ऋषितुल्य संशोधक प्रा. अ. का. प्रियोळकर

0
309

– डॉ. सु. म. तडकोडकर

गोमंतकाने विविध प्रकारच्या क्षेत्रांस समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्रास व उर्वरित भारतास अनेक विचारवंत प्रदान केले. या संदर्भात केवळ मराठी भाषा व साहित्य हे क्षेत्र जरी ध्यानात घ्यावयाचे असे ठरविले तर काही महत्त्वाच्या नाममुद्रा दृष्टिआड करणे अवघड ठरते. उदाहरणार्थ, कृष्णदास श्यामाने इसवी सन १५२६ मध्ये म्हणजे संत एकनाथांच्या पूर्वी संस्कृत भाषेतील भागवतपुराणाचे मराठीत भाषांतर केले होते. संत सोहिरोबानाथ आंबिये यांनी नाथसंप्रदायास ललामभूत केले. इसवी सन १८२५ ते १८६७ या काळात गोमंतकातील कलंगुट येथील चंद्रोबा शेणवी डुकले व त्यांचे चिरंजीव माधव चंद्रोबा डुकले यांनी मराठीतील संतकाव्याचे संपादन करून ते, आरंभी पोर्तुगीज अधिसत्तेखाली असलेल्या गोमंतकात, तद्नंतर इंग्रजांच्या अधिसत्तेखाली असलेल्या मुंबईत, ‘सर्वसंग्रह’ या नियतकालिकाच्या माध्यमाद्वारे प्रसिद्ध केले. मराठीतील हा बहुधा पहिला-वहिला प्रयत्न असावा.
प्रा. अनंत काकबा प्रियोळकर हे विद्वानांच्या मांदियाळीतील एक ऋषितुल्य संशोधक होत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर, १८९५ या दिनी गोव्यात झाला तर ते १३ एप्रिल, १९७३ या दिवशी मुंबईत कालवश झाले. ‘झेण्डूची ङ्गुले’ या कवितासंग्रहाचे कवी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (कविवर्य केशवकुमार) यांनी गौरविलेल्या ‘देमान्दमाहात्म्य’ या खण्डकाव्याचे कर्ते विनायक काकबा प्रियोळकर हे प्रा. प्रियोळकरांचे ज्येष्ठ बंधू होत. 

प्रा. प्रियोळकरांना चित्रकार व्हायचे होते; तथापि या कालावधीत त्यांची प्रतिभा व प्रज्ञा संशोधन क्षेत्रात विशेष तेजाने तळपत राहिली. ते एक कवी, कथाकार, कादंबरीकार, प्रहसनकार, ललित गद्यलेखक म्हणूनही जाणकारांच्या लक्षात राहिले. त्यांनी संशोधक-चरित्रकार, मुरब्बी संपादक, अपार व्यासंग असलेले भाषाभ्यासक व इतिहासाभ्यासक म्हणून लब्ध प्रतिष्ठित तज्ज्ञांकडून गौरव प्राप्त केला. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी प्रा. प्रियोळकरांची व्याख्याने आयोजित केली व त्या व्याख्यानांचा समावेश केलेला ग्रंथही पुणे विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित केला. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री खेर हे तर प्रा. प्रियोळकर यांच्या विद्वत्तेमुळे इतके प्रभावित झाले होते की त्यांनी त्यांची मराठी संशोधन मंडळाचे डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली. श्रीयुत प्रियोळकर हे केवळ बी.ए.चे पदवीधर होते आणि सेवानिवृत्त होईपर्यंत मुंबई महानगरपालिकेत सेवाचाकरी करीत होते; परंतु त्यांच्या सखोल व व्यापक स्वरूपाच्या संशोधनकार्यातील प्रगल्भतेमुळे ते मुंबई विद्यापीठातील पीएच.डी. पदवीसाठीचे संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक व परीक्षक म्हणून ख्यातकीर्त झाले व त्यांच्या नाममुद्रेस ‘प्राध्यापक’ या पदाचा लाभ झाला. तेव्हापासून ते प्रा. अ. का. प्रियोळकर म्हणूनच विद्वन्मान्य झाले. कारवार येथील ४ मे, १९५१ या दिवशी झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचे अध्यक्ष व संस्कृतविद् डॉ. सुनितीकुमार चट्टोपाध्याय यांच्यासारख्यांकडून गौरवांकित होण्यापर्यंत ते प्रगती करू शकले.

