उसकई सरपंच, पंचायत सचिव यांना लाच प्रकरणी अटक

0
53

भ्रष्टाचार विरोधी पोलिसांनी लांच घेणार्‍यांविरुध्द मोहिमच सुरू केली असून काल बांधकाम परवान्यासाठी आर्किटेक्ट राहूल देशपांडे यांच्याकडून ७० हजार रुपयांची लांच घेण्याच्या प्रकरणी पोलिसांनी उसकईचे सरपंच राजेश दाभाळे व पंचायत सचिव उदय नाईक याना रंगेहाथ पकडले.

गेल्या बर्‍याच दिवसांपासून राजेश दाभाळे व उदय नाईक यांनी देशपांडे यांच्याकडे बांधकाम परवाना देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. दक्षता खात्याशी संलग्न असलेल्या भ्रष्टाचार विरोधी पोलिसांनी सापळा रचून वरील दोघांनाही अटक केली. दोन दिवसांपूर्वी या विभागाने केरी वन खात्याच्या आउट पोस्टवर बांबू वाहून नेणारा कँटर पिकअप सोडण्यासाठी १० हजार रुपयांची लांच घेताना रेंज वन कार्यालय प्रमुख महानंद पर्येंकर, उपप्रमुख एकनाथ सोयरोजी व गार्ड सुभाष आरोंदेकर यांना अटक केली होती.

कोणत्याही अधिकार्‍याने लांच मागितल्याची तक्रार केल्यास संबंधितांविरुध्द कारवाई करण्याची तयारी असल्याचे भ्रष्टाचार विरोधी पोलीस विभागाचे अधिक्षक बॉस्को जॉर्ज यांनी सांगितले. लांच मागणांर्‍याविरुध्द तक्रार केली तरच कारवाई करणे शक्य असते, असे त्यांचे म्हणणे आहे.