उत्कृष्ट शिक्षक : एक चिंतन

0
2430

– गजानन हरिश्‍चंद्र मांद्रेकर
उत्कृष्ट शिक्षक कसा असावा हे ठरवण्याआधी शिक्षण म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण शिक्षकाची भूमिका व त्याचे कार्य हे शिक्षणाशी व विद्यार्थ्याशी जोडलेले आहे. शिक्षक आणि शिक्षण हे हातात हात घालून चालत असते. शिक्षणातून काय साध्य करायचे आहे हे ध्यानी घेतल्याशिवाय कुठलाही शिक्षक उत्कृष्टतेकडे वाटचाल करू शकणार नाही. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा विकास कसा होतो याची व्यवस्थित कल्पना असल्याशिवाय शिक्षक विद्यार्थी घडवू शकणार नाही.
आमच्या शिक्षणतज्ज्ञांची शिक्षणविषयक मते जाणून घेतल्यास शिक्षणाचे खरे स्वरूप आपल्याला समजेल आणि त्याआधारे आजच्या काळातील शिक्षक कसा असावा याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. शिक्षणासंदर्भातील ही निवडक दहा मते ः
१) जे ज्ञान मनुष्यामध्ये आधीचेच निहीत असते, त्याचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय!
स्वामी विवेकानंदांनी शिक्षणासंबंधी बोलताना ज्ञान हे बाहेरून येत नाही तर ते आतून बाहेर पडते, असे सांगितले आहे. आतापर्यंत कोणीही कोणालाही शिकवलेले नाही. प्रत्येक मनुष्य स्वतःच शिकत असतो असे ते म्हणतात. मनुष्य जन्माला येताना ज्ञानाचा प्रचंठ साठा बरोबर घेऊनच जन्माला येतो. फक्त त्या ज्ञानाची जाणीव करून देण्याचे काम शिक्षकांनी करायचे असते. ज्ञानाच्या प्रचंड साठ्यावरील पडदा दूर करण्याचे काम तेवढे शिक्षकांनी करायचे असते.
२) माहितीला अनुभवाची जोड मिळाली म्हणजे ते ज्ञान होते; आणि ज्ञानाला विवेकाची जोड मिळाली म्हणजे शहाणपण येते.
आजच्या काळात निरनिराळ्या प्रकारची माहिती देणे यालाच शिक्षण समजले जाते. त्यामुळे विविध प्रकारची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना पुरवणे हेच आपले काम आहे असा समज शिक्षकांनी करून घेतलेला आहे. परिणामी अधिकाधिक माहिती विद्यार्थ्यांना पुरवणारा शिक्षक आपल्याला उत्कृष्ट शिक्षक समजतो. परंतु ज्ञान आणि माहिती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षातच घेतले जात नाही. त्याही पुढे जाऊन जीवनात प्रत्यक्षात उपयोगी पडणारा शहाणपणा हासुद्धा शिक्षणातला महत्त्वाचा बिंदू आहे, हे नव्या शिक्षकाच्या ध्यानातही नसते. माहितीचे रूपांतर ज्ञानात करण्यासाठी अनुभव देण्याची व त्या ज्ञानाचे शहाणपणात रूपांतर करण्यासाठी विचार करण्याची एक महत्त्वपूर्ण पायरी असते, हे ध्यानात घेऊन आपले काम करणारा शिक्षकच उत्कृष्ट शिक्षक ही बिरुदावली मिरवू शकतो. कारण शिक्षणाचा उपयोग शेवटी जीवन जगताना करायचा असतो.
३) दिसण्याचे पाहण्यात, पाहण्याचे समजण्यात, समजण्याचे शिकण्यात आणि शिकण्याचे कृतीत रूपांतर होण्यासाठी आपण शिकायला हवे.
