राज्य विधानसभा निवडणूक जवळ येत चालली आहे, परंतु प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष मात्र अंतर्गत लाथाळ्यांत अडकला आहे. पक्षाचे निरीक्षक के. सी. वेणुगोपाल नुकतेच गोव्यात संभाव्य बंडखोरीची चाचपणी करायला येऊन गेले. असंतुष्टांनी त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, कागाळ्याही केल्या. परिणामी, पक्षाच्या अल्पसंख्यक विभागाच्या अध्यक्षांची उचलबांगडी करण्यात आली आणि कार्याध्यक्षपदी नवी नेमणूक झाली. तामीळनाडू विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची बक्षिसी म्हणून गिरीश चोडणकर यांना एकाएकी प्रदेशाध्यक्षपदी आणण्याचा श्रेष्ठींचा निर्णय गोव्यातील काँग्रेसच्या विद्यमान टीमला फारसा मानवलेला दिसत नाही. चोडणकर हे जुनेजाणते नेते जरूर आहेत आणि त्यांची पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी जुनी जवळीक आहे हेही खरे, परंतु पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होत असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना, अगदी दक्षिण गोव्याच्या खासदारांनाही विश्वासात न घेता प्रदेशाध्यक्षपदात अचानक केला गेलेला बदल स्थानिक काँग्रेसजनांना मानवलेला दिसत नाही. गिरीश चोडणकर हे उत्तम संघटक आहेत, परंतु पक्षसंघटना नव्याने बांधण्याएवढा त्यांच्यापाशी वेळ हाती नाही आणि मुख्य म्हणजे विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. ते स्वतःच निवडणुकीत कधी यशस्वी ठरलेले नाहीत ही त्यांची मर्यादा आहे. काँग्रेस पक्ष राज्यात गेली पंधरा वर्षे सत्तेबाहेर आहे. अँटी इन्कम्बन्सी असली आणि दक्षिण गोव्यात भाजपविरोधी वारे वाहत आहे असे जरी मानले, तरी त्याचा लाभ उठवण्यासाठी विरोधी पक्षांची जी एकजूट हवी आहे त्या दिशेने एकही पाऊल काँग्रेसकडून पडलेले दिसत नाही. आम आदमी पक्ष आजवर एकला चलो रे ची बात करीत आला होता, परंतु अनुभवान्ती त्यांची ती खुमखुमी जिरलेली दिसते. त्यामुळे समविचारी विरोधकांची युती करण्याचा विचार आम आदमी पक्षाने बोलून दाखवला आहे. गोवा फॉरवर्ड काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास पूर्वीही उत्सुक होता आणि आताही असेल. रिव्हल्युशनरी गोवन्स पक्षामध्ये उभी फूट पडली आहे, परंतु अस्तित्वासाठी काँग्रेससोबत राहणे त्याला आवश्यक ठरणार आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा विचार प्रबळ होत असतानाच अचानक ‘गोवा काँग्रेस पक्ष’ नावाने एक नवा राजकीय पक्ष एकाएकी स्थापन केला गेला आणि त्याने सारी समीकरणेच बदलून टाकली आहेत. ह्या पक्षाच्या स्थापनेमागे नेमके कोण आहे, कोण त्यातून आपली ईप्सिते साधून घेणार आहे आणि मतदारांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि गोवा काँग्रेस यांच्यात नावावरून जो संभ्रम निर्माण होईल, त्याचा फटका राष्ट्रीय काँग्रेसला किती बसेल असे अनेक प्रश्न त्यातून उपस्थित झाले आहेत. काँग्रेस पक्षाला आपल्यासोबत इतर सर्व विरोधक यावेत आणि संघटितपणे बलाढ्य भाजपचा मुकाबला करावा असे वाटत असेल, तर आधी स्वपक्षातील लाथाळ्या थांबवाव्या लागतील. मध्यंतरी अमित पाटकर यांनी केलेल्या आंदोलनाचे श्रेय काँग्रेस पक्षाला घेण्याऐवजी नूतन प्रदेशाध्यक्षांनी त्या आंदोलनाशी काँग्रेस पक्षाचा काही संबंध नाही असे सांगून पक्षाचे हसे करून घेतले. अशी गटबाजी राहणार असेल, तर निवडणुकीत मतदार तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला गांभीर्याने का घेईल? काँग्रेस नेतृत्वाने आता बेरजेचे राजकारण केले पाहिजे, वजाबाकीचे नव्हे. निवडणूक तोंडावर आहे आणि पक्षासाठी आव्हानात्मक आहे. सातत्याने मागील निवडणुकांत मतदारांनी भरभरून जागा दिल्या, परंतु ना सरकारे बनवता आली, ना विजयी आमदारांना आपल्या पक्षात राखता आले. प्रत्येक निवडणुकीनंतर जनतेने काँग्रेसच्या तिकिटावर निवडून दिलेले लोक सत्तेसाठी भाजपात उडी टाकत राहिले आहेत. मगोच्या बाबतीत एकेकाळी हेच व्हायचे, त्यातून मगो पक्ष तेव्हा रसातळाला गेला होता. काँग्रेस पक्ष आज राज्यात अस्तित्वाची लढाई लढतो आहे. अशा वेळी आपसातील सर्व मतभेद विसरून आणि समस्त विरोधकांना सोबत घेऊन एक मजबूत विरोधी आघाडी निर्माण करण्यास सर्वांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे. भाजपाचा अश्वमेध रोखण्याची ताकद विरोधकांत आहे का ह्याबाबत साशंकता आहे. ती आहे असे वाटत असेल तर ती दाखवण्याची वेळ हीच आहे. पक्षातील ज्येष्ठता, मानसन्मान, पदे ह्यापेक्षा पक्षाचे अस्तित्व अधिक महत्त्वाचे मानून आपसातील मतभेद मिटवून एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान निर्माण करण्यात कितपत यश येते त्यावर नूतन प्रदेशाध्यक्षांचे संघटनकौशल्य ठरेल. हाताशी असलेल्या अल्पवेळात पक्षबांधणी करणे आव्हानात्मक आहे, परंतु पक्षाचे अस्तित्व आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आपली वट राखण्यासाठी अपरिहार्यही आहे. आपसातील मतभेद निवडणुकीनंतर पाहा. आधी एकत्र तर या!

