उमाकांत खोत खूनप्रकरणी तिघांना अटक

0
11

वरचावाडा-मोरजी येथील ज्येष्ठ नागरिक उमाकांत खोत यांच्या खून प्रकरणी मांद्रे पोलिसांनी काल तिघा संशयितांना अटक केली, तर मुख्य संशयित अद्याप फरार आहे. या प्रकरणी सुपरवायझर लोकेश पुट्टास्वामी (53, रा. बंगळुरू-कर्नाटक), जेसीबी ऑपरेटर रोहित कुमार प्रजापती (20, रा. झारखंड) आणि विजय सुप्पन (36, रा. तामिळनाडू) यांना तिघांना अटक केली. या प्रकरणातील मुख्य संशयित जमीनमालक अशोक कुमार नेदुरुमाली हा फरार आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी काल ही माहिती दिली.

तत्पूर्वी, वरचावाडा-मोरजी येथील ज्येष्ठ नागरिक उमाकांत खोत यांच्या खून प्रकरणी मांद्रे पोलिसांनी काल गुन्हा नोंद केला. मात्र जोपर्यंत संशयितांना अटक होत नाही, तोपर्यंत उमाकांत खोत यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका स्थानिक ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घेतली.

उमाकांत खोत यांच्या खून प्रकरणात जे जे कोणी सामील आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. शिवाय त्या ठिकाणी होणाऱ्या प्रकल्पालाही आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही पंचायतीला आणि सरकारला विरोधाचे निवेदन सादर करणार, असे स्थानिकांनी सांगितले.
काल आमदार जीत आरोलकर यांनी उमाकांत खोत यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भेट दिली असता स्थानिकांनी त्यांच्याकडे चर्चा केली. यावेळी पेडणे तालुका पोलीस उपअधीक्षक सलीम शेख आणि मोपा पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

केवळ मजुरांना पकडून काही साध्य होणार नाही. जे कोणी या जमिनीचे मालक आहेत, त्या मालकालाही अटक करण्याची गरज आहे. जर त्यांना अटक केली नाही, तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशाराही नागरिकांनी चर्चेवेळी दिला. यानंतर आमदार जीत आरोलकर यांनी स्थानिकांशी चर्चा करून शुक्रवारपर्यंत या प्रकरणात जे कोणी मुख्य आरोपी आहेत. त्यांना पकडण्यात येईल. याशिवाय जे जे कोण सामील आहेत. त्यांनाही पकडण्यात येईल, असे आश्वासन दिले.