25 C
Panjim
Thursday, October 22, 2020

उपेक्षित‘मत्स्यगंधा’


गोमंतकाच्या ‘मत्स्यगंधे’चा कोरोनाने घास घेतला. आशालताबाई गेल्या. सहा दशके रंगभूमी, रुपेरी पडदा आणि छोट्या पडद्याला व्यापून राहिलेल्या या गुणी अभिनेत्रीचे हे अशा प्रकारे अकाली निघून जाणे चटका लावणारे आहे. तब्बल सहा दशकांची हिंदी – मराठीमधील एवढी समृद्ध अभिनय कारकीर्द असूनदेखील या गोमंतकन्येला साधा ‘पद्मश्री’ किताब देण्याची सुबुद्धी आजवरच्या सरकारांना सुचू नये हे गोव्याला आणि गोव्याच्या रसिकतेलाही लाजीरवाणे आहे.
धी गोवा हिंदू असोसिएशनसारख्या प्रतिष्ठित नाट्यसंस्थेच्या रंगमंचावर नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या रत्नपारखी नजरेतून अवतरलेली, स्कर्टमधून नुकतीच साडीत शिरलेली ‘संशयकल्लोळ’ मधील ही ‘रेवती’ आपल्या अभिनयसामर्थ्याने तब्बल सहा दशके नाटका – चित्रपटांच्या क्षणभंगुर दुनियेत जिद्दीने राहिली. ६३ वर्षे या क्षेत्रात टिकून राहणे हे सोपे काम नव्हे, परंतु त्यांना हे साध्य झाले ते केवळ या क्षेत्रावरील निःस्सीम निष्ठेमुळेच. ‘‘हिचा नाकाचा शेंडा बोलका आहे. ही मुलगी नाव काढील’’ हा गोपीनाथ सावकारांचा आशीर्वाद शब्दशः खरा ठरला याची साक्ष आशालताबाईंची विस्तृत कारकीर्द देते आहे. दोनशेहून अधिक हिंदी चित्रपट, पन्नासहून अधिक मराठी चित्रपट, पन्नासहून अधिक नाटकांचे पाच हजार प्रयोग, अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि विशेष म्हणजे मराठीबरोबरच हिंदीमध्ये देखील या मराठमोळ्या मुलीने निर्माण केलेले स्थान ही बाब खचितच दुर्लक्षिता येणारी नाही.
रंगभूमीवरची त्यांची ‘वसंतसेना’ पाहून वसंतराव कानेटकरांनी ‘हीच माझी मत्स्यगंधा’ अशी घोषणा केली. मराठी नाट्यसंगीताचा बाज बदलून टाकणार्‍या त्या अजरामर नाटकातील आशालताबाईंचा अभिनय आणि ‘गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफेकळी’ किंवा ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ सारखी गाणी यांचे गारूड रसिकांवर आजही कायम आहे.
दूरदर्शनवरच्या कोकणी नाटकातील भूमिका पाहून विख्यात दिग्दर्शक बासू चटर्जीं मुद्दाम त्यांचे ‘गुंतता ह्रदय हे’ नाटक पाहायला गेले आणि ‘अपने पराये’ या चित्रपटात घेतले हे तर सर्वविदित आहेच, परंतु हिंदी चित्रपटसृष्टीमधला त्यांचा त्यापुढचा जो सगळा प्रवास झाला तोही स्वतःच्या अभिनयसामर्थ्याच्या बळावरच झाला हे अधिक महत्त्वाचे आहे. मराठी माणसांना हिंदी चित्रपटांमध्ये स्थान मिळत नाही ही तक्रार सार्वत्रिक आहे, परंतु आशालता हे असे नाव आहे जे सत्तर – ऐंशीच्या दशकापासून आजतागायत तेथे आपले भक्कम स्थान जपून राहिले होते.
आशालताबाईंच्या अभिनयनिष्ठेचे अनेक किस्से आहेत. ‘गुडबाय डॉक्टर’ नाटकाच्या शंभराव्या प्रयोगावेळीच त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. नाटकाच्या प्रयोगापूर्वीच त्यांनी प्रेक्षकांपुढे जाऊन विनंती केली की आपल्या पायाला दुखापत झालेली आहे, त्याच परिस्थितीत आपण आज काम करणार आहोत. ज्या प्रेक्षकांना पैसे परत न्यायचे असतील त्यांनी परत घेऊन जावेत, परंतु एकही प्रेक्षक जागेवरून हलला नाही. ही त्यांच्याप्रतीच्या आपुलकीची आणि आदराचीच पावती होती.
‘भाऊबंदकी’च्या एका प्रयोगामध्ये त्यांनी वठवलेली आनंदीबाईची भूमिका पाहताना नारायणरावाच्या वधानंतर राग अनावर झालेल्या एका प्रेक्षकाने नाटकातल्या ‘आनंदीबाई’वर अक्षरशः चप्पल फेकून मारली, तेव्हा बाजूला उभ्या असलेल्या दत्तारामबापूंनी ‘ही तुझ्या अभिनयाला मिळालेली दाद आहे, पुढचं वाक्य बोल..’ म्हणून केलेल्या त्यांच्या समजावणीचा किस्साही प्रसिद्ध आहे. अशा अनंत अनुभवांचे समृद्ध गाठोडे सोबत घेऊन आशालताबाईंनी आपली कारकीर्द घडवली. वेळोवेळी भेटलेल्या उत्तम गुरूंकडून ज्ञान आत्मसात केले. त्यावर स्वतःचा साज चढवला. रंगभूमीवर तर ‘रायगडातील’ मधील ‘येसूबाईं’ पासून ‘गरूडझेप’ मधल्या जिजाबाईपर्यंत अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या. ‘वार्‍यावरची वरात’मध्ये साक्षात् पुलंसोबत कडवेकरमामींची ठसकेबाज भूमिका कोण विसरू शकेल? चित्रपटांमुळे तर त्या घरोघरी गेल्या.
लौकिक जीवनात वावरताना सदासतेज असा अत्यंत सुप्रसन्न, हसरा गोरापान चेहरा, नीटस नेसलेली सुंदर साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू आणि हातात छानशी पर्स असा त्यांचा वावर असे. जन्माने मुंबईकर असल्या तरी आपल्या मायभूमी गोव्याविषयी त्यांना नितांत प्रेम होते. सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे, गोव्याने त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीची किती जाण ठेवली आणि आपल्या या गोमंतकन्येचे किती उदारपणे कौतुक केले हा भाग वेगळा. खरे तर आशालताबाईंची शारीरिक ठेवण ठेंगणीठुसकीच, परंतु रंगभूमीवर अथवा चित्रपटांतून वावरताना प्रेक्षकांना ती कधी जाणवलीच नाही. समस्त प्रेक्षकवर्गाचे लक्ष खिळायचे ते केवळ त्यांच्या सकस अभिनयावर. आशालताबाईंच्या अभिनयसामर्थ्याचे मोठेपण त्यातच तर दडलेले आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