आपल्या डोळ्यांना जे जे दिसते ते सर्वकाही चांगले असतेच असे नाही. त्यामुळे सभोवताली जे दिसते त्यापैकी काय घ्यावे आणि काय घेऊ नये याचे भान शिक्षकाने विद्यार्थ्याला द्यायला हवे. जे घेण्याजोगे आहे, ते समजून घेणे आणि समजलेले शिकून घेऊन ते प्रत्यक्ष कृतीत कसे आणता येईल याचे विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे हे चांगल्या शिक्षकाचे काम आहे.
४) शिक्षण म्हणजे वळण आहे! दळण नव्हे!
शिक्षणाचा मुख्य उद्देश संस्काराचे बीजारोपण हे आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या शरीराला व मनाला योग्य वळण लावणे हे शिक्षणाचे व पर्यायाने शिक्षकाचे कार्य आहे. विद्यार्थ्याच्या डोक्यात अधिकाधिक माहिती कोंबणे आणि ती परीक्षेसाठी पुन्हा पुन्हा दळून घेणे हा शिक्षणाचा मूळ हेतू नाही, हे आजच्या काळातील शिक्षकाने समजून वागले पाहिजे. दळण्यापेक्षा शिक्षणप्रक्रियेत वळणाला अधिक महत्त्व आहे हे कायम ध्यानी ठेवायला हवे.
५) ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चारित्र्य निर्माण होणे हेच असले पाहिजे.
चारित्र्याशिवाय ज्ञानाला आणि चारित्र्यहीन ज्ञानी माणसाला मान नाही. म्हणून ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेचा शेवट हा सुंदर चारित्र्य निर्मितीतच व्हायला हवा. शिक्षणाचा हा हेतू लक्षात घेऊनच शिक्षकाने शिकवले पाहिजे. आजच्या काळातील नैतिक शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्यनिर्मिती करता येते. परंतु नैतिक शिक्षणाकडे त्या दृष्टिकोनातून बघून तशा पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे. म्हणून नैतिक शिक्षण हा एखाद्या विशिष्ट शिक्षकाचा विषय न राहता, तो सर्व विषयांचा व सर्व शिक्षकांचा विषय बनला पाहिजे. आपापल्या विषयात नैतिक शिक्षणातून विविध प्रकारचे संस्कार कुठे व कसे करता येतील याचा विचार प्रत्येक शिक्षकाने केला तर सुंदर चारित्र्यनिर्मितीचे शिक्षणाचे ध्येय गाठता येणे कठीण नाही.
६) सूक्ष्म निरीक्षण करणे, खूप अनुभव घेणे आणि खूप अभ्यास करणे हे शिक्षण प्राप्त करण्याचे तीन आधारस्तंभ आहेत.
ज्ञानप्राप्तीची जी विविध साधने आहेत, त्यांमध्ये सूक्ष्म निरीक्षण, अनुभव व अभ्यास ही अधिक महत्त्वाची साधने आहेत. सूक्ष्म निरीक्षणाशिवाय खरे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. जगातले मोठमोठे शोध हे सूक्ष्म निरीक्षणातूनच लागलेले आहेत. सूक्ष्म निरीक्षणातून विचारप्रक्रिया सुरू होते. विचारप्रक्रिया सुरू झाली की प्रश्‍न निर्माण होतात. त्यातून पुन्हा विचार करणे सुरू होते. ही प्रक्रिया अशीच चालू राहते आणि मग तिचा शेवट ज्ञानप्राप्तीत होतो.
निरीक्षणाला अनुभवाची जोड मिळाली की ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया सोपी व वेगवान होते. म्हणून शिक्षणात स्वतः अनुभव घेण्याला फार महत्त्व आहे. उहळश्रव श्रशरीपी पेीं लू ळर्पीींीीलींळेपी, र्लीीं लू शुशिीळशपलशी! असे जे म्हटले जाते ते तंतोतंत खरे आहे आणि त्याचा अनुभव आपण पदोपदी घेत असतो.
