आगीचे कारण अस्पष्ट, जीवितहानी नाही
उतोर्डा येथील ‘जॅमिंग गोट’ या प्रसिद्ध शॅकला काल रविवारी पहाटे भीषण आग लागली. वेर्णा आणि मडगाव अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र या आगीत शॅॅकमधील साहित्याचे सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातच जिल्हा प्रशासनाने या शॅकचे बेकायदा बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले होते.
स्नेहा नरोन्हा यांच्या मालकीच्या या शॅकला रविवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच वेर्णा अग्निशामक दलाचे अधिकारी दिलेश गावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मडगाव अग्निशामक दलाचा बंबही पाचारण करण्यात आला. या आगीत शॅकमधील टेबल, खुर्च्या, विद्युत वायरिंग आणि मद्याच्या साठ्यासह इतर साहित्य जळून खाक झाले. शॅकमध्ये गॅस सिलिंडरही होते, परंतु सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अग्निशामक दलाने केलेल्या चौकशीत या शॅकच्या बांधकामासाठी अग्निशामक दलाचा कोणताही परवाना घेण्यात आला नव्हता, तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती.
‘गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा’ने केलेल्या पाहणीत या शॅकचे बांधकाम बेकायदा होते. दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाने कारवाईचे निर्देश दिले असून, आज सोमवारी सकाळी हे बेकायदा बांधकाम पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

