चौकशीसाठी प्रकरण बार्देश तालुका उपजिल्हाधिकार्यांकडे
लग्न न करता पती-पत्नीप्रमाणे वर्षभर एकाच भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या एका २० वर्षीय तरुणीने गेल्या ८ एप्रिल रोजी खोलीतील लोखंडी पाईपला दुप्पट्याच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. या तक्रारीचा पंचनामा म्हापसा पोलिसांनी केला असून पुढील कारवाईसाठी ही तक्रार बार्देश तालुका उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांच्याकडे देण्यात आली आहे.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोंड-मयडे येथील एका चाळीत गेल्या काही वर्षांपूर्वी आईवडील, दोन मुली व एक भाऊ असे कुटुंब राहत होते. या कुटुंबातील पती-पत्नी हे आपल्या कर्नाटक येथील गावी गेले व त्या मुलांबरोबर त्यांचे काका व काकी राहायला आली. त्यापैकी एक २० वर्षीय मुलीचे थिवी येथील संशयित विश्वास नाईक परुळेकर याच्याबरोबर प्रेमसंबंध जमले. या प्रकाराची माहिती मुलीच्या काका-काकीला कळताच त्यांनी आपल्या पुतणीला कर्नाटक येथील गावी पाठविले. त्यानंतर संशयिताने थोड्याच दिवसांनी तिला गोव्यात आणून त्याच चाळीत दुसर्या भाड्याच्या खोलीत ठेवून दोघेही एकत्र राहण्यास सुरवात केली होती.
गेल्या ८ एप्रिल रोजी वरील जोडपे खोलीबाहेर गेले व दुपारी पुन्हा आले. बाहेरून दुपारी खोलीवर आल्यावर त्यांचे भांडण झाल्याचे तिच्या बहिणीने ऐकले होते. त्याच दिवशी सायंकाळी ६.३० च्या सुमारास तिने दुप्पट्याच्या सहाय्याने लोखंडी पाइपला बांधून खोलीतच गळफास लावून आत्महत्या केल्याचे संशयितास सायंकाळच्यावेळी खोलीकडे आल्यानंतर निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी ओरड मारल्यानंतर तिला पोलीस जीपमधून आझिलो इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले होते.
म्हापसा पोलिसांना आझिलो इस्पितळातून घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून गुन्हा नोंदवून प्रकरण पुढील तपासासाठी उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