प्रा. प्रियोळकरांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाची जडणघडण

गोमंतकस्थित मंगेशी देवस्थानाच्या परिसरातील कोनें-प्रियोळ भागात जन्मलेल्या प्रा. प्रियोळकरांवर विद्यार्थिदशेतच गाढा व्यासंग करण्याचे, चिकित्सक वृत्ती बाळगण्याचे आणि हाती घेतलेल्या कार्याचा सतत ध्यास घेण्याचे संस्कार झाले. तद्उपरांत ते संस्कार म्हणजेच त्यांची स्वभाववैशिष्ट्ये झाली. विद्यार्थिदशेत असताना त्यांनी जेव्हा आपला पहिला-वहिला मराठीतील लेख तत्कालीन सुविख्यात असलेल्या ‘विविधज्ञानविस्तार’ या नियतकालिकास पाठविला तेव्हा संपादक रा. भि. गुंजीकर यांनी त्यांना असे लेखन पाठविण्यास प्रोत्साहनच दिले. त्या काळात या नियतकालिकात एखादा लेख प्रसिद्ध झाला की त्यास एखाद्या विद्यापीठाची जणू काही पदवीच मिळाली असे मानले जात असे. त्या नियतकालिकात प्रा. प्रियोळकर यांनी तहहयात सतत लेखन केले. नंतरच्या काळात त्यांचा सर रामकृष्ण गो. भांडारकर, डॉ. पांडुरंग दामोदर गुणे, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या सान्निध्यात काळ व्यतित झाला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर भाषिक संशोधनाविषयीचा प्रभाव पडला, यात नवल ते कसले?

‘नामूलं लिख्यते किञ्चित’ या उक्तीनुसार लेखन

पुढील काळात प्रा. प्रियोळकरांनी ‘नामूलं लिख्यते किञ्चित’ या मल्लिनाथाच्या नावावर सांगितल्या जाणार्‍या उक्तीनुसार लेखन केले. प्राचीन मराठी काव्याचे गाढे अभ्यासक म्हणून ते जसे परिचित झाले, तसेच आधुनिक पाठचिकित्साशास्त्राचे प्रवर्तक म्हणूनही सन्मानित झाले. प्रा. प्रियोळकरांनी रघुनाथपंडितविरचित ‘दमयंतीस्वयंवर’ या काव्याचे संपादन-प्रकाशन करून संबंधित कवीविषयीच्या साधार चरित्रलेखनाचा व काव्याच्या पाठनिश्चितीचा आदर्शच निर्माण केला. तसेच या संशोधनाच्या निमित्ताने पाठचिकित्साशास्त्राची मूलतत्त्वेही अधोरेखित केली. इंग्रजीतील त्यांच्या लेखनामुळे तर त्यांची कीर्ती भारताच्या चतु:सीमा ओलांडून विदेशातदेखील पावली. प्रा. प्रियोळकरांनी समकालीन विद्वानांसमोर तसेच पुढील पिढ्यांसाठी मूलगामी संशोधनाचे साक्षेपी संपादन करण्याचा आदर्श वस्तुपाठ ठेवण्याचे कार्य केले. त्यामुळेच त्यांच्या नाममुद्रेचा इतिहासाचार्य विश्‍वनाथ काशीनाथ राजवाडे, डॉ. पांडुरंग सखाराम शेणवी-पिसुर्लेकर व म. म. पोतदार यांच्या मांदियाळीत समावेश केला जातो. 

प्राचीन मराठी वाङ्‌मयाचे संशोधन, संपादन व प्रकाशन

प्रा. प्रियोळकरांनी समकालीन विद्वानांसमोर तसेच पुढील पिढ्यांसाठी मूलगामी संशोधनाचे साक्षेपी संपादन करण्याचा आदर्श वस्तुपाठ ठेवण्याचे कार्य केले. त्यांनी संत तुकारामाचे अभंग, मुक्तेश्‍वरविरचित महाभारत (आदिपर्व), मोरोपंतांचे काव्यलेखन असे प्राचीन मराठी वाङ्‌मयाचे संशोधन, संपादन व प्रकाशन केले. संत ज्ञानेश्वरांच्या तसेच संत नामदेवांच्या नावावर काही काव्ये दाखविली जात आहेत, ही बाब ध्यानात आल्यावर त्यांनी त्याविषयीचा आक्षेप घेऊन हे वाङ्‌मय केवळ ‘शंकास्पद वाङ्‌मय’ होय अशी नोंद करण्यास संबंधितांना भाग पाडले. मुसलमानांची जुनी मराठी कविता हा त्यांच्या आवडीचा प्रांत होता. त्यांनी त्यातील दहा मुसलमान कवींचा शोध घेऊन त्यांच्या कवितांचे संपादन-प्रकाशन केले.

