तपासणी अहवालात आढळले तीन प्रकारचे अमली पदार्थ
सात दिवसांअगोदर साकवाळ येथील बिट्स पिलानीच्या खोली मृतावस्थेत आढळलेल्या ऋषी नायर या 20 वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पोटात तीन प्रकारचे अमली पदार्थ आढळले. उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून समोर आलेल्या तपासणी अहवालातून हे स्पष्ट झाले.
ऋषी नायर या विद्यार्थ्याचा मृत्यू 4 सप्टेंबर रोजी झाला होता. त्याच्या उलटीची रेंडोक्स तपासणी केली असता त्यात मेथापेटामाईन, एम्फेटामाईन आणि एमएमडिए या शक्तीशाली अशा अमली पदार्थांचे अंश सापडले. त्यामुळे मृत्यूचा गुंता वाढला आहे. प्रतिष्ठित अशा या शिक्षण संस्थेच्या परिसरात अमली पदार्थ कसे पोहोचले असा सवाल उपस्थित झाला आहे.
यासंबंधी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांना विचारले असता त्यांनी, रेंडोक्स चाचणी केल्यानंतर ऋषी याच्या शरीरात अमली पदार्थांचे अंश सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हे अंमली पदार्थ त्याच्यापर्यंत पोहोचले की त्याच्यावर जो औषधोपचार होत होता त्यातून हे पदार्थ शरीरात पोहोचले याचा आम्ही तपास करीत आहोत. ऋषी नायर हा बेंगळुरू येथील आहे. गेल्या 9 महिन्यात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या मृत्यूचा संबंध आता अमली पदार्थांच्या गैरवापराशी जोडला गेला आहे. एका तरुण विद्यार्थ्याच्या शरीरात ड्रग्जच्या इतक्या धोकादायक मिश्रणाची उपस्थिती ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नाही तर कुठ्ठाळीमधील वाढत्या ड्रग्ज संस्कृतीचा एक भयानक परिणाम आहे. जो अंमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कारवायांचे केंद्र बनले आहे. गेल्या 9 महिन्यांत झालेले पाच दुर्दैवी मृत्यू हे या एका मोठ्या समस्येचा भाग आहेत. या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी, आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि आजूबाजूला कार्यरत असलेल्या ड्रग्ज नेटवर्कचा नाश करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे नेते ओलेन्सियो सिमोस यांनी पुन्हा एकदा केली आहे.
हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर आपल्या तरुणांच्या भविष्याचे रक्षण करण्याचा प्रश्न आहे. सरकारने तातडीने आणि गांभीर्याने काम केले पाहिजे. या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि तरुणांचे जीवितहानी रोखण्यासाठी आम्ही सर्व संबंधित अधिकारी, माध्यमे, नागरी समाज आणि शैक्षणिक संस्थांना एकत्र येण्याचे आवाहन करतो असे ओलेन्सियो सिमोस म्हणाले.

