- डॉ. मनाली महेश पवार
पायाच्या तळव्यांची जळजळ म्हणजे पाददाह होय. जेव्हा पायांच्या तळव्यांची आग, जळजळ होते तेव्हा ती फक्त उष्णता वाढल्यानेच होत नाही, तर पित्ताबरोबर वातदोष व रक्तधातूही बिघडलेला असतो. पाददाहाची बरीच कारणे आहेत, त्यामुळे नक्की कारण समजल्यास आपण समूळ त्रासाचे उच्चाटन करू शकतो.
मे महिन्याची सुरुवात अगदी विस्फोटक झाली. उष्णता एवढी वाढली की सर्वांगाचा फक्त दाह-दाह होत आहे. पेशंट सारखे डोळ्यांची जळजळ (नेत्रदाह), लघवीची जळजळ (मूत्रदाह), पोटाची जळजळ (उदरदाह), सर्वांगाची जळजळ (सर्वांग-दाह) व पायाची जळजळ (पाददाह) अशा तक्रारी घेऊन दवाखान्यात येत आहेत. त्यातल्या त्यात पायाचा दाह हा बऱ्याच जणांना त्रास देत आहे.
पाददाह अर्थात पाद म्हणजे पाय आणि दाह म्हणजे जळजळ. पायाच्या तळव्यांची जळजळ म्हणजे पाददाह होय. जेव्हा पायांच्या तळव्यांची आग, जळजळ होते तेव्हा ती फक्त उष्णता वाढल्यानेच होत नाही, तर पित्ताबरोबर वातदोष व रक्तधातूही बिघडलेला असतो. पाददाहाची बरीच कारणे आहेत. त्यामुळे नक्की कारण समजल्यास आपण समूळ त्रासाचे उच्चाटन करू शकतो. त्यामुळे उष्णता बरीच वाढलीय, त्रास व्हायचाच म्हणून स्वस्थ बसू नका.
पाददाहाची काही कारणे
- आंबट, खारट, उष्ण-तीक्ष्ण पदार्थांचे सेवन हे पित्त व रक्तदुष्टीचे महत्त्वाचे कारण आहे. बाहेर कडकडीत ऊन, बरीच उष्णता तरीही चहा-कॉफीची सवय आहे, फ्रेश वाटतच नाही म्हणून चहा-कॉफी पिणे तसेच चालू ठेवणे.
- बाहेर पडल्यावर व मुख्यतः दुपारच्या कडकडीत उन्हात कोल्ड्रिंक्सचे अतिसेवन. ही सगळी एरिएटेड ड्रिंक्स स्पर्शाला थंड असतात पण प्रभावाने उष्ण असतात.
- शाळांना सुट्टी आहे, तेव्हा मुलं घरी. मुलांना साधं जेवणखाण आवडतच नाही. मुलं चविष्ट नसेल तर काही खातच नाहीत म्हणून चटपटीत खाणं. तळलेले पदार्थ, चायनीज पदार्थ व सारखे स्नॅक लागते म्हणून बेकरी पदार्थांचा भडीमार. ऋतू बदलला म्हणजे आहार बदलावा हा नियम सोयिस्कररीत्या आपण विसरतो.
- विरुद्धाशन हे तर पाददाहाचे प्रमुख कारण आहे. या काळात प्रत्येकालाच फ्रुट सॅलॅड विथ आईस्क्रीम, वेगवेगळी फळे एकत्र करून, त्यांत दूध टाकून केलेले शेक प्रकार मुलांना अतिशय आवडतात व त्यामुळे ती चवीने खातात-पितात. हे संयोजन म्हणजे विरुद्ध आहाराचे चांगले उदाहरण आहे.
- बऱ्याच जणी या दिवसांत उष्णता-उष्णता म्हणून सॅलॅड खातात, पण हे सॅलॅड बऱ्याचवेळा मोड आलेली धान्ये, काही भाज्या, मीठ व लिंबूचा रस घालून तयार केलेले असते. हे सॅलॅड रुक्ष असते, ज्याने आपल्या शरीरातील वात वाढतो.
- त्याचप्रमाणे रात्रीच्या जागरणानेही वातपित्त व रक्त दूषित होते.
- मानसिक त्रास म्हणजे ताणतणाव, चिडचिड, झोप पुरी न होणे यावेळीही वात-पित्त बिघडते, रक्त दूषित होते.
- सारखे उभे राहून काम करणे किंवा खूप चालणे. बऱ्याच वेळा सुट्ट्या असल्याने लोक बाहेर फिरायला जातात. देवस्थानाला जातात, खूप फिरतात-चालतात. यानेही पाददाह होतो.
- मे महिन्यात तशीही उष्णता वाढलेली असते व त्याला वरील कारणांची जोड मिळाली म्हणजे ‘पाददाह’ हा वाढणारच!
- पाददाहामध्ये तळपायांची जळजळ होणे हे महत्त्वाचे लक्षण आहे.
- कधी स्नायू आकसल्यासारखे होऊन तळपाय दुखतात.
- तळपाय लाल होतात व गरम लागतात.
पाददाहामध्ये उपाय
- निदान परिवर्जन म्हणजे वरील सांगितलेल्या कारणांचा त्याग करणे. हा कुठलाही आजार त्रास कमी करण्याचा पहिला उपाय.
