32 C
Panjim
Sunday, April 18, 2021

उच्च महिमा ॐकाराचा

योगसाधना – ४९८
अंतरंग योग – ८३

 • डॉ. सीताकांत घाणेकर

ॐकाराच्या उच्चारण्यात प्रत्येक पैलूंवर फायदे आहेत- शारीरिक, मानसिक भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक. म्हणूनच योगसाधनेत त्याचा उपयोग क्षणोक्षणी दिसतो. नियमित योगसाधना करणार्‍या सर्व योगसाधकांना त्यांच्या आत्मकल्याणासाठी ॐबद्दलची माहिती अत्यंत लाभप्रद ठरेल.

भारतीय संस्कृतीत ‘ॐ’ला अत्यंत महत्त्व आहे. आपण ज्या ज्या वेळी या शब्दाचा उच्चार करतो, त्या त्या वेळी जर ज्ञानपूर्ण व भावपूर्ण रीतीने केला तर फारच फायदा होईल. ॐ हा ज्ञानयोगात, तसेच भक्तियोगातदेखील आहे. अनेक स्तोत्रे, प्रार्थना या ॐपासूनच सुरू होतात. तसेच यज्ञाची सुरुवातदेखील ॐचा उच्चार करूनच केली जाते.

या संदर्भात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते बघुया…
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः |
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ २४॥

 • वेदमंत्रांचा उच्चार करणार्‍या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान, तपरूप क्रियांचा नेहमी ॐ या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. हे सांगण्यापूर्वी आधीच्या श्‍लोकात देव म्हणतात-
  ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः |
  ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ २३॥
 • ॐ, तत्, सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यांपासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादि रचले गेले आहेत.
  पू. पांडुरंगशास्त्री आठवले इथे फारच मौलिक माहिती देतात-
  ‘‘वेदमंत्र ॐपूर्वकच उच्चारले जातात. ओंकाराशिवाय वैदिक मंत्र लंगडे गणले जातात. ओंकारपूर्वक केलेली कोणतीही कर्मे सात्त्विक बनतात.
  ॐ हा कर्माच्या प्रारंभात, अंधारात दीपक किंवा वाळवंटात वाट दाखवणार्‍या माहितगारासारखा आहे. आरंभलेल्या कामाला शेवटपर्यंत पोचविण्यात तो मदत करतो. एवढेच नाही तर कर्मात असलेले दोषदेखील तो दूर करतो. कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी ऋषींनी एक युक्ती शोधून काढली आणि युक्ती आहे- ॐची. कर्माच्या आरंभात ‘ॐतत्‌सत्’ म्हटल्यानंतर यज्ञ, दान इत्यादी कर्मे बाधक न बनता मोक्षदायक बनतात.
  ‘ॐ कार निन्दु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः|
  कामदं मोक्षदं चैव ॐ काराय नमो नमः॥
 • समग्र विश्‍व ॐ कारात सामावले जाते. इच्छा सिद्धी व मोक्षप्राप्ती सर्वच ज्यात समाविष्ट होते- अशा ॐ काराचे योगीजन सतत ध्यान करतात.
  ॐकार साधना चांगली, उपयुक्त आहे. पण शास्त्रकार काय सांगतात ते बघणे अत्यावश्यक आहे.
 • ॐकाराची उपासना करण्यास योग्य अधिकार हवा.
 • प्राण्यांना विविध ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये आहेत. जगातील दृश्य व श्राव्य विषयाबद्दल संपूर्ण विरक्ति असणे आवश्यक आहे.
 • या संदर्भातील योगसूत्र म्हणजे –
  ‘दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार संज्ञा वैराग्यम्’
 • ज्याने जीवनात द्वंद्वामध्ये संतुलन राखण्याचे शिक्षण घेतले आहे, ज्याची वृत्ती अनासक्त बनलेली आहे, वैराग्यमय बनली आहे तोच ॐ काराच्या उपासनेचा अधिकारी गणला जातो.
  शास्त्रीजी म्हणतात की अनधिकारी माणूस मोठ्या उपासनेच्या नादात पडणे म्हणजे बालमंदिराच्या विद्यार्थ्याने एम.ए.च्या वर्गात शिकण्याचा प्रयत्न करण्याइतका हास्यास्पद आहे. तसेच निस्तेज, लाचार किंवा आसक्तिग्रस्त मनुष्याला ॐ काराच्या उपासनेचा आदेश किंवा उपदेश म्हणजे टायफाईडच्या रुग्णाला बासुंदी पाजण्याएवढे घोर कर्म आहे.

ॐकाराच्या उच्चारण्यात प्रत्येक पैलूंवर फायदे आहेत- शारीरिक, मानसिक भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक. म्हणूनच योगसाधनेत त्याचा उपयोग क्षणोक्षणी दिसतो. तरीपण जाणकारांचे मत असे आहे की तो उपास्य म्हणून सार्वजनिक होऊ शकत नाही. मग ह्यावर उपाय काय?

