देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये रविवारी सकाळी 6 ते 9 या वेळेत संततधार पाऊस झाला, ज्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर 3-4 फूट पाणी साचले. घरांमध्येही पाणी शिरले. अनेक ठिकाणी वस्त्याही पाण्याखाली गेल्या. मध्य प्रदेशातील दिंडोरीमध्ये शनिवारी रात्री 9 ते रविवारी सकाळी 6 च्या दरम्यान 6 इंच पावसाची नोंद झाली. दिल्लीत गेल्या आठ दिवसांत महिन्याभराचा पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत दिल्लीत 230.1 मिमी पाऊस झाला असून, तो या महिन्याच्या 226.8 मिमी सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त आहे.
नागालँडमधील दिमापूर जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आणि घरात पाणी शिरल्याने विजेचा धक्का लागून एका अंतिम वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. एसडीआरएफने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नऊजणांची सुटका केली. रिव्हर बेल्ट कॉलनीतील एका वसतिगृहातील चार विद्यार्थ्यांना आणि होली क्रॉस स्कूल परिसरात अडकलेल्या पाच जणांनाही बाहेर काढण्यात आले.

