>> कुंकळ्ळीतील निषेध सभेत शिवप्रेमींची राज्य सरकारकडे मागणी; अवमान करणाऱ्यांची गय करणार नाही
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी आमदार तथा साहित्यिक उदय भेंब्रे यांचा कुंकळ्ळी येथील चिफ्टन ममोरिअल उद्यानात गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाने आयोजित सभेत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राज्य सरकारने उदय भेंब्रे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या सभेत करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. ॲड. उदय भेंब्रे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी; अन्यथा त्यांच्याविरोधात मोहीम तीव्र करण्यात येणार आहे, असा इशारा चिफ्टन मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्सस यांनी निषेध सभेत बोलताना दिला. ॲड उदय भेंब्रे यांनी आम्हांला चुकीचा इतिहास सांगू नये. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आम्ही आमची कुटुंबे गमावली आहेत. कुंकळ्ळी येथील बंडाबाबत सुद्धा उदय भेंब्रे सहमत नाहीत. आम्ही कुंकळ्ळीतील लढवय्ये आहोत. आम्ही पोर्तुगीजांच्या विरोधात लढा दिला आहे. कुंकळ्ळीच्या उठावावर शंका घेणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मार्टिन्स यांनी दिला.
यावेळी इतिहास अभ्यासक सचिन मदगे व इतर मान्यवरांनी भेंब्रे यांच्या शिवरायांबद्दलच्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध केला. राज्य सरकारने शिवाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वाचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी कायदा तयार करावा, अशी मागणी सभेत करण्यात आली.
वास्कोत आणखी एक तक्रार दाखल
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल उदय भेब्रेंविरोधात वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. नेहमीच नाहक वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविण्याचा खटाटोप भेंब्रे यांचा असतो. शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांनी मोठी चूक केली आहे. त्यामुळे गोव्यातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल त्यांनी शिवप्रेमींची माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणी मुरगावातील शिवप्रेमींनी मुरगावचे पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांना निवेदन सादर केले.

