उत्तराखंडमध्ये बोगस सैन्यभरती प्रकरण उघड

0
4

उत्तराखंडमध्ये बोगस सैन्य भरतीचे प्रकरण उघडझाले असून या प्रकरणी पोलिसांनी 28 वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. सत्यजीत कांबळे असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा अहमदनगरचा आहे. कांबळे हा स्वत:ला मेजर असल्याचे भासवत असल्याचे तपासात उघड झाले आहे. कांबळेने विविध राज्यांतील तरुणांना गंडा घातला असून त्याने प्रत्येक तरुणाकडून भरतीच्या नावाखाली 7-8 लाख रुपये उकळले असावेत असा अंदाज आहे. सत्यजीत याच्याविरोधात 26 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक झालेल्या एका तरुणाने पोलिसांत धाव घेत सत्यजीतविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सत्यजीत याने सैन्यात भरतीसाठी अनेकदा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्याला अपयश आले होते. भरतीची प्रक्रिया जवळून पाहिल्याने त्याला यातून गैरमार्गाने पैसे कमावण्याचा मार्ग सुचला. सत्यजीत याने ‘मेजर’ असल्याचे भासवत उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशातील तरुणांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.