निरीक्षणाच्या जोडीला अनुभव आणि या दोहोंना अभ्यासाची जोड दिली तर मिळणारे ज्ञान अधिक खोल, शाश्‍वत आणि दीर्घकाळ टिकणारे असते. अभ्यास म्हणजे एखाद्या गोष्टीचा सराव करणे. सरावामुळे आपले ज्ञान पक्के होते. म्हणूनच सूक्ष्म निरीक्षणाअंती प्रत्यक्ष अनुभवातून प्राप्त केलेले ज्ञान अभ्यासाने पक्के झाले की ज्ञानप्राप्तीचा खरा आनंद मिळतो ही बाब आजच्या काळातील तरुण शिक्षकांनी समजून घ्यायला हवी.
७) खरे शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला!
शिक्षणप्रक्रियेत प्रश्‍नांना फार महत्त्व आहे. कारण प्रश्‍न पडल्याशिवाय आपण विचार करत नाही, आणि विचार केल्याशिवाय आपल्याला प्रश्‍नही पडत नाहीत. यासाठीच विद्यार्थ्याला विचार करण्यास प्रवृत्त करणारे म्हणजेच त्याच्या मनात नानाविध प्रश्‍न निर्माण करणारे शिक्षण देण्याकडे शिक्षकाने विशेष लक्ष दिले पाहिजे. आपल्यासमोरचा विद्यार्थी अधिकाधिक प्रश्‍न विचारू लागला म्हणजे शिक्षकाच्या मनात आनंदाचे कारंजे उडले पाहिजेत. घरी जाताना मुलांना गृहपाठ देण्याबरोबरच विद्यार्थी घरी विचार करेल असे काहीतरी शिक्षकाने दिले पाहिजे.
मुलांनी स्वतः विचार करावा, त्यांना पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे त्यांनीच स्वतः विचार करून शोधावीत. यासाठी हळूहळू शिक्षक अनावश्यक वाटावा अशी स्थिती निर्माण करण्याचे ध्येय शिक्षकाने ठेवले पाहिजे.
ज्यांच्या स्मरणार्थ देशभर शिक्षकदिन साजरा केला जातो, त्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी उत्कृष्ट शिक्षकाची फार सुरेख व्याख्या केली आहे. ते म्हणतात, कश ळी ींहश लशीीं ींशरलहशी, ुहे ींशरलहशी श्रशरीीं! म्हणजे शिक्षकाने कमीत कमी शिकवून विद्यार्थी स्वतः अधिकाधिक शिकेल यासाठी त्याला प्रशिक्षित केले पाहिजे. स्वतः शिकण्याची आवड व इच्छा खरे म्हणजे प्रत्येकाला असते. परंतु अनेकवेळा ही संधी मिळत नाही, किंबहुना दिली जात नाही. सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता जॉर्ज बर्नार्ड शॉ याने एके ठिकाणी म्हटले आहे की, ख ुरपींशव ींे श्रशरीप ीेाशींहळपस, र्लीीं यींहशू’ ुशपीं ेप ींशरलहळपस! मुलांची स्वतः शिकण्याची इच्छा शिक्षकांनी मारू नये. उलट त्यांना स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी प्रेरित करावे, अशी अपेक्षा आहे.
८) अंतर्मुखता ही खर्‍या शिक्षणाची सुरुवात आहे.
आपल्या पंचेंद्रियांवर योग्य संस्कार करणे हा शिक्षणाचा एक हेतू आहे. आपले डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा या पंचेंद्रियांच्या आधारे आपण शिकत असतो. काही गोष्टी डोळ्यांनी बघून, काही गोष्टी कानांनी ऐकून, काही गोष्टी नाकाने वास घेऊन, काही गोष्टी जिभेने चव घेऊन तर काही गोष्टी त्वचेचा आधार घेऊन स्पर्शाद्वारे आपण शिकत असतो.
