26 C
Panjim
Monday, January 18, 2021

उद्याचा काय नेम?

  • डॉ. सोमनाथ कोमरपंत

माणसाने कसे वागावे याची संथा कवीने दिलेली आहे. तुला आज जे काय वाटतं ते तू करावंस. जे करावयास पाहिजे ते तू मनोभावे करायला लाग. चांगले कृत्य करण्यासाठी आजच्यासारखी सुसंधी नाही. तुझ्या विवेकबुद्धीला खरं काय ते विचारून पाहा.

उद्यांचा काय नेम?
(भुजंगप्रयात)
तुझीया मनी चांगलें व्हावयाचें;
तरी आज हो पर्व हे सोनियाचें!
असे वागले मोठमोठे शहाणे;
उद्यां काय होईल तें कोण जाणे? ॥

धरित्रीवरी काल जीवंत ठेले;
तयांतील पाहा किती आज मेले!
तुला ही अवस्था नसे का वहाणें?
उद्यां काय होईल तें कोण जाणे? ॥

पुढें हें करूं, तें करूं पुण्य साधूं;
धनें मिळवूं, मंदिरें थोर बांधूं;
भ्रमीं वेड या शुद्ध आहे रहाणें;
उद्यां काय होईल तें कोण जाणे? ॥

दरिद्री, मुके, आंधळे, पाहतोसी;
असे नेम का कीं तसा तूं न होसी?
अकस्मात ये हे जिणें दीनवाणें;
उद्यां काय होईल तें कोण जाणे? ॥

नसे आळसासारखा चोर लोकीं
अमोलीक आयुष्य तो चोरतो कीं
‘उद्यां हो उद्यां’ हे तयाचे बहाणे;
उद्यां काय होईल तें कोण जाणे? ॥

म्हणोनि तुला वाटतें तें करावें;
करायास तें आज वा लाग भावें;
दुजा आजच्या सारखा वेळ नाही;
विचारोनि चित्तीं खरें काय पाहीं ॥

  • विनायक कोंडदेव ओक

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पाश्‍चात्त्य विद्येने संस्कारित झाल्यामुळे जी कर्तृत्ववान माणसे निर्माण झाली त्या पिढीतील विनायक कोंडदेव ओक हे महत्त्वाचे नाव होय. (१८४०-१९१४) सरकारी शिक्षण खात्यात शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीस प्रारंभ केला आणि ‘ऍडिशनल डेप्युटी एज्युकेेशन इन्स्पेक्टर’ या पदावरून ते निवृत्त झाले. शालेय क्रमिक पुस्तके आणि बालवाङ्‌मय इत्यादी क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. मेजर कँडी यांच्या सूचनेनुसार ही पुस्तके त्यांनी लिहिली. १८६६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘लघुनिबंधमाला’ या पुस्तकास ‘दक्षिणा प्राइझ कमिटी’कडून बक्षीस मिळाले होते. जगातील प्रसिद्ध राष्ट्रांचा इतिहास सांगणारी पुस्तके त्यांनी लिहिली. याशिवाय काही थोर पुरुषांची चरित्रे लिहिली. श्रेष्ठ दर्जाचे ते पहिलेवहिले चरित्रकार मानले जातात. ‘शिरस्तेदार’ ही लाचलुचपतीच्या दुष्परिणामासंबंधीची स्वतंत्र कादंबरी त्यांनी लिहिली. ‘मधुमक्षिका’ हा त्यांचा कवितासंग्रह. मोरोपंतांच्या काव्यरचनेचे ते चाहते होते. मात्र ओक यांची भाषा साधी, सरळ, सोपी होती.
‘बालवाङ्‌मयाचे जनक’ ही त्यांची खरी ओळख. ‘बालबोध’ हे मराठी वळणाचे बालवाङ्‌मयाला वाहिलेले मासिक त्यांनी १८८१ साली सुरू केले. त्यांच्या या उपक्रमात भावी पिढ्यांचा अभ्युदय व्हावा हा द्रष्टेपणा होता. त्यांच्या संपादकीय दृष्टिकोनातून तो प्रकट होताना दिसतो.

