उमद्या नेत्याचा अंत

0
21

जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अबे यांची काल एका तरूण माथेफिरूने गोळ्या झाडून केलेली निर्घृण हत्या जगाला हादरवून सोडणारी आहे. राजकीय नेत्याची अशा प्रकारची हत्याकांडे जगाला नवी नाहीत. भारतामध्ये तर आपले दोन पंतप्रधान आपण अशा प्रकारच्या हल्ल्यांत गमावले आहेत. अमेरिकेसारख्या महासत्तेला देखील अब्राहम लिंकन, जॉन एफ. केनेडी असे लोकप्रिय राष्ट्रनेते अशाच प्रकारे गमवावे लागले आहेत. परंतु जपानसारख्या अत्यंत अल्प गुन्हेगारी असलेल्या देशामध्ये अशा प्रकारे एका लोकप्रिय राजकीय नेत्याची हत्या होणे हे धक्कादायक आहे. ज्याने अबे यांच्यावर गोळ्या चालवल्या तो नौदलाचा माजी सैनिक असल्याचे सांगितले जात आहे. जपानसारख्या देशात जिथे लष्कर आणि पोलिसांव्यतिरिक्त इतरांना बंदूक बाळगण्याची परवानगीच नाही आणि जिथे बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी एका प्रदीर्घ आणि कडक प्रक्रियेला सामोरे जावे लागते, तिथे त्याच्यापाशी हे शस्त्र आले कुठून आणि अबे यांच्यावर दहा फुटांवरून गोळ्या झाडण्याइतपत त्या बंदुकीसह जवळ जाण्याची संधी त्याला कशी मिळाली ह्या प्र श्नांची उत्तरे आता तेथील तपास यंत्रणांना शोधावी लागतील. शिंझो अबे यांच्या मृत्यूने भारताने आपला एक चांगला मित्र गमावला आहे हे निश्‍चित. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींपर्यंत सर्वांनी आपले भावपूर्ण शोकसंदेश जारी केले आहेत आणि आपला देशही जपानी जनतेच्या दुःखामध्ये सहभागी होत आज राष्ट्रीय दुखवटा पाळणार आहे.
शिंझो अबे खरे तर गेली दोन वर्षे पंतप्रधानपदी नव्हते, परंतु आगामी निवडणुकीसाठी आपल्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रचार करणारे भाषण एका रेल्वेस्थानकावरील कोपरासभेत करीत असताना त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला आहे. शिंझो अबे यांना तरूण वयामध्ये जपानच्या पंतप्रधानपदी येण्याचा मान मिळाला होता. २००६ साली ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले, परंतु त्यांना तेव्हा गंभीर आजारपणामुळे ते पद सोडावे लागले. त्यांच्यानंतर पाच पंतप्रधान सत्तेवर आले, परंतु त्यापैकी कोणीही सोळा महिन्यांचा देखील कार्यकाळ पूर्ण करू शकले नव्हते. बरे झाल्यानंतर शिंझो अबे राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आणि २०१२ ते २०२० असा प्रदीर्घ काळ ते पंतप्रधानपदावर राहिले. एवढा दीर्घकाळ या पदावर राहणारे ते अलीकडच्या काळातील पहिलेच जपानी पंतप्रधान होते.
आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात शिंझो अबे यांनी भारतासह सर्व देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. विशेषतः भारताशी अतिशय निकटचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भारतभेटीवरही ते आलेले होते. २०१७ साली भारत, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या चार देशांमध्ये जो ‘क्वाड’ समूह अस्तित्वात आला, त्यामागे शिंझो अबे यांची महत्त्वाची भूमिका होती. आज ह्या क्वाड समूहाला अपरिमित महत्त्व आलेले आहे आणि त्याचा उल्लेख ‘आशियाई नाटो’ असाही केला जात असतो. विशेषतः चीनच्या आक्रमकतेला शह देण्यासाठी ‘क्वाड’चे हे व्यासपीठ उपयुक्त ठरले आहे. या संघटनेचे एक शिल्पकार म्हणून शिंझो अबे यांचेच नाव घ्यावे लागते.
शिंझो अबे यांनी राबवलेली आर्थिक धोरणेही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि मूलगामी स्वरूपाची होती. त्यांच्या अर्थनीतीला ‘अबेनॉमिक्स’ असेही कौतुकाने संबोधले जात असते. जपानी लोककथेतील तीन बाणांच्या धर्तीवर अर्थनीतीचे तीन बाण त्यांनी त्यात कल्पिले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करणे, लवचिक आर्थिक धोरण राबवणे आणि रचनात्मक सुधारणा करणे या तीन तत्त्वांवर आधारित आर्थिक नीती त्यांनी आक्रमकपणे राबवली. त्या दरम्यान बँक ऑफ जपानच्या गव्हर्नरशीही त्यांचा संघर्ष झडला होता. तत्कालीन गव्हर्नरला राजीनामाही द्यावा लागला होता. जपानसारख्या एका उद्यमशील देशाच्या अर्थनीतीमध्ये आमूलाग्र बदल घडविण्याचा शिंझो अबे यांनी आपल्या कारकीर्दीत आटोकाट प्रयत्न केला. जपान हे कामसू लोकांचे राष्ट्र आहे, परंतु वयोवृद्ध लोकसंख्येचे मोठे प्रमाण ही तेथील आगळीवेगळी समस्या आहे. परंतु तिच्यावर मात करीत आपल्या देशाला आर्थिकदृष्ट्या समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न अबे यांनी केला होता. त्यांची राष्ट्रनिष्ठा प्रखर होती. त्यांना उजव्या विचारांचेही मानले जात असे. विशेषतः जपानच्या संरक्षणासंदर्भातील त्यांच्या कणखर धोरणांमध्ये त्यांच्या त्या विचारांचे प्रतिबिंब उमटत असे. असे एक विचारशील उमदे नेतृत्व एका माथेफिरूच्या आततायीपणाने काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा नेत्यांचा जागतिक क्षितिजावरून अस्त ही केवळ त्या देशाची नव्हे, तर संपूर्ण जगाचीच हानी असते.