उलथापालथ

0
17

जागतिक राजकारणाची समीकरणे उलटीपालटी करणाऱ्या घटना सध्या घडत आहेत. अमेरिका आणि रशिया ह्या दोन्ही महासत्ता आजवरच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी. दोहोंमधील शीतयुद्धाचा तर मोठा इतिहास. जागतिक राजकारणाचा समतोल ह्या दोन महासत्तांनी आजवर तोलून धरलेला. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आले आणि ही समीकरणेच बदलून गेली आहेत. अमेरिकेने रशियाशी हातमिळवणीसाठी हात पुढे केला आणि त्याचा पहिला फटका युक्रेनला बसला. रशियाची युक्रेनविरुद्धची लष्करी कारवाई बघता बघता युद्धात रूपांतरित झाली त्याला आता तीन वर्षे उलटली आहेत. अमेरिकेच्या यापूर्वीच्या ज्यो बायडन प्रशासनाने युक्रेनच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली. त्यावर अब्जावधी डॉलर खर्च केले. मात्र, आता ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या हितालाच प्राधान्य देणाऱ्या धोरणात अशा प्रकारचा अनाठायी खर्च बसत नाही. त्यामुळे रशिया – युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे ह्यासाठी ट्रम्प पुढे सरसावले. सौदी अरेबियाने त्यासाठी मध्यस्थी केली, तेव्हा युक्रेनने आमच्याविषयीची बातचीत पण आमच्याविना चालली आहे म्हणत नाक मुरडले होते. पुढे अमेरिकेच्या युद्धविरामाच्या प्रस्तावावर चर्चेस झेलेन्स्की राजी झाले, परंतु व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांसमक्ष ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जी जाहीर बाचाबाची झाली, तसला प्रकार ना कधी जगाने पाहिला होता, ना ऐकला होता. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या इतिहासात असा प्रकार कदाचित पहिल्यांदाच घडला असावा. शाळकरी मुलाला दम द्यावा तशा प्रकारे ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना पत्रकारांसमक्ष दम दिला की ‘तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळत आहात आणि आम्ही तुम्हाला आजवर समर्थन देऊनही तुम्ही त्याप्रती कृतज्ञ नाही आहात.’ ‘तुम्ही युद्धात जिंकणार नाही. तुम्हाला जी काही संधी होती ती आमच्यामुळे होती’ असे सांगून ट्रम्प यांनी जणू झेलेन्स्की यांना यापुढे आपला पाठिंबा युक्रेनला असणार नाही हे जाहीरपणे सांगून टाकले. अमेरिकेच्या ह्या अनपेक्षित पवित्र्यामुळे सारे युरोप आता धास्तावले आहे. युरोपीय राष्ट्रांच्या प्रमुखांनी झेलेन्स्कींच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केलेला असला, तरी अमेरिकेच्या पाठिंब्याविना युक्रेन युद्धात टिकाव धरू शकणार नाही हे उघड आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यावर युद्धविरामासाठी अमेरिकेचा फार मोठा दबाव आहे. त्याच बरोबर युक्रेनची नाटोमध्ये समावेश व्हावा ही मागणी असली तरी अमेरिकेला ते मान्य नाही. युक्रेनमध्ये प्रलंबित असलेली निवडणूक झेलेन्स्कींनी व्हावी म्हणजेच त्यासाठी त्यांनी पायउतार व्हावे ह्यासाठी अमेरिका दबाव वाढवत आहे. ह्या सगळ्यामुळे युक्रेन सध्या उघडा पडल्यागत झाला आहे. रशिया – युक्रेन संघर्ष सुरू झाला तेव्हा चीनने सुरवातीला त्यात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवलेली होती. परंतु तेव्हा चीनचा उद्देश रशियाशी व्यापारी संबंध वाढवणे हा होता. आता अमेरिकाच रशियाशी हातमिळवणी करायला पुढे सरसावली आहे. ह्या घडामोडीचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतात. युरोप तर सर्वाधिक सचिंत झाला आहे. अमेरिकेचे मित्रदेश असलेले ब्रिटन, फ्रान्स यांना देखील हा धक्का पचवता आलेला नाही. गेली कित्येक वर्षे अमेरिकेने युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियाविरुद्ध भूमिका घेतली होती. ट्रम्प यांच्या राजवटीत मात्र आक्रितच घडू लागले आहे. त्यात रशिया आणि चीन यांची मैत्री सर्वविदित आहे. चीनच्या तैवानसंबंधीच्या भूमिकेला रशियाचा पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे उद्या यदाकदाचित अमेरिका, रशिया आणि चीन हे तिन्ही देश एकत्र आले तर काय ही चर्चाही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या निरीक्षकांत रंगली आहे. ट्रम्प यांचे धोरण अमेरिकेच्या हिताला प्राधान्य देण्याचेच आहे. त्यांना जगाशी काही देणेघेणे दिसत नाही. त्यामुळे केवळ आपल्या देशाचे हित लक्षात घेऊन ते पावले टाकतील असे दिसते. मात्र ह्याचा परिणाम म्हणून अमेरिकेची वर्षानुवर्षाची विदेश नीती उलटीपालटी होऊ लागलेली दिसते. अमेरिका आणि रशिया एकत्र येणार असतील तर जगातील बरेचसे तणाव निवळतील व जागतिक प्रश्नांवर परस्पर सहकार्य वाढेल हे जेवढे खरे, तेवढेच जगावर होणारे विपरीत परिणामही विचार करण्याजोगे आहेत. मुख्य म्हणजे युरोप आणि आशियाई राष्ट्रांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आंतरराष्ट्रीय संघटना अधिकाधिक निष्प्रभ होण्याची भीती निर्माण झाली आहे. जग अजून ट्रम्प यांनी दिलेल्या ह्या धक्क्यातून सावरलेलेच नाही. त्याचे दूरगामी परिणाम काय काय नि कसकसे होऊ शकतात हे स्पष्ट व्हायला अजून थोडा काळ जावा लागेल. मात्र, हे जे नवे समीकरण निर्माण झाले आहे ते जगाच्या हिताचे नसण्याचीच शक्यता अधिक आहे.