आर्थिक विकास महामंडळाला २०१६-१७ ह्या आर्थिक वर्षी विक्र’ी ६१.२६ कोटी रुपये एवढा नफा झाल्याची माहिती चेअरमन सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाला सदर आर्थिक वर्षी १०२.७३ कोटी रुपये एवढा महसूल प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाचा नफा जास्त आहे. गेल्या वर्षी ४८ कोटी रुपये एवढा नफा झाला होता, अशी माहितीही कुंकळयेंकर यांनी दिली.
२०१६-१७ ह्या आर्थिक वर्षी ईडीसीने २३९.९२ कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली आणि सदर वर्षी २०० कोटी रुपय वसूल केले. वसूल व्हायच्या कर्जाचा रक्कम ८४१.१९ कोटी रुपये एवढी आहे. महामंडळाने एनपीए बराच खाली आणला असून एकूण एनपीए आता २.९३ टक्के एवढा शिल्लक राहिला असून निव्वळ एनपीए १.२८ टक्के एवढा असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागांतील जे युवक उद्योग सुरू करू पाहत आहेत त्यांना ईडीसी विशेष सवलती देत असून त्यांना ९ टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येत असल्याचे कुंकळयेकर यांनी नमूद केले. मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली ईडीसी प्रती दिन दोन उद्योजक निर्माण करीत असल्याची माहिती यावेळी कुंकळयेकर यांनी दिली. दरम्यान, ईसीडी, ईसीडी इमारतीमध्ये एक इनक्युबेशन सेंटर सुरू करणार असून ते व्यापारी केंद्रही असेल. गोव्यातील युवा उद्योजकांना स्टार्टअप कंपन्या सुरू करण्यासाठी ह्या केंद्राचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जीएसटीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
ईडीसीने नुकताच जीएसटीसाठीचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. ६०० अर्जदारांनी त्याचा लाभ घेतल्याचे कुंकळयेकर म्हणाले. ईडीसीच्या संचालक मंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कुंकळयेकर यांनी वरील माहिती दिली. ह्या वेळी ईडीसीचे उपाध्यक्ष संतोष केंकरे तसेच अन्य संचालक डॉ. पुरुषोत्तम पेडणेकर, राल्फ डिसोझा, सुरेंद्र वेर्णेकर, ऍड. शिवप्रसाद मणेरीकर, संदीप भंडारी, ललिता हरिया आफान्सो आदी हजर होते.

