26 C
Panjim
Monday, January 18, 2021

ऍसिडिटी… ते … अल्सर…

 • डॉ. मनाली म. पवार
  (सांतइनेज, पणजी)

मनामध्ये राग, संताप, अस्वस्थता, कुरकुर हे ताब्यात आणल्याखेरीज अल्सरवर संपूर्ण नियंत्रण ठेवता येत नाही आणि ते पुन्हा पुन्हा होऊ शकतात. पित्त व वातदोषामुळे विशेषतः आमाशय व लहान आतडे याठिकाणी पित्त वाढल्याने व साठत राहिल्याने हळूहळू व्रणोत्पत्ती होते.

अल्सर म्हणजे जखम. शरीरामध्ये कोणतेही जंतू जाऊ नयेत म्हणून शरीराभोवती त्वचेचे आवरण असते. या त्वचेला छेद गेला, फाटली तर त्याबरोबर जंतू आत जाऊ शकतात. आपल्या पचनसंस्थेमध्ये जीभ, गाल, ओठ, घसा, अन्ननलिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे … यांमध्येदेखील आवरण असते. या आवरणाला धोका पोचला तर जखम होणारच. आपण ज्याला अल्सर म्हणतो, तो मुख्यतः होतो जठरामध्ये. काही वर्षांपूर्वी मानसिक अस्वस्थता, चिंता, काळजी व खाण्यामध्ये फार तिखट असले की पोटात जखम किंवा अल्सर होतो असा समज प्रचलित होता. मग या अल्सरमध्ये होणार्‍या ऍसिडच्या त्रासाला शांत करण्यासाठी ‘अँटासिड्‌स’चा मारा व दुधाचा अतिरेक, अभिषेकच म्हणा ना… अशा प्रकारे इलाज केला जायचा.
पूर्वी निदान करण्यासाठी बेरिअम देऊन क्ष-किरणांनी तपासणी होत असे. आता ‘गॅस्ट्रोस्कोप’चा वापर केला जातो.

आधुनिक वैद्यकात ज्याप्रमाणे ‘अल्सर’ नावाचा रोग सांगितला जातो, त्याप्रमाणे आयुर्वेदिक ग्रंथात असा विशिष्ट रोग सांगितलेला आढळत नाही. अल्सर म्हणजे पोटात व्रण तयार होणे हे आयुर्वेदात रोगाचे एक लक्षण म्हणून सांगितलेले आढळते. अल्सर हा जठरात किंवा आतड्यात होऊ शकतो. आयुर्वेदिकदृष्ट्या विचार केला असता पित्त व वातदोषामुळे विशेषतः आमाशय (जठर) व ग्रहणी (लहान आतडे) या ठिकाणी पित्त वाढल्याने व साठत राहिल्याने हळूहळू व्रणोत्पत्ती होते.
‘अम्लपित्त व ग्रहणी’ या विकारात पित्तप्रधान अवस्था बराच काळ टिकली तर त्याचे पर्यवसान व्रणात होऊ शकते. आधुनिक वैद्यकही पोटात अम्लता प्रमाणाबाहेर वाढली की अल्सर होतो, असे मानतात. आयुर्वेदामध्ये ‘अन्नद्रवशूल’ नावाचा एक रोग सांगितलेला आहे.

