>> ‘स्वयंपूर्ण गोवा’च्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांची घोषणा; विविध सरकारी खात्यांची उपहारगृहे महिला बचत गटांना देणार
राज्य सरकारचा ‘स्वयंपूर्ण ई-चवथ बाजार’ यशस्वी झाला आहे. आता, येत्या दसऱ्यापासून ‘स्वयंपूर्ण ई-बाजार’ सुरू करण्यात येणार आहे. तसेच, ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ येत्या नोव्हेंबरपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमाच्या तृतीय वर्षपूर्तीनिमित्त आभासी पद्धतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना काल केली.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा सर्व नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी स्वयंपूर्ण गोवा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील भाजी, दूध व इतर उत्पादनांमध्ये वाढ झाली आहे. अंत्योदय, ग्रामोदय आणि सर्वोदय हा स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘ई-चवथ बाजार’मुळे अनेक महिलांना, स्वयंसहाय्य गटांना त्यांनी तयार केलेली उत्पादने ऑनलाइन पद्धतीने विक्रीची संधी प्राप्त झाली. या ई-बाजार उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आता कायमस्वरूपी स्वयंपूर्ण ई-बाजार सुरू करण्यात येत आहे. यामध्ये खाद्यपदार्थांसोबत अन्य वस्तूंच्या विक्रीची सुविधा दिली जाणार आहे. नागरी सेवा केंद्र (सीएससी) आणि ग्रामीण मित्र यांच्या सहकार्यातून हा ई-बाजार सुरू केला जाणार आहे. या ई बाजारामुळे राज्यातील ग्रामीण भागातील एखादे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन संपूर्ण राज्यात नव्हे, तर देशभरात विकता येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्वयंपूर्ण ई-बाजारासाठी नोंदणी, प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 230 ग्रामीण मित्रांची मदत घेतली जात आहे. त्यांच्या गावातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन किंवा हस्तकला शोधून काढणे व त्याला बाजार उपलब्ध करून देणे यासाठी देखील ग्रामीण मित्रांची मदत घेतली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ सुरू केली जात असून, ही योजना येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. या योजनेखाली महिला बचत गटांना सरकारी खाती, महामंडळ, सरकारी संस्थांतील उपहारगृहे चालवण्यास देण्यात येणार आहेत. त्यासाठी उपहारगृहांचे भाडे देखील 1 हजार रुपये इतके कमी ठेवण्यात आले आहे. महिला गटांनी उपहारगृहांतून दर्जेदार अन्नपदार्थ पुरवले पाहिजेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान विश्वकर्मा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेखाली 18 पारंपरिक व्यावसायिकांना आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पारंपरिक व्यावसायिकांनी नागरी सेवा केंद्राच्या माध्यमातून नोंदणी करून घ्यावी. नोंदणी करण्यात येणाऱ्या पारंपरिक व्यावसायिकांसाठी पाच दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना अंदाजे 15 हजार रुपये किमतीचे टूलकीट मोफत दिले जाणार आहे. तसेच 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कमी व्याज दरात उपलब्ध केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी नियोजन खात्याचे संचालक विजय सक्सेना, आरडीएचे संचालक भूषण सावईकर व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘स्वयंपूर्ण मित्र’ या पोर्टलचा शुभारंभ केला.
अन्नपूर्णा योजना अधिसूचित
राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अधिसूचित केली आहे. या योजनेखाली सरकारी खाती, महामंडळे, स्वायत्त संस्थांमधील उपहारगृहे (कॅन्टीन) महिला बचत गटांना चालविण्यासाठी माफक भाडेदरात भाडेपट्टीवर दिली जाणार आहेत.
ग्रामीण विकास यंत्रणेने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. महिला बचत गटांना शहरी भागात उपहारगृहे चालविण्यासाठी 20 रुपये प्रति चौरस मीटर आणि ग्रामीण भागात उपहारगृह चालविण्यासाठी 10 रुपये प्रति चौरस मीटर भाडे आकारले जाणार आहे. उपगृहारगृहाचे वीज व पाण्याचे बिल मात्र महिला बचत गटाला फेडावे लागणार आहे. राज्यात ग्रामीण विकास यंत्रणा आणि नगरपालिका प्रशासन यांच्याकडे नोंदणी केलेले सुमारे 4 हजार महिला बचत गट आहेत. राज्य सरकारची विविध खाती, महामंडळे, स्वायत्त संस्थांनी उपहारगृहे चालविण्यासाठी उपलब्ध जागेची माहिती ग्रामीण विकास खात्याला द्यायला हवी. त्यानंतर उपहारगृहासाठी उपलब्ध जागेची यादी होईल. त्यानंतर महिला बचत गटांना उपहारगृहांसाठी अर्ज करावे लागणार आहेत.