उत्पल पर्रीकर आज निर्णय जाहीर करणार

0
12

>> उमेदवारी नाकारल्याने अपक्ष लढण्याची दाट शक्यता

भाजपने पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर काल रात्री उत्पल पर्रीकर यांनी आपल्या समर्थकांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अंतिम निर्णय घेतला असून, ते आपला निर्णय शुक्रवारी जाहीर करणार आहेत, अशी माहिती भाजपचे माजी प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी दिली. उत्पल पर्रीकर हे पणजीतून अपक्ष लढण्याची दाट शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजप पणजीतून उमेदवारी देणार का, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. मात्र पक्षाने विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांनाच उमेदवारी देत उत्पल पर्रीकरांना नाकारली आहे. सोबतच पक्षाने त्यांच्यासमोर अन्य दोन जागांचा पर्याय ठेवला होता. ते देखील त्यांनी नाकारले आहेत.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी उत्पल पर्रीकर यांचा विषय भाजपचे प्रभारी हाताळत आहे, असे काल सांगितले.
केजरीवालांकडून पुन्हा ‘ऑफर’
मनोहर पर्रीकरांच्या कुटुंबाबाबत भाजपने वापरा आणि फेकून द्या हे धोरण अवलंबिले आहे. उत्पल पर्रीकर यांचे आपमध्ये स्वागत आहे. आपच्या उमेदवारीवरून ते निवडणूक लढवू शकतात, अशी ऑफर पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

प्रस्ताव धुडकावला
भाजपने आपल्यासमोर ठेवलेले प्रस्ताव आपणास मान्य नाहीत. मी माझ्या पर्यांयाचा विचार केला असून, लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे उत्पल पर्रीकर यांनी काल स्पष्ट केले. त्यांनी पणजी मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपने डिचोलीसह अन्य एका मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव दिला, तो प्रस्ताव त्यांना मान्य नाही. अन्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली इच्छा नाही, असेही उत्पल पर्रीकरांनी म्हटले आहे.