डोळ्यांना सभोवताली अनेक गोष्टी दिसतात, परंतु त्या सर्वकाही बघण्यासारख्या नसतात. कानांनाही अनेक बर्‍यावाईट गोष्टी ऐकू येतात. नाकालाही असाच चांगला-वाईट गंध येतो. जिभेद्वारे घेतलेल्या सगळ्याच चवी चांगल्या नसतात आणि सगळेच स्पर्श सुखावह नसतात. या सगळ्यातून निरक्षिर विवेकबुद्धीने चांगले तेवढे घेता आले पाहिजे. चांगले-वाईट ठरवण्याची ही क्षमता शिक्षणामुळे आपल्याला प्राप्त होते. त्यालाच आपण अंतर्मुखता म्हणतो.
९) शिक्षणाचा उद्देश केवळ ज्ञान देणे हा नव्हे तर शिक्षणाने जीवनाचा अर्थ सांगावा व तो जीवनात साकार करावा.
माहिती व ज्ञान मिळवणे किंवा देणे हा शिक्षणाचा एक हेतू आहे. परंतु तो काही शिक्षणाचा प्रमुख हेतू निश्‍चितपणे नाही. आजचा विद्यार्थी भरपूर माहिती व ज्ञान मिळवतो. पंरतु त्या ज्ञानाचा जीवनात प्रत्यक्ष उपयोग करताना तो कमी पडतो. ‘जीवनशिक्षण’ हा शब्दप्रयोग आपण बर्‍याचवेळा करतो, परंतु तो योग्य अर्थाने नाही. ‘जीवनशिक्षण’ म्हणजे केवळ जीवन जगण्याचे शिक्षण नव्हे, तर जीवनाला सामोरे जाण्याचे, जीवन का व कसे जगावे याची उत्तरे देण्याचे शिक्षण होय!
अनेकवेळा आधुनिक काळात जीवन जगण्याचे शिक्षण शाळा-महाविद्यालयांतून मिळते, परंतु जीवनाचा अर्थ काय याचे उत्तर त्यामधून मिळत नाही. मनुष्यजन्म हा किती मौल्यवान आहे व तो कसा अर्थपूर्णरीत्या साकार करायचा हे विद्यार्थ्याला कळण्याची सोय शिक्षणाने व पर्यायाने शिक्षकाने करायला हवी.
१०) नेहमीच उताराकडे धाव घेणार्‍या जीवनाला उन्नत करते ते शिक्षण होय!
चांगले संस्कार करणे ही कष्टप्रद गोष्ट असते. परंतु वाईट संस्कार हे लगेच होतात. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर चांगले संस्कार हे ‘करावे’ लागतात, तर वाईट संस्कार हे ‘होतात!’
चढणीला सायकल जशी कष्टाने चालवावी लागते, तसे चांगले संस्कार हे खूप कष्ट घेऊन करावे लागतात. वाईट संस्कार हे उतारावरील सायकलसारखे आहेत. उतारावरील सायकल चालवताना कष्ट करावे लागत नाहीत. ती ढकलावी लागत नाही. ती आपोआप खाली जाते. तसेच वाईट संस्कारांचे आहे.
आपले जीवन हे नेहमी उताराकडे धाव घेत असते. म्हणजे ज्या गोष्टी वाईट असतात, जीवनाला हानीकारक असतात, त्या आपण लगेच आत्मसात करतो. परंतु हितकारक गोष्टी आत्मसात करायला मात्र खूप कष्ट घ्यावे लागतात. ते कष्ट घेण्याचे काम शिक्षणाने करायला हवे आणि यासाठी शिक्षकाने सतत प्रयत्नशील राहायला हवे.