 • भोजन पचल्यानंतर….
 • पचत असताना….
 • खाल्ल्यानंतर लगेचच…
  जो शूळ (दुखणे) होतो त्याला अन्नद्रवशूल असे म्हणतात.
  पथ्यकर गोष्टी सेवन केल्या तरी, अपथ्यकारक पदार्थ सेवन केले किंवा काहीच न खाता उपवास केला तरी हा शूळ थांबत नाही. फक्त उलटी होऊन पित्त पडून गेले तर मात्र काही वेळापुरते बरे वाटते. पण अशा या अन्नद्रवशूळाची जर चिकित्सा औषधोपचार केले नाहीत तर मात्र व्रणोत्पत्ती होऊ शकते. असा व्रण झालेल्या व्यक्तींना काही जरी खाल्ले किंवा पोटात गेले तरी दुखायला सुरुवात होते. जठरात व्रण असल्यास खाल्ल्यावर लगेच किंवा खाताखाताच दुखायला सुरुवात होते. लहान आतड्यात व्रण असल्यास खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे अन्न तेथे पोचल्यानंतर दुखायला लागते. व्रण ज्याठिकाणी असतो त्याठिकाणची आजूबाजूची त्वचा संवेदनशील झालेली असते. अन्नपदार्थांचा त्याठिकाणी संबंध आला की लगेचच तेथे क्षोभ उत्पन्न होऊन दुखते. व्रणाची सुरुवात असेल किंवा व्रण छोटा असल्यास बारीक बारीक दुखते.
  व्रण मोठा असेल तर कळा येतात. लहान आतडे हे पित्ताचे स्थान असल्यामुळे या ठिकाणी व्रण उत्पन्न होण्याची शक्यता जास्त. तसेच तरुण वय हाही पित्ताचा काळ. या कालावधीत व्रण उत्पन्न होण्याची शक्यता जास्त असते. पित्तवर्धक अशा तिखट, मसालेदार, चटपटीत, खारट, आंबट पदार्थांचे अतिसेवन केल्यास वेदना वाढतात.
  अल्सरचे निदान हे बहुतांशी जरा उशिराच होते. एकतर असह्य पोटदुखी किंवा रक्तस्राव होऊ लागल्यावर रुग्ण डॉक्टरकडे जातो व त्या काळात बराच उशीर झालेला असतो. या दोन्ही अवस्था कष्टकारक असतात.

एकदा व्रण उत्पन्न झाला की तो भरून यायला वेळ तर लागतोच पण बरोबरीने प्रत्येक वेळेला काही खाल्ले तर पोटात दुखते. काय खायचे, काय टाळायचे यावर कडक संयम ठेवावा लागतो. एवढे करूनही अल्सर बरा झाला तरी तो परत उद्भवू न देणं हे फार अवघड काम असतं. पित्त वाढवणार्‍या गोष्टींवर कडक निर्बंध ठेवावा लागतो नाहीतर बरा झालेला व्रण पुन्हा त्रास द्यायला लागतो. अल्सरवर केल्या जाणार्‍या शस्त्रक्रियांचेही शरीरावर अनेक परिणाम होत असतातच. त्यामुळे तोही मार्ग निर्धोक नसतोच. या सर्व कारणांमुळे अल्सर होणार नाही यासाठी अगोदरच खबरदारी घ्यावी.
अल्सरची मुख्य कारणे…..