- पाददाहामध्ये पादाभ्यंग ही उत्तम चिकित्सा आहे. आयुर्वेदशास्त्रामध्ये दिनचर्येत पादाभ्यंग नेहमी, नियमित करायला सांगितले आहे.
- पादाभ्यंग केल्याने पायांचा दाह कमी होतो. पायांचा कोरडेपणा कमी होतो.
- खूप चालल्यामुळे येणारा पायांचा थकवा कमी होतो.
- पायांचा रक्तप्रवाह सुधारतो.
- पायांत स्थैर्य, ताकद टिकून राहते. स्नायू व संधीना बल मिळते.
- पायदोष संतुलित होतो.
- पायांतील नसा, टेंडन, लिगामेंट स्नायू वगैरेंमुळे त्रास असल्यास पायांतील क्रॅम्स कमी होतात.
- पायाभ्यांग केल्याने पायाची जळजळ तर कमी होतेच, त्याचबरोबर डोळ्यांची जळजळही कमी होते, झोप चांगली लागते, थकवा दूर होतो, स्ट्रेस कमी होतो.
- डोकेदुखी, डायबेटिक न्यूरोपॅथी, उच्च रक्तदाबामध्ये, ताप असताना किंवा गर्भवती स्त्रियांच्या पायावर सूज असताना पादाभ्यांगाचा विशेष उपयोग होतो.
पादाभ्यंग कसे करावे?
- पादाभ्यंग तेलाने किंवा तुपाने करावे. तेलांमध्ये नारळाचे तेल पाददाहमध्ये श्रेष्ठ असते व तुपामध्ये शतधौत घृत श्रेष्ठ आहे. पायाची जळजळ असता शतधौत तुपाचा वापर करावा. आरामदायी स्थितीत बसून खोबरेल तेल वा शतधौत घृत पायांच्या तळव्यांना, घोट्याला, टाचेला व्यवस्थित लावून घ्यावे व विशिष्ट लयीत, हलाकासा दाब देत चोळावे. पूर्वी पादाभ्यंगासाठी काश्याची वाटी वापरली जायची. आज कांस्य धातूपासून तयार केलेला फूट मसाजर बाजारात मिळतो त्याचा उपयोग करावा. हा फूट मसाजर, तूप किंवा खोबरेल तेल नेहमी आपल्या पलंगाजवळ ठेवावे व रोज रात्री झोपण्यापूर्वी पादाभ्यंग करावे. विशेषतः उन्हाळ्यात व शरद ऋतूत.
- काश्याच्या वाटीने पादाभ्यंग केल्याने तीनही दोष संतुलित राहतात व शरीरातील टॉक्सिन बाहेर पडायला मदत होते.
- काश्याच्या वाटीच्या साहाय्याने पायाचे मालिश केल्याने पायांना फायदा तर होतोच, त्याचबरोबर संपूर्ण शरीरास दाह असल्यास किंवा इतर त्रास असल्यास फायदा होतो.
- पादाभ्यंगाबरोबर इतरही काही उपाय करावेत. जसे की, पित्त व वात दूषित झाल्याने त्यांना संतुलित करण्यासाठी विरेचन किंवा बस्ती उपक्रम करावे. हे पंचकर्म चांगल्या सुज्ञ वैद्यांकडून करून घ्यावे किंवा मृदुविरेचन घ्यावे.
- मृदुविरेचनासाठी त्रिफलाचूर्ण रात्री 1 चमचा गरम पाण्याबरोबर सेवन करावे.
- आठवड्यातून एकदा तरी एरण्ड स्नेह घ्यावा. साधारण 20 ते 30 मि.ली. एरण्डेल सकाळी लवकर प्यावे व वर गरम पाणी थोडे थोडे पित राहावे. याने वात व पित्तदोष संतुलित होतो.
- साधारण 2-3 चमचे शुद्ध गायीचे तूप सेवन करावे. तूप गरम पाण्यातून किंवा दुधातूनही सेवन करता येते.
- रात्री 15-20 काळ्या मनुका अर्ध्या वाटी पाण्यामध्ये भिजत घालून सकाळी त्या कुस्करून पाण्यासकट खाव्यात किंवा 15-20 काळ्या मनुका 2 ग्लास पाण्यात चांगल्या उकळून घ्याव्या. एक ग्लास पाणी चांगले उकळून आटेपर्यंत गरम करून त्यात सैंधव व तूप घालून सेवन करावे.
- रात्री दोन अंजार रात्री पाण्यात भिजवून सकाळी सेवन करावी.
- शतावरी चूर्ण किंवा कल्प दुधाबरोबर सेवन करावे.
- दोन चमचे धणे गरम पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून पाणी प्यावे.
- सब्जा भिजत घालून दुधातून घ्याव्यात.
- आवळ्याचा रस, आवळा चूर्ण, मोरवळा सेवन करावा.
- कोहळ्याचा रस प्यावा.
- रोज 1 चमचा गुलकंद सेवन करावे.
- चंदन, वाळा, मुलतानी माती वापरून तळव्यांना लेप लावावा.
- शीतली प्राणायाम नियमित करावे.