ख्रिस्ती मराठी वाङ्‌मयाचे संशोधन, संपादन व प्रकाशन

प्रा. प्रियोळकरांनी प्राचीन काव्याच्या अभ्यासासोबत भारतात मुद्रणविद्या आणणार्‍या सोळाव्या शतकातील ख्रिस्ती मराठी वाङ्‌मयाचे संशोधन, संपादन व प्रकाशन केले. राजारामशास्त्री भागवत यांनी या वाङ्‌मयाविषयीचे सूतोवाच केले होते तर इतिहासाचार्यांनी या वाङ्‌मयाला एक भ्रष्ट वाङ्‌मय असे संबोधले होते. मुंबई महानगरपालिकेत सेवाचाकरी करीत असताना प्रा. प्रियोळकरांनी या वाङ्‌मयाचा सखोलपणे व व्यापकपणे शोध घेतला व ‘गोमंतकाची सरस्वती’ (१९३५) या ग्रंथाद्वारे त्याच्याशी संबंधित असलेल्या अज्ञात ग्रंथांचा व ग्रंथकारांचा अभ्यासकांना परिचय करून दिला. हे सर्वच वाङ्‌मय मूलत: रोमन लिपीत ग्रंथित होते. त्यातील काहींचे त्यांनी देवनागरीत लिप्यंतर केले तर काहींचे जशाचे तसे रोमन लिपीतच संपादन-प्रकाशन केले. परिणामी मराठी वाङ्‌मयाच्या भवनात अशा वाङ्‌मयाचे एक स्वतंत्र दालन उघडले गेले. त्यांना पाद्री तोमास इश्तेव्हंविरचित ‘ख्रिस्तपुराणा’चेही संपादन करायचे होते.

एकोणिसाव्या शतकातील मराठी वाङ्‌मयाचे संशोधन,

संपादन व प्रकाशन 

महाराष्ट्रातील भाषिक व वाङ्‌मयीन विकासाचा शोध घेत असताना प्रा. प्रियोळकरांना सामाजिक अभिसरणाचे जे स्वरूप जाणवले ते त्यांनी शब्दबद्ध केले. प्रा. प्रियोळकरांनी ‘शंकास्पद वाङ्‌मय’ संज्ञेसोबतच ‘हस्तलिखितांची बृहन्नामावली’ व ‘दोलामुद्रिते’ या संज्ञा घडविल्या आहेत. त्यांनी रघुनाथ पंडितांचे व मुक्तेश्‍वरांचे चरित्र लिहिले होतेच. त्यावेळी स्थल व काल, वाङ्‌मय व लोकश्रद्धा यांचा त्यांना संदर्भ घेता आला होता. आता एकोणिसाव्या शतकात वृत्तपत्रे, दैनंदिनी, पत्रलेखन, ग्रंथांतर्गत संदर्भादींच्या आधारे प्रा. प्रियोळकरांनी रावबहाद्दूर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे आत्मचरित्र संपादित करून त्यांचे चरित्रदेखील लिहिले. तसेच त्यांनी डॉ. भाऊ दाजी लाड-पार्सेकर यांचेही आदर्श स्वरूपाचे चरित्र लिहिले. ज्याला ज्याचे चरित्र लिहायचे आहे, त्याला त्यात चरित्रनायकाला समकालीन असलेल्या जीवनाचादेखील दर्पण दाखवता आला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.

भाषाविषयक आकलन व आग्रह

प्रा० प्रियोळकरांनी मराठी ही भाषा असून कोंकणी त्या भाषेची बोली आहे असाच आजन्म आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी युक्तिवाद केला तो अभ्यसनीय आहे. त्यांचे शिष्य डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या ग्रंथात कोंकणीला ‘गोमंतकी बोली’ असे संबोधले आहे. पुढील काळात डॉ. प्रभुदेसाईही आपल्या गुरूंचा आग्रह मोठ्या जोमाने मांडत राहिले. दोघांनीही सतराव्या शतकातील कित्येक ख्रिस्त्यांनी लिहिलेल्या व गोव्यात, मुंबईत, पोर्तुगालात व अन्य स्थळी असलेल्या त्या मराठीतील व कोंकणीतील ग्रंथांचा शोध लावला व त्यातील काहींचे देवनागरीत लिप्यंतरदेखील केले.

