>> शिवप्रेमींमध्ये संताप; शिवाजी महाराजांनी गोव्यात राज्यच केले नसल्याचा दावा; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाला घेतला आक्षेप
‘गोव्यातील सहा तालुक्यांमध्ये शिवशाही होती’ असे जे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हल्लीच झालेल्या शिवजयंती सोहळ्यात केले होते, त्या वक्तव्याला माजी आमदार तथा साहित्यिक ॲड. उदय भेंब्रे यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर आक्षेप घेतल्याने वादाचा विषय बनला आहे. शिवरायांनी गोव्यात राज्यच केले नव्हते, असा दावा ॲड. भेंब्रे यांनी काही इतिहास संशोधकांचा दाखला देत केला आहे. त्यांच्या ह्या दाव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी ॲड. भेंब्रे यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.
हल्लीच झालेल्या एका शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवरायांच्या कार्यावर प्रकाश टाकताना त्यांचे गोव्यातील कार्यही आपल्या भाषणांतून मांडले होते. गोव्यातील जुन्या काबिजाती म्हणजे सत्तरी, पेडणे, फोंडा, सांगे, केपे आणि काणकोण ह्या सहा तालुक्यांमध्ये शिवरायांचे राज्य होते, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान नमूद केले होते.
मुख्यमंत्र्यांचे हे विधान पटलेल्या ॲड. उदय भेंब्रे यांनी काल आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याला आक्षेप घेत वेगळाच दावा केला. ‘गोव्यातील सहा तालुक्यांमध्ये शिवशाही होती’ हे मुख्यमंत्र्यांचे विधान चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या दाव्याखातर त्यांनी इतिहासकारांचे दाखलेही दिले आहेत. महाराष्ट्रातील इतिहासकार सेतू माधवराव पगडी यांनी शिवाजी महाराज यांनी गोव्यात राज्य केल्याचे कुठेही म्हटलेले नाही. याशिवाय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गोव्यातील इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर, डॉ. सेल्सा पिंटो यांच्या इतिहास पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांनी गोव्यात राज्य केल्याचा उल्लेख नाही. मग मुख्यमंत्र्यांना ही माहिती कुठे मिळाली? असा प्रश्न ॲड. भेंब्रे यांनी उपस्थित केला.
गोव्याचा खरा इतिहास बाजूला ठेवून चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. खुद्द डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सुध्दा इतिहास वाचलेला नाही. जे इतिहासात घडलेच नाही, ते सांगण्याचा अट्टहास का, असा सवालही ॲड. भेंब्रे यांनी केला आहे.
इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी उदय भेंब्रे यांचा हा दावा खोडून काढला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात सुद्धा शिवरायांनी गोव्यात राज्य केले, असा उल्लेख नसल्याचा दावा भेंब्रे यांनी आपले मत मांडताना केला आहे. त्यावर, सचिन मदगे यांनी पुरंदरे यांच्या गोव्यातील एका व्याख्यानाचा संदर्भ देत भेंब्रे यांना उघडे पाडले आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत शशिकलाताई काकोडकर यांच्या कार्यकाळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची गोव्यात व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. मडगाव येथे व्याख्यानापूर्वी एका युवकाने बाबासाहेब पुरंदरे यांंंना ‘आपण शिवाजी महाराज यांची माहिती देण्यासाठी आला आहात का?’ असा प्रश्न विचारला. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी त्या युवकाला आपण दुसऱ्या विषयावर बोलण्यासाठी आलो होतो. आता तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारला. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या गोव्यातील कार्यावर बोलणार असल्याचे सांगून शिवरायांच्या गोमंतकातील कार्यावर व्याख्यान दिले होते, याची आठवण मदगे यांनी यानिमित्ताने करून दिली.
भेंब्रे यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे : सचिन मदगे
ॲड. उदय भेंब्रे यांच्या वक्तव्याला इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ॲड. भेंब्रे यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे. खोट बोलून दुसऱ्यांना चुकीचे सांगणे हा त्यांचा स्वभावगुण आहे, अशी टीका इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी केली.
सचिन मदगे यांनी भेंब्रे यांचा दावा काढला खोडून
ॲड. भेंब्रे यांनी दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारचे एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी आपण त्यांना जोरदार शब्दात ठणकावल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा व्हिडिओ एका चॅनलवरून हटविला होता, याची आठवण सचिन मदगे यांनी यानिमित्ताने करून दिली.
शिवाजी महाराजांबाबत ॲड. उदय भेंब्रे हे प्रचंड खोटे बोलत आहेत. सेतू माधवराव पगडी यांनी मुघल-मराठा या विषयावर लिखाण केले आहे. त्यांनी पोर्तुगीजांसंबंधी लिखाण केलेले नाही. शिवशाहीर पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या गोव्यातील कार्याबाबत अनेक व्याख्याने दिली आहेत. याशिवाय डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांच्या पुस्तकांमध्येही शिवाजी महाराजांच्या गोव्यातील कार्यासंबंधी अनेक संदर्भ आहेत, असेही सचिन मदगे यांनी सांगितले.