विषवल्ली

केरी - पेडणे येथे एक कोटीचा अमली पदार्थ नुकताच जप्त करण्यात आला. घरामध्येच अमली वनस्पतींची लागवड करून मालामाल होण्याचे हे तंत्र आजवर...

लॉकडाऊन संपले पण कोरोना आहे

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी ः सणांच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन लॉकडाऊन संपले तरी कोरोना विषाणू अद्याप आहे. त्यामुळे येत्या...

मडगावात सुरक्षा रक्षकाने पाच वाहनांना लावली आग

>> ५ लाखांचे नुकसान, संशयिताला स्थानिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात मुंजविहार घोगळ व मडगाव येथे एका सुरक्षा रक्षकाने पाच चारचाकी...

पोलिसांवर हल्ला केलेल्या दोन्ही संशयितांना अटक

कुर्टी - फोंडा सोमवारी संध्याकाळी फोंड्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गावडे व कॉन्स्टेबल जयवंत भर्तू या दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला दोघाजणांनी पळ...

अमली पदार्थप्रकरणी संशयितांस चार दिवसांची पोलीस कोठडी

अमली पदार्थप्रकरणी केरी पेडणे येथील अटक केलेल्या स्थानिक संशयित रामा केरकर, रश्मी केरकर व शिवाजी केरकर यांना काल न्यायालयाने चार दिवसांची पोलीस...

ALSO IN THIS SECTION

विषवल्ली

केरी - पेडणे येथे एक कोटीचा अमली पदार्थ नुकताच जप्त करण्यात आला. घरामध्येच अमली वनस्पतींची लागवड करून मालामाल होण्याचे हे तंत्र आजवर...

लॉकडाऊन संपले पण कोरोना आहे

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी ः सणांच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन लॉकडाऊन संपले तरी कोरोना विषाणू अद्याप आहे. त्यामुळे येत्या...

मडगावात सुरक्षा रक्षकाने पाच वाहनांना लावली आग

>> ५ लाखांचे नुकसान, संशयिताला स्थानिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात मुंजविहार घोगळ व मडगाव येथे एका सुरक्षा रक्षकाने पाच चारचाकी...

पोलिसांवर हल्ला केलेल्या दोन्ही संशयितांना अटक

कुर्टी - फोंडा सोमवारी संध्याकाळी फोंड्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गावडे व कॉन्स्टेबल जयवंत भर्तू या दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला दोघाजणांनी पळ...

घरगुती विजेच्या मागणीत वाढ : काब्राल

>> मोले अभयारण्यातील वीजवाहिन्यांचे समर्थन, श्‍वेतपत्रिका जारी दरवर्षी राज्यात विजेच्या मागणीत ५ टक्क्यांनी वाढ होत असल्याचे सांगून उद्योगांपेक्षा घरगुती...