उच्च न्यायालयाची दहावीच्या परीक्षेस मान्यता

0
269

>> २९ केंद्रे, १७३ उपकेंद्रांवर आजपासून परीक्षेस प्रारंभ

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा शालान्त आणि माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यातील दहावीच्या गुरुवार २१ मेपासून सुरू होणार्‍या परीक्षेला काल मान्यता दिली आहे. राज्य सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्रालयाने दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यास मान्यता देणार्‍या आदेशाची प्रत गोवा खंडपीठात सादर केल्यानंतर न्यायालयाने दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सामाजिक अंतर, सॅनिटायझर्स व इतर सुरक्षा सुविधा उपलब्ध करण्यासंबंधी केलेल्या सूचनांचे पालन केले जात आहे, अशी माहिती सरकारतर्फे न्यायालयात देण्यात आली.

राज्यातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गोवा खंडपीठात दहावीची परीक्षा रद्द करण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाचा परीक्षा घेण्यास मान्यता देणारा आदेश सादर करण्याचा आदेश दिला होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने गोव्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेला मान्यता देणारा आदेश काल बुधवार दि. २० मे रोजी जारी केला. सदर आदेशाची प्रत न्यायालयात सादर करण्यात आली. न्यायालयात परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याची मागणी करणार्‍या जोड याचिका दाखल केल्या होत्या. सरकारकडून दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षेला हजर राहणार्‍या मुलांच्या आरोग्य व सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या दहावीच्या परीक्षेबाबतच्या निर्णयाचे स्वागत केले. न्यायालयाच्या निवाड्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दहावीची परीक्षा घेण्यास मान्यता दिल्याने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने परीक्षा घेण्यास मान्यता देऊन याचिका निकालात काढल्या आहेत. न्यायालयाचा निवाडा विद्यार्थ्यांच्या हितार्थ आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करण्यात आला, अशी माहिती ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

सुरक्षा उपाययोजना
बारावीच्या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजना प्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रावर सुरक्षा उपाय योजना राबविण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांमध्ये स्वच्छता करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर मुलांनी सामाजिक अंतर राखण्यासाठी व्यवस्था केली आहे. मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच, सॅनिटायझर्स उपलब्ध करण्यात येणार आहे, असेही ऍड. पांगम यांनी सांगितले.

२९ केंद्रे, १७३ उपकेंद्रे

दहावीच्या परीक्षेसाठी २९ केंद्र आणि १७३ उपकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सीमाभागात ४ आणि कर्नाटकात सीमाभागात २ परीक्षा केंद्रांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची थर्मल गन तपासणी केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेला बसू शकत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी नंतर परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षासुद्धा प्रथम परीक्षा म्हणून ग्राह्य मानली जाणार आहे, अशी माहिती गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

१९ हजार ६८०विद्यार्थी
या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी १९ हजार ६८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोविड विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर राखण्यासाठी परीक्षा केंद्रांत वाढ करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रे सर्वत्र उपलब्ध करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्थेची समस्या भेडसावणार नाही. शाळांच्या बालरथांचा मुलांना परीक्षा केंद्रावर आणण्यासाठी वापर केला जाणार आहे. वाहतूक खात्याला पत्र पाठवून वाहतूक व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सीमाभागातील भेडशी, आयी, सातार्डा आणि आरोंदा येथे परीक्षा उपकेंद्रे तयार केली आहेत. कर्नाटकातील सीमावर्ती भागातील चोर्ला- खानापूर, कारवार या ठिकाणी परीक्षा उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहे, असेही सामंत यांनी सांगितले.
परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे आगमन झाल्यानंतर प्रथम थर्मल गनद्वारे तपासणी केली जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी खास वर्गात बसविण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राची स्वच्छता करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापर करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर्स उपलब्ध केला जाणार आहे. तसेच सामाजिक अंतराचे पालन व्हावे म्हणून खास स्वयंसेवकांची नियुक्ती प्रत्येक केंद्रावर करण्यात आलेली आहे, असेही सामंत यांनी सांगितले.