Home बातम्या उत्तर भारतात थंडीची लाट

उत्तर भारतात थंडीची लाट

0

उत्तर भारतात थंडीची लाट आली असून अनेक शहरांमध्ये पारा खाली उतरल्याने नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत. दाट धुक्यामुळे रेल व विमान सेवांवरही परिणाम झाला आहे. काल सकाळी कोलकता विमानतळावरही दाट धुक्यामुळे देशी व आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे होऊ शकली नाहीत. वीसहून अधिक उड्डाणे रद्द करणे भाग पडले. उत्तर भारतात ४० पेक्षा अधिक रेलगाड्या उशिराने धावत असून अनेक रेलगाड्यांच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात थंडीच्या लाटेत २६ जणांचा बळी गेला असून इतर राज्यांतूनही थंडीमुळे माणसे मृत्युमुखी पडण्याच्या घटना कानी येत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये तापमान ४.७ अंश होते, तर मीरतमध्ये ते तब्बल २.२ अंशांपर्यंत खाली घसरले होते. हिस्सार, रोहतकमध्ये १.६ अंश तापमानाने नागरिक गारठले. दिल्लीत कमाल तापमान २३ अंश आहे. पंजाब व हरियाणात अनेक ठिकाणी पारा पाच अंशांनी खाली गेला आहे. हरियाणा व पंजाबमध्ये घनदाट धुके पडत असून त्यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. पतियाळा, अंबाला व कर्नालमध्ये वाहतुकीवर धुक्याचा परिणाम झाला आहे. चंडीगढमध्ये किमान तापमान ५.३ अंश होते, तर कर्नाल व नर्नालमध्ये तापमान २.६ व २.५ अंशांपर्यंत खाली गेले. काश्मीर खोर्‍यात गुलमर्गमध्ये तापमान वजा ७.४ अंशांपर्यंत खाली गेले आहे. पहलगाममध्ये वजा ४.६ तापमान असून श्रीनगरमध्ये वजा २.८ पर्यंत तापमान उतरले.