 • ‘‘हरी, वरी व करी’’ ही अल्सरची मुख्य कारणे आहेत.
 • हरी म्हणजे आजचे जे धावपळीचे जीवन चालले आहे ते मुख्य कारण आहे. वेळी-अवेळी जेवणे, पूर्वीचे अन्न पचलेले नसताना जेवणे. कमी प्रमाणात खाणे, अति प्रमाणात खाणे, खाण्या-पिण्याला महत्त्व न देणे इत्यादी.
 • ‘वरी’ म्हणजे अति चिंता, अति काळजी, संताप, दिवसा झोपणे.. रात्री जागरण करणे. तसेच सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे स्पर्धा.
 • ‘करी’मध्ये अति चहापान- कॉफीचे अतिसेवन, चटपटीत मसालेदार पदार्थांचे सेवन, फास्टफूडचे सेवन, पॅकेटबंद पदार्थांचे अतिसेवन, मद्यपान इ.
  काय खबरदारी घ्यावी?…..
 • आंबवलेले पदार्थ नियमित खाऊ नये.
 • तिखट, मसालेदार अतिप्रमाणात खाऊ नये.
 • चहा-कॉफीचे प्रमाण कमी ठेवावे.
 • मद्यपान करू नये. उपाशीपोटी तर मुळीच करू नये.
 • अकारण चिंता करू नये.
 • रात्री जागरण करू नये.
 • नुसता चहा पिऊन पिऊन उपवास करू नये
 • वेदनाशामक गोळ्या वारंवार घेऊ नयेत.
 • अन्न चावून खाणे.
 • मनामध्ये राग, संताप, अस्वस्थता, कुरकुर हे ताब्यात आणल्याखेरीज अल्सरवर संपूर्ण नियंत्रण ठेवता येत नाही आणि ते पुन्हा पुन्हा होऊ शकतात.
 • शरीराला सहा ते आठ तास शांत झोप मिळणे ही शरीराची प्राथमिक गरज आहे.
 • मन स्थिर ठेवणे व्यक्तीच्या वृत्तीतच आहे. रोज व्यायाम केल्याने आणि स्वतः घालून दिलेली शिस्त पाळल्याने शरीराला फायदा तर होतोच, पण मन शांत होण्यास मोठी मदत होते.
 • दररोज सकाळ-संध्याकाळ गरम करून गार केलेल्या दुधात शतावरी कल्प, गोंदंती भस्म किंवा अविपत्तीकर चूर्ण अशी पित्तशामक रसायने घेतल्यास अधिकच उत्तम.
 • दररोज सकाळ- संध्याकाळ घरी बनवलेले चमचाभर लोणी- खडीसाखर घ्यावी.
 • घरी बनवलेल्या साजूक शुद्ध तुपाचे नियमित सेवन करावे.
 • जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात.
 • रात्रीचे जेवण फार उशिरा करू नये.
 • भूक लागलेली नसताना जबरदस्ती खाऊ नये. तसेच सतत काही ना काही तोंडात टाकण्याची सवय असू देऊ नये.
 • साळीच्या लाह्या दुधात भिजवून खाव्यात किंवा दुधात शिजवलेला मऊ भात खावा.
 • ज्येष्ठमध, बला, शतावरी यासारख्या मधुर रसाच्या व जखम भरून आणणार्‍या वनस्पतींनी सिद्ध केलेले तूप घ्यावे,
 • कामदुधा, प्रवाळपंचामृत, प्रवाळ भस्म, मौक्तिक भस्मांसारखी औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
 • व्रण भरून आणणार्‍या औषधांनी सिद्ध दुधाची बस्ती घेणे लहान आतड्यातील अल्सरवर उत्तम काम करताना दिसते.
 • बरोबरीने गुलकंद, धात्री रसायन अशा पित्तशामक रसायनांचा वापर करावा.
  पथ्यकर आहार ….
 • जुने तांदूळ, साळीच्या लाह्या, गहू, ज्वारी, मूग, दुधी कोहळा, पडवळ, बटाटा, तोंडली, घोसाळी, भेंडी, खारीक, मनुका, डाळिंब, नारळ, केळी, द्राक्षे, दूध, घरचे ताजे लोणी, साजूक तूप, खडीसाखर.
  अपथ्यकर पदार्थ ….
 • कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, अननस, बाजरी, कुळीथ, वांगे, मुळा, पुदिना, मिरची, आंबट दही, काजू, पिस्ता, मेथी, अंबाडी, आंबटचुका, शेंगदाणे, हरभरा, छोले, पावटा, चवळी, पाणीपुरी, भेळपुरी, पावभाजी आदी आंबट, तिखट व खारट पदार्थ, आंबवलेले, तळलेले पदार्थ
  ऍसिडिटी… ऍसिडिटी… म्हणून दुर्लक्ष करू नका. हीच ऍसिडिटी अल्सरची सुरुवात आहे. त्यामुळे स्वतःवर वेगवेगळ्या औषधोपचाराचा प्रयोग करण्यापूर्वी वैद्याचा सल्ला नक्की घ्या.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

मेळावली आंदोलनप्रकरणी तिघांची जामीनावर सुटका

शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जमीन सीमांकनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या तिघांजणांची काल जामीनावर काल...

आध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष नको

योगसाधना - ४८९अंतरंग योग - ७४ डॉ. सीताकांत घाणेकर सर्वत्र घडत असलेल्या घटना ऐकल्या- वाचल्या-...

सुवर्णक्षण ः कोव्हॅक्सिन … कोविशिल्ड

मंजुषा पराग केळकर होय, संपूर्ण सुरक्षित, स्वदेशी कंपन्यांनी तयार केलेली लस तयार होऊन आज ती जागतिक मानकांना खरी...

तापमानात घट ः हदयविकाराचा धोका जास्त

डॉ. बिपीनचंद्र भामरे जे धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो. धूम्रपान केल्याने हृदयाच्या दिशेने ऑक्सिजनचा प्रवाह कमी...

वातरक्त ः एक दारुण आजार

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सर्व प्रकारचे सांधे दुखणे म्हणजे संधिवात नसतो. म्हणून योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच चिकित्सा- औषधोपचार करावे....