Home बातम्या उदंड जाहल्या कार्यशाळा

उदंड जाहल्या कार्यशाळा

0

– डॉ. राजीव कामत, खोर्ली – म्हापसा.

सध्या ‘संगीत’ या पवित्र क्षेत्राचे जोरात व्यापारीकरण चालू आहे. एकीकडे बोलताना हे क्षेत्र कसे पवित्र आहे, पैशांच्या पाठीमागे न धावता या क्षेत्रात पुष्कळ दिग्गजांनी कसे योगदान दिले आहे, केवळ पैसा हाच श्रेष्ठ नसून संगीताचा योग्य प्रसार होणे कसे गरजेचे आहे, यासारखी वक्तव्ये सतत ऐकिवात येतात. संगीत शिकवणारे शिक्षक (गुरू) यांचा पण संसार आहे व संसाराचे रहाटगाडगे चालवायचे म्हणजे पैसा हा असायलाच हवा. मी असे मुळीच म्हणत नाही की, संगीताचा प्रसार करताना पैशाचा विचारच व्हायला नको, पण माझे असे म्हणणे आहे की, हे सर्व करताना थोडे तरी तारतम्य बाळगायलाच हवे. सध्या संगीत प्रसाराच्या नावावर जे काही चालले आहे ते पाहिले की मनाला उबग येतो.

यंदा गोवा मुक्तीदिनाच्या वर्धापनदिनी कला आणि संस्कृती खात्याला व त्यांच्या संचालकांना अनुक्रमे उत्कृष्ट खाते व उत्कृष्ट सरकारी अधिकारी असे किताब मिळाले. पण ज्या पद्धतीने हे खाते सध्या अनुदानाची खिरापत वाटत सुटले आहे, त्यामुळे कुठेतरी पाणी मुरतेय असे वाटते. या खात्यातर्फे मुक्तीदिनी जे कार्यक्रम सादर करण्यात आले, त्या कार्यक्रमांचा काही अपवाद वगळता दर्जा एकदमच सुमार होता. या सुमार कार्यक्रमासाठी सरकारी खजिन्याची बेसुमार उधळपट्टी करण्यात आली. सध्या गोव्यातील गावागावांतून संगीत संमेलनांचे अक्षरशः पेवच फुटले आहे. अशा अनेक संमेलनांना मी हजर राहतो. पुष्कळदा अशा संमेलनात भाग घेतलेल्यांचा दर्जा बघितला तर, ही संमेलने केवळ सरकारी अनुदान लाटण्यासाठीच तर आयोजित केली नसावी नां? अशी शंका येते. या खात्याचा अनुदान देण्याचा सपाटा बघून काही आघाडीच्या कलावंतांनी काही खासगी संस्था जन्माला घातल्या आहेत, व दिवसेंदिवस अशा संस्थांची त्यात भरच पडत आहे.

अशाच एका नवीन उगवलेल्या संस्थेतर्फे यंदा नववर्षानिमित्त कला अकादमीत संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील कलाकारांचा या खात्याशी असलेला संबंध पाहाता अनुदान उपटण्यास कोणतीही अडचण भासत नाही. पुढे जाऊन ‘सनबर्न’ सारख्या संगीत रजनींना या खात्याने पुरस्कृत केले तरी आश्‍चर्याचा धक्का बसण्याचे कारण नाही.

प्रस्तुत लेख लिहिण्याचे कारण म्हणजे, सध्या गोव्यात चाललेला विविध ‘कार्यशाळांचा’ धुमाकूळ. या प्रस्थापित आणि काही खासगी संस्था ‘संगीता’वर ज्या कार्यशाळा आयोजित करतात, त्या कार्यशाळांमधून नेमके काय साध्य होते हा एक संशोधनाचा विषय ठरावा. गोव्याच्या सांगीतिक क्षेत्रात डोकावून बघितल्यास, गोव्यात राहून व गोव्यात संगीताचे जे गुरू आहेत, त्यांच्याकडे शिकून पुढे आलेला कलाकार सापडणे कठीण. सध्या तरी माझ्या डोळ्यासमोर असा गोव्यातील कुठलाही कलावंत दिसत नाही, की जो राष्ट्रीय संमेलनात स्वतःची छाप पाडू शकेल. यामागचे कारण शोधायचा प्रयत्न केला तर, असे दिसून येईल की, दोष गुरूत नसून कलाकारांच्या अल्पसंतुष्टपणात आहे.

एखादा कलाकार ‘संगीतविशारद’ झाला की लगेच त्याला आकाश ठेंगणे वाटायला लागते. तो लगेच एकाद्या धार्मिक मेळाव्यात, लग्नात किंवा वाढदिवसाच्या जलशात आपली कला पेश करण्यात दंग होतो. मी स्वतः याबद्धल पुष्कळ प्रथितयश कलाकारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यांच्या मानसिकतेत बदल होण्याची चिन्हे नाहीत. तेव्हा दोन-तीन दिवसांच्या कार्यशाळा भरवून भरीव असे काही साध्य होईल असे वाटत नाही. पण कार्यशाळा भरवणार्‍या संस्थांचा मात्र भरपूर फायदा होतो.

सध्या टीव्हीवरच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर ‘कलाकार’ शोधण्याचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. एखाद्या वाहिनीवर एखादा संगीत कार्यक्रम जम बसवू लागला की, दुसरी वाहिनी लगेच त्याच थाटाचा कार्यक्रम सादर करते. मग मात्यापित्यांना वाटते की, आपल्या पाल्यानेही अशाच कार्यक्रमात भाग घेऊन टीव्हीवर झळकावे. अशा कार्यक्रमांतून नवीन असे काहीच पुढे येत नाही. कारण या स्वरूपाच्या कार्यक्रमातून सर्वसाधारणपणे जुनी किंवा नवीन चित्रपट गीते, जी अन्य कलाकारांनी यापूर्वी गायलेली आहेत, तीच या स्पर्धकांनी सादर करायची असतात. कुठल्याही कलाकाराने मूळ गाण्याच्या व्यतिरिक्त एखादी जागा किंवा हरकत बदलली तर लगेच त्यांना परीक्षकांकडून चाप बसतो. तेव्हा अशा कार्यक्रमातून फक्त एखादा ऑर्केस्ट्रा बघण्याचा आनंद मिळतो. कलाकार जर लहान मुले असतील तर त्यांचे अवास्तव कौतुक होते.

या वेगवेगळ्या वाहिन्या एसएमएसद्वारे पैसा मिळवून स्वतःच्या तुंबड्या भरतात. अशा कार्यक्रमांना परीक्षक म्हणून हजेरी लावणार्‍यांचीही मुळीच वानवा नाही. संगीत क्षेत्रात वरचे स्थान असलेली दिग्गज मंडळी या शोच्या दरम्यान बेताल वागून जी मुक्ताफळे उधळतात ते पाहून व ऐकून अंगावर एकदम शिसारी येते. आणि पालकांच्या या मानसिकतेमुळेच अशा ‘कार्यशाळा’ घडवून आणणार्‍या संस्थांचा उदय होतो. तेव्हा या कार्यशाळा जरूर घ्याव्यात, पण त्या घेताना फक्त आर्थिक फायद्याचाच विचार न करता, अशा कार्यशाळात भाग घेणार्‍यांना त्याचा कोणता आणि किती फायदा होतो, याचाही जरूर विचार व्हावा.