Home बातम्या उद्यापासून मच्छीमारी बंदी

उद्यापासून मच्छीमारी बंदी

0

उद्या एक जूनपासून राज्यात मच्छीमारी बंदी लागू करण्यात येणार असून ती ३१ जुलैपर्यंत राहणार आहे. एकूण ६१ दिवस मच्छीमारी बंदी लागू राहणार आहे. गेल्या वर्षापर्यंत राज्यात मच्छीमारी बंदीचा काळ हा ४५ दिवस होता. यंदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बंदीचा काळ १६ दिवसांनी वाढविला आहे.

खरे म्हणजे यंदा मच्छीमारी बंदीचा काळ ७५ दिवस एवढा करण्याचा पर्रीकर यांचा विचार होता. अर्थसंकल्पीय भाषणातून त्यानी तशी घोषणा केली होती. मात्र, मच्छीमार व ट्रॉलरवाले यांनी ७५ दिवस मच्छीमारी बंदी लागू केल्यास ऑगस्ट महिन्यात मिळणार्‍या सोलर कोळंब्याना आपणाला मुकावे लागेल अशी भीती व्यक्त करून बंदी काळ कमी करण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बंदीचा काळ ६१ दिवसांवर आणण्याचा निर्णय घेतला.

पावसाच्या दिवसात मासळी अंडी घालत असल्याने बंदीचा काळ वाढवल्यास मत्स्य उत्पादन वाढू शकेल, असे पर्रीकर यांचे म्हणणे होते. पण मच्छीमारांच्या दबावामुळे त्यांना बंदीचा काळ ७५ दिवसांवरून ६१ दिवसांवर आणावा लागला.

होड्यांना मोटर न बसवता मच्छीमारी करणार्‍या पारंपरिक मच्छीमारांना तेवढी या बंदीच्या काळात मच्छीमारी करता येणार आहे. मात्र, होड्यांना मोटर बसवून मच्छीमारी करणार्‍या मच्छीमारांनी काल मच्छीमारी खात्याच्या संचालक शमिला मोंतेरो यांची भेट घेऊन बंदीच्या काळात आपणालाही मच्छीमारी करू द्यावी, अशी त्यांच्याशी मागणी केली. मात्र, मोटर बसवलेल्या होड्यांना बंदीच्या काळात मासेमारी करू द्यायची नाही असा निर्णय सरकारने घेतलेला असल्याने आपण काही करू शकत नसल्याचे मोंतेरो यांनी त्यांना सांगितले.