ईएचएन नोंदणी असलेल्या घरांना वीजजोडणी नाही

0
20

वीज खात्याकडून परिपत्रक जारी

वीज खात्याकडून राज्यात ईएचएन नोंदणी क्रमांक असलेल्या घरांना वीज जोडणी दिली जाणार नाही. तसेच, राज्यातील बेकायदा बांधकामांना वीज कनेक्शन दिले जाणार नाही. वीज खात्याकडून वीज कनेक्शनबाबत सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले असून नवीन वीज जोडणीसाठी बांधकाम परवाना, तांत्रिक मंजुरी प्रमाणपत्र विचारात घेण्यात येणार आहे, असे वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गेल्या 6 मार्च 2025 रोजी दिलेल्या निर्देशानंतर वीज खात्याने नवीन वीज जोडणीसंबंधी सुधारित परिपत्रक गेल्या 30 सप्टेंबर 2025 रोजी जारी केले आहे. ग्रामपंचायत, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून बेकायदा घरांकडून कर वसुलीसाठी ईएचएन नोंदणी क्रमांक दिला जातो. त्या घरांना कायदेशीर मान्यता नसते. त्यामुळे वीज खात्याकडून यापुढे ईएचएन क्रमांक असलेल्या घरांना वीज कनेक्शन दिले जाणार नाही, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या सूचनेनुसार वीज खात्याकडून ईएचएन क्रमांक असलेल्या घरांना वीज जोडणी दिली जात होती. आता, न्यायालयाच्या निर्देशामुळे यापूर्वी ईएचएन नोंदणी क्रमांक असलेल्या घरांना वीज जोडणी दिली जाणार नाही. नवीन वीज जोडणीसाठी बांधकाम परवाना, तांत्रिक मंजुरी प्रमाणपत्र विचारात घेतले जाणार आहे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. वीज खात्याच्या सर्व विभागाने वीज जोडणीसाठी नवीन निर्देशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.