उसगावातील अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू

0
3

उसगाव येथील पंचायती समोरील रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या टिपणा रामू वर्सेकर (49, रा. तिस्क उसगाव, मूळ रा. अनमोड) यांचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर अपघात मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडला. त्यावेळी जोदार कोसळणाऱ्या पावसात दुचाकी घसरल्याने अपघात घडला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

प्राप्त माहितीनुसार, टिपणा वर्सेकर हे जीए-05-ई-6079 क्रमांकाची दुचाकी घेऊन उसगाव येथून घरी जात होते. पंचायतीसमोरील रस्त्यावर मुळसळधार पावसात दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचार करण्यासाठी गोमेकॉत नेण्यात आले. गोमेकॉत उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. टिपणा वर्सेकर हा एमआरएफ कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करीत होता. दरम्यान, तिस्क-उसगाव येथील एमआरएफ कंपनीसमोरील रस्त्यावर कारची धडक दुचाकीला बसून बुधवारी सकाळी एक अपघात घडला. त्यात दुचाकीचालक प्रभाकर हा जखमी झाला.