निसर्गाच्या प्रकोपाचे एक भयंकर रुप मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बघायला मिळाले. ढगफुटी झाली आणि त्यानंतर अचानक आलेल्या पुरात निम्मे धराली गाव मातीखाली गाडले गेले. या घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तसेच अनेक जण बेपत्ता आहेत. धरालीबरोबरच सुखी टॉप जवळही ढगफुटी झाली. धरालीमध्ये ज्या ठिकाणी ढगफुटी झाली, तिथून गंगोत्री धाम फक्त 18 किमी अंतरावर आहे. तसेच भारतीय लष्कराच्या हर्षिल तळापासून हे ठिकाण फक्त 4 किमी दूर आहे. ढगफुटीनंतर धरालीमध्ये झालेल्या प्रलयाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ढगफुटी झाल्यानंतर खीर गंगा ओढ्याला पूर आला आणि अवघ्या 34 सेकंदात अचानक आलेल्या पाणी आणि मातीच्या पुरात गावातील घरे, दुकाने आणि हॉटेल्स गाडली गेली.
जो मातीचा ढिगारा खीर गंगेच्या पात्रातून आला होता, तो भगीरथी नदीच्या पात्रात मिळाला. भगीरथी नदीच्या पात्रात जाताना हा ढिगारा निम्म्यातील धरालीतील घरांचा घास घेऊन गेला. पुराचे पाणी बऱ्याच अंतरावरून आणि उंचीवरून आले, त्यामुळे त्याला प्रचंड वेग होता. धराली गाव नदीच्या काठावर आहे. काठाच्या दोन्ही बाजूंना घरे होती. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते थेट गावात घुसले.
भगीरथी नदीच्या काठावर धराली, हर्षिल, आणि बेली अशा छोट्या आकारातील गावे आहेत. हर्षिलमध्ये लष्कराची छावणी आहे, त्यामुळे धरालीमध्ये शोधकार्य सुरू करण्यात मदत झाली.
धराली गाव समुद्र सपाटीपासून 12600 फूट उंचीवर आहे. पाणी आणि गाळ 43 किमी प्रतितास या वेगाने 1230 फूट इतक्या उंचीवरून खाली आला होता आणि गावात शिरला. खीर गंगा ओढ्याला गावाजवळच वळण आहे. त्यामुळे गावातील घरांचे जास्त नुकसान झाले.
ढगफुटीमुळे आलेल्या पाणी आणि चिखलाच्या पुरामुळे गंगोत्री धामशी रस्त्यांमार्गे असलेला संपर्क तुटला आहे. ढगफुटीमुळे खीर गंगा नदीला पूर आला. खीर गंगा नदी ही हरी शीला पर्वतावरील सात ताल परिसरातून वाहत येते. तिथेच ढगफुटीची ही घटना घडली आहे. या नदीच्या उजव्या भागात धरालीचा परिसर आहे, तर डाव्या बाजूला हर्षिल येथील तेल गाट येथे लष्कराचा तळ आहे.
ढगफुटीचा लष्करालाही बसला फटका
या ढगफुटीचा फटका लष्करालाही बसला असून, एक हेलिपॅड वाहून गेला आहे. तसेच हर्षिल येथे नदीकिनारी हा हेलिपॅड बांधण्यात आला होता. तसेच लष्कराने अनेक जवानही दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत. हर्षिल येथे लष्कराची 14 राजरिफ यूनिट तैनात आहे.