 • अशा व्यक्तींनी ॐ काराचा जप न करता साकार भगवंताची उपासना करावी. त्यामुळेच विविध मंत्रांचे जप शिकवले जातात-
 • हरि ॐ, * ॐ नमः शिवाय
 • ॐ गं गणपतये नमः|
 • ॐ नमो भगवते वासुदेवाय |
 • यामुळेच ॐ शब्दाच्या उच्चारणाचे फायदे झाले व त्याचबरोबर विविध देवांची सगुणोपासनादेखील त्याचबरोबर झाली.
  पूर्वीच्या काळात फक्त खर्‍या अर्थाने संन्यासी झालेले लोकच ॐकार साधना करीत असत.
  पू. पांडुरंगशास्त्री सांगतात …..
 • ॐ हे अनुभूतीसूचक प्रतीक आहे. ते ओंकाराचे सूचक आहे आणि म्हणून ॐकारद्वारा प्राप्त होणार्‍या उत्तरात आपल्या वृत्तीचे प्रतिबिंब पडते. तसेच आपल्या विचारांचा प्रतिध्वनी ऐकायला मिळतो.
 • भगवंताबद्दल विविध प्रश्‍नांची उत्तरे ॐकार देतो. तो निराश झालेल्याला हिम्मत देतो आणि उतावीळ बनलेल्याला साधना व तपश्‍चर्येचे महत्त्व समजावतो.
 • ॐकार आपल्याला वेडा आशावाद व दुर्बळ निराशावाद ह्यांच्यात संतुलन राखायला शिकवतो.
  पू. शास्त्रीजी छान सारांश नमूद करतात….
 • ॐकार परब्रह्माचे प्रतीक आहे.
 • ब्रह्मविद्येचा समग्र अर्थ ॐकारात संकलित झालेला आहे. म्हणून…
 • तीन मात्रांनी समग्र सृष्टीला सामावून घेतो.
 • उरलेल्या अर्ध्या मात्रेने सृष्टिकार्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो.
 • तो आसक्तीचे भरतवाक्य तर अनासक्तीची नांदी आहे.
 • तो प्राण, वेद व परब्रह्म यांचे तेजःपुंज असे प्रतीक आहे.
  शेवटी समापनाच्या वेळी त्यांचे शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण व ज्ञानपूर्ण आहेत –
 • ॐकाराला जर त्याच्या खर्‍या अर्थात आत्मसात करून घेतले तर विश्‍वंभर स्वतः आपल्या हृदयांगणात येऊन खेळू लागेल. म्हणूनच उपनिषदांनी उद्घोष केला आहे-
  ‘ओंकारप्रभवा देवा ओंकारप्रभवा स्वराः |
  ओंकारप्रभवं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् |’
 • सूक्ष्म विचार व चिंतन केले तर सहज लक्षात येईल की ओंकाराची कल्पनाच किती भावपूर्ण व हृदयगम्य आहे. विश्‍वाचे व प्रत्येक मनुष्य आत्म्याचे कल्याण साधण्याची शक्ती व क्षमता त्याच्यात आहे,
  प्रत्येकाला गरज आहे ती त्यामागचे तत्त्वज्ञान समजून घेणे व आचरणात आणणे.
  आपल्या पूर्वजांना हे सर्व माहीत होते. म्हणून त्यांनी विविध कर्मकांडात ॐकाराचा समावेश केला.
  १. लहान बाळाला बाहेरचे जेवण – पहिल्यांदा देण्याआधी त्याच्या जिभेवर ॐ अक्षर मधाने काढणे, कानात ॐ हळू म्हणणे.
  २. बालपणी शाळेत घालण्याआधी गणेशपूजा व सरस्वतीपूजन करून मुलाच्या पाटीवर ॐ लिहायचा – तोच सर्वप्रथम शब्द असायचा.
  ३. उपनयन संस्कारावेळी वडील बटूला गायत्री मंत्र सांगतात, त्याची सुरुवातच ॐ ने होते.
  ४. मृत्युच्यावेळीदेखील ॐचे चिंतन सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला सांगतात –
  ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् |
  यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् (गीता ८.१३)
 • जो पुरुष ॐ या एका अक्षररूप ब्रह्माचे उच्चारण करील आणि त्याचे अर्थस्वरूप माझे चिंतन करीत शरीराला सोडून जातो तो पुरुष परमगतीप्रत पावतो – म्हणजे परमगतीला प्राप्त होतो.
  तर असा हा ॐकाराचा उच्च महिमा. मला आशा व खात्री आहे की सर्व योगसाधक जे नियमित शास्त्रशुद्ध योगसाधना करतात त्यांना ॐबद्दलची ही सर्व माहिती अत्यंत लाभप्रद ठरेल. तसेच आत्मकल्याणासाठी ते तिचा उपयोग करतील व इतरांनादेखील समजावतील.
  वैदिकांची घोषणाच आहे –
  ‘‘कृण्वन्तो विश्‍वं आयर्ंं’’
  (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित – ‘संस्कृती पूजन’)

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

कोरोना लसीकरण घ्यावे का?

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज) या एका वर्षात संशोधकांनी कठोर मेहनतीने कोरोनावर लस बनवली; मात्र आज कोरोना लसीकरण जगभरात...

थर्टीन

लेख- १३ बायोस्कोप प्रा. रमेश सप्रे ‘थर्टीन’ शब्दाचेही दोन पैलू आहेत. शुभ नि अशुभ! आपण अशुभ...

अनासक्तीचा आदर्श ः ‘कमळ’

योगसाधना - ५००अंतरंग योग - ८५ डॉ. सीताकांत घाणेकर शास्त्रीजी कमळाबद्दल सारांश करताना म्हणतात- कमळ...

क्षयरोग्यांनाही लसीकरण उपयुक्त

डॉ. प्रदीप महाजन (रिजनरेटिव्ह मेडिसिन रिसर्चर) या लसींमध्ये सक्रिय व्हायरस नसतो ज्यामुळे एखाद्याला रोगाचा त्रास होईल किंवा आरोग्य...

उन्हाळ्यात त्वचेची काळजी

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सूर्याच्या प्रखर उष्णतेने शरीराचा ओलावा कमी होतो, घामावाटे, मूत्रावाटे व काही प्रमाणात मलावाटे शरीरातून...