या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षकाने स्वतः शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणार्‍याने सतत शिकत राहायला हवे. त्याची शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद पडता नये. शिक्षकाने आयुष्याच्या अंतापर्यंत विद्यार्थी म्हणूनच जगायला हवे. त्याची शिकण्याची इच्छा कधीही मरू देता कामा नये. कुठल्याही शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावरच अवलंबून असतो. शिक्षणविषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो. कारण कुठलीही शैक्षणिक योजना शिक्षकाशिवाय राबवली जाऊ शकत नाही. थोडक्यात, उत्कृष्टतेचा ध्यास घेणार्‍या शिक्षकाला एकूण शिक्षणप्रक्रिया माहीत असायला हवी आणि विशेष करून शिक्षण म्हणजे नेमके काय हे त्याला सविस्तर माहीत हवे. शिक्षणाशी संबंधित सर्व विषयांवर त्याचे सखोल चिंतन हवे. त्यासाठी भरपूर वाचन, भरपूर श्रवण करायला हवे. वाचलेल्या व ऐकलेल्या गोष्टींवर मनन करून या गोष्टी मुलांच्या दैनंदिन अध्ययनात कशा साकार करता येतील याचे नियोजन करणारा शिक्षकच उत्कृष्टतेच्या महामार्गावरून मार्गक्रमण करू शकतो.
शिकवणे म्हणजे माझा विषय शिकवणे ही वृत्ती नव्या जमान्यातील शिक्षकांच्या मनातून हद्दपार व्हायला हवी. शिक्षक हा पाठ्यपुस्तकाचा नसावा. तो एखाद्या विशिष्ट विषयाचाही नसावा. शिक्षक हा विद्यार्थ्याचा असावा! हा मूलभूत विचार नव्या पिढीतील शिक्षकासमोर त्याला समजेल अशा पद्धतीने आणि त्याला रूचेल अशा रीतीने मांडला पाहिजे. शिक्षणाकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन एखाद्या शिक्षकाला लाभला म्हणजे मग पुढच्या गोष्टी त्याला सांगाव्या लागणार नाहीत.
दुर्दैवाने शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमात वर्गात शिकवण्यासाठी आवश्यक ती तंत्रे शिकवली जातात. परंतु शिक्षणाकडे बघण्याचा शुद्ध दृष्टिकोन प्रदान करण्याची सोय या अभ्यासक्रमात नाही. त्यामुळे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या बिचार्‍या शिक्षकाला शिक्षण म्हणजे काय व शिकवणे म्हणजे काय हे ठावूक नसते. शिक्षणाची मूळ संकल्पनाच स्पष्ट नसलेला शिक्षक मुलांमध्ये कसल्याही प्रकारचे ज्ञान, कौशल्य वा चारित्र्य यांचे बीजारोपण करू शकत नाही. अलीकडच्या काळात शाळाही मार्क्सवादी बनल्यामुळे शिक्षकांना समृद्ध बनवण्यासाठी शाळांकडे वेळ नसतो. एकदा प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकालाही निरंतर प्रशिक्षणाची आवश्यकता असते याचा विचार फार कमी शाळा करतात. त्यामुळे नोकरीला लागताना शिक्षक जसा असतो, तसाच तो बर्‍याचवेळा निवृत्त होतो. त्याच्या कौशल्यात, ज्ञानात कसल्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही. आधीच हुशार मुलांनी एकतर विज्ञान शाखेत किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा असा अलिखित नियम समाजाने घातला आहे. त्यामुळे काही अपवाद सोडले तर ज्यांना कमी गुण मिळालेत ते व जे दोनतीन वेळा प्रयत्न करून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेत ते कला शाखेत प्रवेश घेतात. एकही दिवस ज्यांनी प्रत्यक्ष वर्गात शिकवलेले नसते, ते प्रशिक्षण महाविद्यालयात देशाचे भवितव्य घडवण्याची फार मोठी जबाबदारी असलेल्या भावी शिक्षकांना शिकवतात. त्यामधून पुढे भाषा, इतिहास, भूगोल अशा विषयांचे शिक्षक निवडले जातात. त्यात त्यांना योग्य दृष्टिकोन देण्याची तसदी शाळा घेत नाहीत. अशा बिकट परिस्थितीत चांगला शिक्षक सापडणे कठीण होऊन बसले आहे. प्रगल्भ शिक्षकनिर्मिती हा आजच्या काळातील शिक्षण क्षेत्रातील ऐरणीवरचा विषय मानायला हवा.