रविवारच्या विश्रांतीनंतर फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धेची बाद फेरी आजपासून खेळविली जाणार आहे. ‘ए’ गटात दुसर्या स्थानावर राहिलेला कोलंबिया व ‘सी’ गटाचा उपविजेता जर्मनी यांच्यात या फेरीतील पहिली लढत खेळविली जाणार आहे तर ‘बी’ गटाचा विजेता पॅराग्वे व ‘ए’ गटात तिसर्या स्थानी राहिलेला अमेरिका यांच्यात आजचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यांतील विजेता संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार आहे.
कोलंबिया व जर्मनी यांनी गट फेरीत दोन विजय व एक पराभव अशी कामगिरी केली आहे. दोन्ही संघांच्या नावावर पाच गोल आहेत. २००७ सालच्या अंडर १७ विश्वचषकात हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते त्यावेळी ३-३ अशी बरोबरी झाली होती. त्यामुळे दोघांमधील आजचा सामना रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. कोलंबियाचा खेळाडू युआन पेनेलोझा याची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. भारताविरुद्ध दोन गोल केल्यानंतर अमेरिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याने १ गोल नोंदविताना दुसर्या गोलांत मोलाचे योगदान दिले होते. त्याला रोखले तर जर्मनीचे काम सोपे होऊ शकते. सोमवारच्या चार संघांचा विचार केल्यास गट फेरीत जर्मनीने सर्वाधिक ६१ वेळा गोलक्षेत्रात आक्रमण केले आहे. यातील २१ फटके योग्यदिशेला, २५ दिशाहीन तर त्यांचे १५ फटके अडविण्यात आले. आक्रमकता ही दोन्ही संघाची जमेची बाजू असून उभय संघांच्या बचावफळीचा आज कस लागणार आहे.
पॅराग्वे व अमेरिका या दोन्ही संघांनी गट फेरीतील आपले पहिले दोन्ही सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश निश्चित केला होता. पॅराग्वेने आपली दौड कायम राखत तिसर्या विजयासह गटात अव्वल स्थान मिळविले तर अमेरिकेला कोलंबियाकडून पराजित व्हावे लागल्याने तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. पॅराग्वेने गट फेरीत इराणसह सर्वाधिक १० गोलांची नोंद केली आहे. त्यांच्या सात वेगवेगळ्या खेळाडूंनी हे गोल नोंदविले आहेत. यात बदली खेळाडूंचादेखील समावेश आहे. यामुळे प्रशिक्षकांकडे आक्रमक खेळाडूंची वानवा नाही. त्यामुळे त्यांचा संघ निश्चितच वरचढ मानला जात आहे.

