26 C
Panjim
Thursday, December 3, 2020

उपद्रवी अभिनेत्री

चापोली धरणावर दिवसाढवळ्या अश्लील व्हिडिओेचे चित्रीकरण करून तो व्हायरल करून सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या एका तथाकथित अभिनेत्रीच्या प्रतापांच्या विरोधात काणकोणवासीयांनी संघटितरीत्या जो लढा दिला तो कौतुकास्पद आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन त्यांनी काणकोणच्या प्रखर अस्मितेचे दर्शन या निमित्ताने जगाला घडवले आहे. चापोली धरणासारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना कोणीही यावे आणि भलते थेर करून जावे हा प्रकार मुळात घडू कसा दिला गेला हा या प्रकरणातील पहिला प्रश्न आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी हाच प्रश्न सरकारला विचारला तो यथार्थ आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस तेथे तैनात होते की अशा गैरकृत्याला संरक्षण पुरवण्यासाठी?
तेथे कसले चित्रीकरण झाले हा त्यापुढचा भाग, परंतु मुळात प्रथम विनापरवानगी अशा प्रकारचे चित्रीकरण धरणासारख्या संवेदनशील ठिकाणी – तेही पोलिसांच्या समक्ष – त्यांच्या उपस्थितीत होते हीच मुळात गंभीर बाब आहे. दहशतवादाचा धोका सर्वत्र असताना अशा प्रकारची बेफिकिरी एखाद्या दिवशी फार घातक ठरू शकते. पोलिसांनी तेथे केवळ बघ्याची भूमिका घेणे म्हणूनच आश्चर्यकारक आहे.
सध्या काणकोणचे नाव या अभिनेत्रीमुळे पुन्हा पुन्हा चुकीच्या कारणांमुळे बातम्यांत झळकू लागले आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या पतीच्या विरोधात लग्नानंतर काही दिवसांतच विनयभंगाची तक्रार नोंदवून या अभिनेत्रीने खळबळ माजवली होती. लग्न झाले एक सप्टेंबरला आणि २० सप्टेंबरला पतीने म्हणे विनयभंग केला! काणकोण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन २३ तारखेला पतीला अटक केल्यानंतर सदर अभिनेत्रीने आपली तक्रार मागेही घेतली.
केवळ प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळवून घेण्यासाठी अशा प्रकारची नौटंकी करण्याची सदर महिलेची सवय फार जुनी आहे. २०११ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या वेळी भारत जिंकला तर आपण विवस्त्र होऊ अशी जाहीर घोषणा करून या बाईंनी राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीचा सारा झोत स्वतःकडे वळविला होता. कोणालाही माहीत नसलेले तिचे नाव एकाएकी सर्वांच्या तोंडी झाले होते! तेव्हा खरोखरच भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला त्यानंतर आपले वचन खरे करण्याच्या तिच्या प्रयत्नात शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून आडकाठी आणली होती. तरीही वानखेडे स्टेडियमवर रात्री जाऊन आपला ‘नवस’ तिने फेडला होता! पाचव्या आयपीएल स्पर्धेच्या वेळी देखील पुन्हा हाच ‘नवस’ तिने केला होता. सातत्याने स्वतःची विवस्त्र छायाचित्रे आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकून त्याद्वारे लोकप्रियता मिळवण्याचा हा प्रकार अजबच म्हणायला हवा. परंतु या उपद्व्यापांद्वारे प्रसिद्धीच नव्हे, तर भरपूर पैसाही मिळत असावा. आपल्याजवळ दुसरे काही नसले की शरीराचे असले थेर मांडले जात असतात. अशा सवंग प्रसिद्धीने तिला काही चित्रपटही मिळवून दिले. विद्यार्थ्याशीच शारीरिक संबंध ठेवणार्‍या शिक्षिकेची भूमिका रंगवण्याचे महत्कार्य सदर अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी एका चित्रपटात बजावले होते. धन्य तो पटकथालेखक आणि धन्य तो निर्माता!
सध्या या अभिनेत्रीचे काणकोण तालुक्यात वास्तव्य आहे. गोवा म्हणजे आज आव जाव घर तुम्हारा बनलेला आहे, त्याची ही अशी माणसे ही परिणती आहे. कोणी कुठे राहावे याला भारतीय संविधानानुसार कोणी आडकाठी करू शकत नाही हे जरी खरे असले, तरी आपल्या दुष्कृत्यांमुळे स्थानिक नागरिकांना जर उपद्रव होत असेल, तर असले पाहुणे हवेत कशाला? काणकोणची ही कीड स्थानिकांना उपद्रवकारक ठरते आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करणे हा भारतीय दंडविधानाच्या कलम २९४ खाली गुन्हा आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे काही जागृत नागरिकांनी सदर अभिनेत्रीविरुद्ध पोलीस तक्रारींचा सपाटा लावल्यानंतर कुठे जागे झालेल्या पोलिसांनी काल तिला आणि तिच्या मित्राला कळंगुटमधून ताब्यात घेतले. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणी काणकोणवासीयांचा तीव्र रोष लक्षात घेऊन संंबंधित पोलिसांना निलंबित करायला लावले आणि या राज्यात कायद्याप्रतीचा विश्वास पुनःप्रस्थापित केला हे ठीक झाले. असे प्रकार पुन्हा घडता कामा नयेत. अशा घटनांतून होणारी गोव्याची नाहक बदनामी टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क राहणे जरूरी आहे. अशा सतर्कतेऐवजी पोलीस निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन राहणार असतील अथवा स्वतःच अशा बेकायदेशीर गोष्टींना उत्तेजन देण्यासाठी संरक्षण पुरवणार असतील तर मग त्याविरुद्ध जनता उभी राहिली तर तिला दोष का द्यायचा? काणकोणवासीयांवर ही पाळी पुन्हा आणली जाणार नाही अशी अपेक्षा आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

शाळा सुरू करताना…

विलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड

शशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...

दुरपती

पौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...

कार्तिकातला दीपराग

मीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...

ALSO IN THIS SECTION

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

फक्त सोहळा नको

गोवा मुक्तीचे हीरक महोत्सवी वर्ष उत्सवी कार्यक्रमांनिशी साजरे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारपाशी शंभर कोटी रुपयांची...

कोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा

>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...

नोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...

स्पष्टतेची गरज

दिल्लीच्या सीमांवर काल आजूबाजूच्या राज्यांतील शेतकर्‍यांनी जोरदार धडक मारली. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला. लाठीमार, अश्रुधूर, पाण्याचा मारा या सगळ्यातून शेतकर्‍यांचे हे...