उत्पल यांच्या पाठिशी उदय मडकईकरांचा ‘हात’

0
12

>> पाठिंबा जाहीर; तृणमूल कॉंग्रेसची ऑफर नाकारली

भाजपला सोडचिठ्ठी देत पणजीतून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणार्‍या उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय काल पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर यांनी जाहीर केला.

मडकईकर यांनी पणजीतून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला होता, तसेच त्यांनी प्रचार सुध्दा सुरू केला होता; परंतु कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारून एल्विस गोम्स यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मडकईकर नाराज बनले होते. तृणमूलने मडकईकर यांना पक्षात प्रवेश करण्याची विनंती केली होती. तसेच पणजी तून उमेदवारी देण्याचे आश्‍वासनही दिले होते.

दुसरीकडे, पणजीतून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी उत्पल यांनी मडकईकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पाठिंबा मागितला होता. तसेच आपचे वाल्मिकी नाईक, कॉंग्रेसचे एल्विस गोम्स यांनीही त्यांच्याकडे पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यामुळे मडकईकर कोणता निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर काल रात्री पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला पाठिंबा उत्पल यांना जाहीर केला. तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर अनेकांनी आपली भेट घेऊन उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याची विनंती केली, असे मडकईकर यांनी यावेळी सांगितले.

पणजीतील अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आपण आणि आपले समर्थक अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांच्या प्रचारासाठी काम करणार आहेत.

  • उदय मडकईकर,
    माजी महापौर, पणजी.