Home बातम्या उसगाव येथे भीषण अपघातात विद्यार्थिनीसह तिघे ठार

उसगाव येथे भीषण अपघातात विद्यार्थिनीसह तिघे ठार

0

बाराजण-उसगाव येथे सर्वोदय हायस्कूलमध्ये पालीवाडा-उसगाव येथील १० वीतील सात विद्यार्थ्यांना घेऊन जीए ०७ एस ००८२ नंबरची बस संथगतीने येत असताना जीए १ व्ही ९६२५ नंबरचा खनिजवाहतूक करणारा ट्रक भरधाव वेगाने आला व बसला जोरात ठोकर दिली.

बसचालक गणेश गोपाल प्रभू (४०) हा केबिनमध्ये सापडल्याने जागच्या जागी मरण पावला. वाहक सागर सुभाष गोसावी (३५) हा उसळून खाली पडला व टायरखाली सापडल्याने मृत्यूमुखी पडला. बसमधील सातही विद्यार्थ्यांवर खनिज वगैरे पडल्याने जखमी झाले. त्यापैकी प्रियंका गावडे (१५) पालिवाडा ही विद्यार्थिनी मरण पावली.

दरम्यान, जितेश गावडे (१२), रसिका ताटे (१२) या जखमींना गोमेकॉत आयसीयूत दाखल केले आहे. अश्‍विता गावडे (१२), अखिल गावडे (१२), नताशा कुट्टीकर (११), श्रेयस गावडे, अमरदीप गावडे (१५), मीलन गावडे या विद्यार्थ्यांचाही जखमींमध्ये समावेश आहे.

अपघात घडल्यानंतर गावचे नागरिक ताबडतोब गोळा झाले व दोन्ही बाजूंनी वाहतूक रोखून धरली. ट्रक व बसचा चक्काचूर झाला होता. क्रेन आणून जखमींना बाहेर काढले. संतप्त नागरिक, सरपंच, पंच व माजी जि. पंचायत सदस्य तुळशीदास प्रभू व इतर नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. ट्रकचा चालक अपघातानंतर फरार झाला व रात्री उशिरापर्यंत सापडला नाही. दरम्यान, उशिरापर्यंत वाहतूक रोखून धरल्यानंतर उत्तर गोव्याचे एस. पी. विजयसिंग, फोंड्याचे उपअधीक्षक दिनराज गोवेकर, वाहतूक विभागाचे उपअधीक्षक सेराफीन डायस, फोंड्याचे निरीक्षक सुबोध शिरवईकर, डिचोलीचे सुदेश नाईक स्टाफसह हजर झाले. उशिरापर्यंत चर्चा केल्यानंतर ट्रक सोडून इतर वाहने सोडण्यात आली. उपनिरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. अधिक चौकशी फोंडा पोलीस करत आहेत. जखमींवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. एकाचवेळी तिघांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.