उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी भाजपकडून कार्यशाळेला प्रारंभ

0
10

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीआधी भाजपकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचे आव्हान आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. तर रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत.

या निवडणुकीत राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. येत्या मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी काल रविवारी दि. 7पासून संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा सुरू झाली आहे. खासदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची योजना अनेक दिवसांपूर्वीच आखण्यात आली होती. त्यात पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा, जेपी नड्डा यांच्यासह सगळे केंद्रीय मंत्री आणि खासदार सहभागी झाले आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला काही तास राहिलेले असताना भारतीय जनता पक्षाने ही आपल्या खासदारांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत खासदारांसाठी चार सत्रे असतील. आज खासदारांना उपराष्ट्रपती निवडणुकीवर प्रशिक्षण दिले जाईल. उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि विरोधी पक्षाचे उमेदवार, माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी आहेत.

मोदी शेवटच्या रांगेत

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले. पण पुढल्या रांगेत बसण्याऐवजी ते सभागृहातील शेवटच्या रांगेत बसले. भाजपच्या राज्यसभेच्या खासदार संगीता बलवंत यांनी एक्सवर कार्यशाळेचे काही फोटो शेअर केले. त्यात त्या शेवटच्या रांगेत बसलेल्या दिसत आहेत. त्यांच्यापासून काही अंतरावर अन्य खासदारांसोबत पंतप्रधान मोदीही बसलेले दिसत आहेत. पंतप्रधान मोदींना शेवटच्या रांगेत बसलेले पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

डिनर पार्टी रद्द

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या अधिकृत निवासस्थानी एनडीए खासदारांसाठी डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, आता ही पार्टी रद्द करण्यात आली आहे. उत्तर भारतातील अनेक राज्ये सध्या भीषण पुराच्या विळख्यात सापडली असल्याने, ही डिनर पार्टी रद्द करण्यात आली आहे. सध्या पंजाबमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.