‘‘शाळेत कळत नाहीत पण तुम्हांस कळल्या पाहिजेत अशा लक्षावधी गोष्टी आहेत. त्यांतल्या थोड्या-थोड्या आम्ही दर खेपेस तुम्हाला अगदी तुमच्या साध्या भाषेत सांगू; तुमच्या मनाला करमणूक व्हावी, तुमच्या अंगचे सद्गुण वाढावेत यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.’’
या मासिकाच्या संपादनाचा उपक्रम सलग चौतीस वर्षे चालला. त्यांनी नानाविध स्वरूपाचे एकटाकी लेखन केले. यावरून त्यांची अभंग जिद्द आणि सृजनशीलतेचा झपाटा दिसून येतो. १२ आणे वर्गणी ठेवल्यामुळे ते घरोघरी गेले.
‘उद्यांचा काय नेम?’ या त्यांच्या कवितेतील आशय किती उद्बोधक आहे हे येथे प्रत्ययास येईल. विषय साधा आहे, शब्द सोपे आहेत; पण आशय मोठा आहे. प्रत्येकाने मोठे व्हावे असा त्यामागचा उद्देश आहे. प्रयत्नवादाचा पुरस्कार पूर्वसूरींनी केलेला आहे. संस्कृत सुभाषितांमधूनही आळसासारखा माणसाचा मोठा शत्रू नाही हे मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. सतराव्या शतकाच्या मध्यावधीस समर्थ रामदासांनी आत्मनिर्भर वृत्तीचा आणि प्रयत्नवादाचा जोरदार पुरस्कार केला. पण लक्षात कोण घेतो? म्हणून हा विचार विचारवंतांना, कवी-लेखकांना समाजमानसास पुनः पुन्हा सांगावासा वाटला. त्या-त्या काळाची गरज म्हणून. प्रारब्धवादावर जी राष्ट्रे विसंबून राहिली ती मागे पडली. प्रयत्नवादामुळे उन्नयन करणारी राष्ट्रे झपाट्याने पुढे आली. ऐहिक सुखवर्धनाचा तोच एकमेव मार्ग आहे. कवीला साध्या शब्दांतून येथे हेच सांगायचे आहे.

कविमनाने व्यक्तिमात्राशी केलेला हा हृदयसंवाद आहे. सुरुवातीला कवी उद्गारतो, ‘‘तुझ्या मनात चांगले व्हायचे असेल तर क्षणाची संधी सोडू नकोस. तुझ्या दृष्टीने आजचे पर्व सोन्याचे आहे.’’ कवीची सारी मदार वर्तमानकाळावर आहे; भूतकाळावर नाही. अन् भविष्यकालाची त्याला चिंता नाही. थोर थोर लोक असे असे वागले आणि उद्या काय होईल हे कोणी जाणू शकत नाही या कवीच्या चिंतनाचा रोख आपणास कळतो. हेच या कवितेचे धृपदही आहे आणि अधोरेखितही आहे.

या धरित्रीवर काल कितीतरी माणसे जिवंत होती. पाहा, त्यांतील आज कितीतरी माणसे मेलेली आहेत. अशीच स्थिती तुझ्यावरदेखील येणार नाही का? भवितव्य काय होईल हे कोण बरं जाणू शकेल?
फार मोठे संकल्प करण्यात काहीएक अर्थ नाही. पुढे हे करू, पुढे ते करू आणि पुण्यसंपादन करू या दिवास्वप्नांत रमण्यात वेळ घालवू नये. धन मिळवू आणि भव्य मंदिरे बांधू हा भ्रम आहे. असा विचार करणे हे शुद्ध वेडेपणाचे लक्षण आहे. उद्याची भ्रांत बाळगणे निरर्थक आहे.
तुझ्या भोवताली तू दीनदुबळे, मुके आणि आंधळे पाहतोस. तुझीही स्थिती तशी होणार नाही याचा काय नेम आहे? अकस्मात अशा प्रकारचे दीनवाणे जिणे वाट्याला येऊ शकते. भवितव्याच्या पोटात काय आहे हे कोण बरं जाणू शकेल?
या जगात आळसासारखा चोर दुसरा नाही. तो मौलिक आयुष्य सतत लुबाडत असतो. प्रत्येक बाब ‘उद्या हो उद्या’ असे बहाणे करण्यात त्यामुळे जात असते. अशा वेळी उद्या काय होईल हे कोण बरे जाणू शकेल?
यासाठी माणसाने कसे वागावे याची संथा कवीने दिलेली आहे. तुला आज जे काय वाटतं ते तू करावंस. जे करावयास पाहिजे ते तू मनोभावे करायला लाग. चांगले कृत्य करण्यासाठी आजच्यासारखी सुसंधी नाही. तुझ्या विवेकबुद्धीला खरं काय ते विचारून पाहा.
कवीने मांडलेले विचार तत्कालीन परिस्थितीला अनुसरून होते. पण त्यांची मौलिकता आजच्या काळालाही लागू पडणारी आहे.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

आर्थिक २०२० ः सिंहावलोकन

शशांक मोहन गुळगुळे एक महिन्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार. हा अर्थसंकल्प सादर...

कोरोनाने विश्‍वच बदलले!

श्रीशा वागळे (जीवनशैलीच्या अभ्यासक) रेस्टॉरंट्‌स, कॅङ्गेज्‌मधली मेनूकार्डस्, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी पेये, खाद्यपदार्थांनी सजली आहेत. लग्नं अगदी कमी खर्चात उरकली...

स्वीकार

डॉ. फ्रान्सिस फर्नांडिस ‘‘दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न केलं. डॅनी हँडसम, प्रामाणिक व सरळ स्वभावाचा म्हणून मी...

भोबे, ‘मासे आणि मी’ आणि… मी!

सखाराम शेणवी बोरकर केवळ अठ्ठेचाळीस वर्षांच्या भोबे यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे हा त्यांचा लेखनकाळ होता. या दहा...

‘डिजिटल पेमेन्टस्’चे पर्याय

शशांक मो. गुळगुळे १ जानेवारी २०२१ पासून ग्राहकांना काही बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्यापैकी एक बदल म्हणजे-...