उपासना आणि श्रद्धा

0
23
  • सौ. हर्षा वेर्लेकर

दुपारची जेवणाची वेळ झाली होती आणि चावी मिळाल्याशिवाय अन्नाचा कणही पोटात जाणे शक्य नव्हते. तसेच थोडावेळ आम्ही देवळात थांबलो. देवापाशी मनापासून प्रार्थना केली. तेवढ्यात एक चमत्कार घडला…

उपासना आणि श्रद्धा या अध्यात्मातल्या दोन बाजू. संपूर्ण दिवस उपाशी राहून केली जाते ती उपासना असा समज चुकीचा आहे. श्रद्धा म्हणाल तर देवावर असलेला विश्वास. देव कधीच आपल्या भक्तांना उपाशी राहा असे सांगत नाही. पण देवावर असलेली आपली श्रद्धाच आपल्याकडून उपवास घडवून आणते. उपासना आणि उपवास या एकाच नाण्याच्या दोन बाजू. देवाची यथासांग पूजा-अर्चना करणे, प्रार्थना-श्लोक म्हणणे, पोथी वाचणे, त्यातच देवाला नैवेद्य दाखवून मग स्वतः अन्न ग्रहण करणे हे सर्व उपक्रम म्हणजे उपासना आणि या उपासनेनेच देवावरची श्रद्धा अधिक दृढ होते. हीच श्रद्धा आपले भविष्य घडवण्यासाठी आपला विश्वास वाढवते. आपला विश्वास, श्रद्धा, उपासना या सर्व गोष्टी जेव्हा आपण फुलांच्या रूपात देवाला अर्पण करतो तेव्हा त्याचं अस्तित्व तुम्हाला जाणवतं.

आपले गणपतीबाप्पा हेच सर्व लहान-मोठ्यांचे श्रद्धा असलेले मुख्य दैवत. माझाही बाप्पांवर अमाप विश्वास आहे. अगदी शाळेत असल्यापासून मी गणपतीची उपासना करते. अशीच एक माझ्या बाबतीत घडलेली श्रद्धेची घटना तुम्हाला सांगते. मी, मिस्टर, दोन वर्षाचा मुलगा आणि आई-बाबा असे आम्ही कारने एकदा परराज्यात फिरायला गेलो होतो. तिथे पोहोचलो. कार पार्किंग केली आणि आम्ही स्थळे बघण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही गणपतीच्या देवळात गेलो. तिथे भली मोठी गणपतीची काळ्या दगडाची मूर्ती आम्ही पाहिली. फोटो काढले. देवाची प्रार्थना केली आणि पुढची स्थळे पाहण्यास सुरुवात केली.

सर्व स्थळे पाहून आम्ही पुन्हा पार्किंगकडे पोहोचलो तेव्हा लक्षात आले चावी हरवली आहे! कारची चावी मिस्टरांनी त्यांच्या पँटच्या पट्ट्याला किचैनबरोबर अडकवली होती. डुप्लिकेट चावी करणे आणि कुरिअरने दुसरी चावी मागवणे शक्य नव्हते. चावी नेमकी कुठे हरवली हे पाहण्यासाठी आम्ही मोबाईलमधले सर्व फोटो शोधले तेव्हा आमच्या लक्षात आले की चावी सुरुवातीलाच गणपती मंदिरात हरवली आहे. आम्ही पुन्हा मंदिरात धाव घेतली आणि चावी शोधू लागलो. पण चावी काही सापडली नाही. दुपारची जेवणाची वेळ झाली होती आणि चावी मिळाल्याशिवाय अन्नाचा कणही पोटात जाणे शक्य नव्हते. तसेच थोडावेळ आम्ही देवळात थांबलो. देवापाशी मनापासून प्रार्थना केली. तेवढ्यात एक आजीबाई तिथे बसलेल्या दिसल्या. तिथली भाषा वेगळी असल्यामुळे आम्ही त्यांना काय सांगतोय हे त्यांना कळत नव्हते. शेवटी आम्ही त्यांना इशारे करून दाखवले तेव्हा त्यांनी अक्षरशः आपल्या पाकिटातली आमची चावी काढून दिली. त्यांनी ती आपल्याकडे जपून ठेवली होती. हे सर्व आश्चर्यकारक होते. मी आणि माझे मिस्टर- आम्हा दोघांचे आसू आणि हसू एक झाले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी आम्ही त्या आजीबाईंना बघत राहिलो आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी आमची चावी आम्हाला परत केली. जणू गणपती आजीबाईंच्या रूपात येऊन त्याने आम्हाला संकटातून बाहेर काढले होते. आजीही आमच्याकडे शांत चित्ताने, तोंडातून एक अक्षरही न काढता बघत होत्या. गणपतीचे रूप जणू आम्ही त्यांच्यात पाहत होतो. एवढी वर्षं केलेली उपासना फळाला आली.

हीच माझी श्रद्धा! देवाला दिलेल्या हाकेचे उत्तर देवाने दिले. तोच तो खरा विश्वास! असे एक नाही तर अनेक लहान-मोठे प्रसंग मी अनुभवले आहेत आणि पुढेही अनुभवीत राहीन याची मला खात्री आहे. कारण आपले प्रयत्न आणि देवावर असलेला विश्वास सर्व पॉझिटिव्ह गोष्टी घडवून आणतात. अशा या विद्येच्या देवतेला, विघ्नहर्त्याला माझे शतशः प्रणाम!