नव्या संज्ञांची मांडणी

ग्रंथांबद्दलच्या ओढीने प्रा. प्रियोळकरांनी जसा दुर्मीळ ग्रंथांचा शोध घेतला त्याच आत्मीयतेने मराठी पारिभाषिक संज्ञाही निर्माण केल्या. अवक्षेप (ेाळीीळेप), ग्रंथप्रेमी (लळलश्रळेहिळश्रश), ग्रंथवेडे (लळलश्रळेारपळरी), दोलामुद्रिते (ळपर्लीपरर्लीश्ररश), दृढ आणि अदृढ हस्तलिखिते (ीींीेपस रपव ुशरज्ञ ारर्पीीलीळिींी), तत्रैव (ळलळव, ळलळर्वीा), तुळा (लेपषशी लेारिीश; लष.), दर्शिका (ळपवशु), नामावली (लळलश्रळेसीरहिू), पाठ (ींशुीं), पाठचिकित्सा (ींर्शुींीरश्र उीळींळलळीा), पाठनिश्चिती (ीशीींेीरींळेप ेष ींशुींी),  पाठभेदांची नोंद (लेश्रश्ररींळेपी),  पाठसंग्राहक (लेश्रश्ररींेीी), प्रक्षेप (ळपींशीिेश्ररींळेप), वैश्विक (र र्ीपर्ळींशीीळींू), वृद्धी (रववशपर्वीा), शुद्धी (शीं लेीीळसशपर्वीा), शंकास्पद वाङ्‌मय (रिेलीूहिरश्र श्रळींशीर्रींीीश), हस्तलिखितांची बृहन्नामावली (लरींरश्रेर्सीशी लरींरश्रेर्र्सीीीा) ही काही असाधारण महत्त्व वाटावे अशा काही संज्ञांची नोंद होय.

प्रा. प्रियोळकरांचा वारसा

प्रा. प्रियोळकरांनी मराठी भाषेच्या व साहित्याच्या ओढीने स्वत: संशोधन-संपादन-प्रकाशन केलेच, तसेच त्यांनी स्वतःच्या विद्यार्थ्यांकरवीही परंपरेचा शोध घेण्याचा वारसा चालविला. डॉ. सखाराम गंगाधर मालशे, डॉ. वि. बा. प्रभुदेसाई, लीला गोविलकर, मीना जोशी या व्यक्तींनी आपल्या गुरूंचे कार्य तन्मयतेने पुढे चालविले. डॉ. प्रभुदेसाईंच्या मार्गदर्शनानुसार डॉ. सु. म. तडकोडकर यांनीही ख्रिस्ती मराठी वाङ्‌मयाचा नव्याने शोध घेतला व ग्रंथलेखन व स्वतंत्र निबंधलेखन केले. डॉ. तडकोडकर यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. सुनिता सुनील उमरसकर यांनी पाद्री मिंगेल-द-आल्मैदलिखित ‘वनवाळ्याचो मळो’च्या पाच खण्डांपैकी दोन खण्डांचे लिप्यंतर- शास्त्रानुसार रोमन लिपीतून देवनागरी रूपांतर केलेच व त्या खण्डाचा भाषिक व वाङ्‌मयीन अभ्यास करून पीएच.डी.ची पदवी संपादली. डॉ. उमरसकर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रा. विनय मडगावकर व प्रा. इराप्पा गुरव हे दोन विद्यार्थी पीएच.डी.ची पदवी संपादण्यासाठी सतराव्या शतकातील ख्रिस्ती मराठी वाङ्‌मयाचे संशोधन करीत आहेत. हे एक प्रकारे नव्या पिढीने प्रा. प्रियोळकरांना विनम्रपणे केलेले वंदनच होय.

