उसगाव येथील कत्तलखान्यासंदर्भात अनेक तक्रारी येत असून अलीकडेच अपेक्षित वयापेक्षा कमी वय असलेल्या २६ गुरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असता भारत स्वाभिमान तसेच गो संवर्धन केंद्राच्या कार्यकर्त्यांनी पकडली होती. मात्र, रंगेहाथ गुरे पकडली जाऊनही संबंधितांनी कारवाईस टाळाटाळ केल्याने नाणूस येथील गोसंवर्धन केंद्राने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती.
यासंदर्भात न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात या एकूण प्रकरणाची समूळ चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली असून ती पूर्ण होऊन अहवाल येईपर्यंत या कत्तलखान्यातील सर्व गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था याचिकादार गोसंवर्धन केंद्र, नाणूस यांनी पाहावी असे नमूद केले आहे.
दरम्यान, भारत स्वाभिमान, गोवा व गोसंवर्धन केंद्र, नाणूस यांच्यावतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही संस्थांचे पदाधिकारी अनुक्रमे कमलेश बांदेकर व हनुमंत परब यांनी या अंतरिम निवाड्याचे स्वागत केले असून हा कत्तलखाना कायमचा बंद करावा अशी मागणी केली आहे. या कत्तलखान्यातील अधिकार्यांची चौकशी करावी, त्यासाठी त्यांना निलंबित केले जावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

