२१ रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यामध्ये एकल वापर प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याचे नमूद केले होते. त्यानुसार कालपासून ही बंदी लागू झाली.

कोणत्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी

प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (७५ मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या), प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स, फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक, आईस्क्रीम स्टिक, थर्माकोल, प्लास्टिकच्या प्लेट, कप, ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ व ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्विटेशन कार्ड, सिगरेटचे पॅकेट, १०० मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बॅनर, स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणार्‍या गोष्टी).