निष्कर्ष

गोमंतकातील मराठी भाषा शासनमान्य व्हावी या आग्रहासाठी आत्मीयतेने वावरणार्‍या प्रा. प्रियोळकरांचे काही आग्रह लोकमानसाला ङ्गारसे जाणवले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. प्रा. प्रियोळकरांच्या तोडीचे संशोधन करणार्‍यांचादेखील संशोधनात विश्‍लेषण व संश्‍लेषण करण्याच्या कृतीला अधिक महत्त्व असायला हवे असा आग्रह मावळू लागला आहे, किंबहुना तो कृतिविहीन होऊ लागला आहे.
आताशा पदव्युत्तर पातळीवर येणार्‍या विद्यार्थ्यांची क्षमता अपेक्षेइतकी नसते, अशी कागाळ सर्रासपणे केली जाते. त्यामुळे संशोधकांची उणीव भासणार आहे, अशी शक्यताही वर्तवली जाते.
सर्वसाधारणपणे विद्यापीठाची पदवी असली म्हणजे संशोधनकार्याला भरीवपणा येतो असे जरी आपण मानत असलो तरी विद्यापीठाच्या स्तराचा आणि संशोधनाचा संबंध केवळ पदवी हातासण्या इतपतच असतो, ही वस्तुस्थिती आहे. खुद्द प्रा. प्रियोळकर हे केवळ सामान्य पदवीधर होते, ही वस्तुस्थिती ध्यानात घेतली पाहिजे.
आताशा अशांच्या हातांखाली आपण संशोधनाची बाराखडी गिरवावी असे वाटायला लावणारी संशोधकांची मांदियाळी विशेषशी आढळत नाही, इतकी वस्तुस्थिती विपरीत आहे. विद्यापीठात पीएच.डी.च्या पदवीसाठीचे संशोधन करणार्‍यांना सहामाही अहवाल सादर करावा लागतो. त्यात आपण अमके-तमके पुस्तक वाचले असे काहीबाही लिहिले जाते. त्यात बव्हंशी सहामाही अहवालाद्वारे नामांकित विचारवंतांची संवाद-भेटी झाल्याची व त्यानुसार साधक-बाधक चर्चा झाल्याने अभ्यासक प्रगल्भ झाल्याची जाणीव होत नाही. हे पीएच.डी. पदवीचे उत्सुक आपल्या अभ्यासविषयाशी संबंधित कार्यक्रमांत सहभागी झाल्याचे दिसत नाही. त्यातच आंतरमहाजालाचा लाभ जितका आहे, त्याहून त्याच्याद्वारे अधिक तोटा आहे, असे काही वेळा उद्वेगाने म्हणावेसे वाटते.
मागे एका नामांकित विद्यापीठाकडून तपासण्यासाठी माझ्याकडे एक प्रबंध पाठवून दिला गेला. तो लोकसाहित्य व लोकनृत्य यांच्या अभ्यासाशी संबंधित होता. गोमंतकात लोकसंगीताशी संबंधित इतकी अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली गेली आहेत की त्या प्रबंधातील मजकूर ‘बाबा आदम के जमाने का’ आहे असे त्या प्रबंधातील लेखन वाचल्यानंतर जाणवले. तौलनिक लोकसाहित्याच्या अभ्यासाची आवश्यकताच काय, असे त्या प्रबंधाचा मार्गदर्शक मला विचारत होता. तो प्रबंध मी पुनर्लेखनासाठी त्या विद्यापीठाकडे परत पाठवून दिला. नंतर मला कळले की प्रोजेक्ट म्हणून विद्यार्थ्यांकरवी सादर झालेल्या अभ्यासप्रकल्पांच्या आधारे तो प्रबंध लिहिला गेला होता. संशोधन क्षेत्रातील इतकी अधोगती प्रा. प्रियोळकरांना साहवली असती का? सेवा-चाकरी करणार्‍या विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या पदवीसाठीचे संशोधन करण्यापासून प्रा. प्रियोळकर विद्यार्थी म्हणून स्वीकारतच नसत. मग विद्यार्थ्यांकरवी सादर झालेल्या अभ्यासप्रकल्पांच्या आधारे स्वत:चा प्रबंध वाचण्यासाठी संबंधित ‘संशोधक’ उभा राहिला असता तर ते प्रा. प्रियोळकरांना साहवले असते का, असा प्रश्‍न पडतो. संशोधनाच्या आरंभी गृहीतक, अन्य अभ्यासकांनी केलेले संशोधनकार्य, त्यांच्या संशोधनकार्यातील त्रुटी व आपण त्यांच्यापेक्षा वेगळे काय मांडणार आहोत असे सांगावे लागते. अशा सामान्य मूलभूत आवश्यकतांची अनिवार्यताही ध्यानात घेण्याची गरज पीएच.डी.ची पदवी संपादण्यासाठी धडपडणार्‍यांना वाटू नये इतके संशोधनाविषयीचे साधारणीकरण करून टाकले गेले आहे. त्यामुळे प्रा० प्रियोळकर आज हयात नाहीयेत तेच उत्तम असे म्हणावयाची पाळी आली आहे.