इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या योजनेपासून आपल्याला असलेला धोका नष्ट करण्यासाठी इस्रायलने त्या देशाच्या डझनभर आण्विक आणि लष्करी तळांवर बॉम्बहल्ले चढवून एका नव्या संघर्षाला तोंड फोडले आहे. इस्रायलच्या ह्या धडक कारवाईत इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीच्या योजनेला खीळ बसेल की नाही हे जरी स्पष्ट झालेले नसले, तरी त्याला बराच हादरा नक्कीच बसलेला आहे. केवळ आण्विक ठिकाणांनाच लक्ष्य करून इस्रायल थांबलेला नाही, तर इराणच्या रेव्हल्युशनरी गार्डचे कमांडर हुसेन सलामी आणि इराणचे लष्करप्रमुख महंमद बाघेरी यांच्यासह अनेक महत्त्वाचे लष्करी अधिकारी आणि फरिदुन अब्बासी, महंमद मेहदी तेहरानची आदी अणुशास्त्रज्ञ यांचाही इस्रायलने काटा काढला आहे. अर्थात, ह्या थेट हल्ल्यामुळे, आजवर इस्रायलशी आपल्या हमास, हिज्बुल्ला, हौथी आदी हस्तकांच्या करवी इस्रायलवर हल्ले चढवीत आलेला इराण थेट युद्धात उतरला आहे. अर्थात, दोन्ही देशांतील चकमकींना ह्यापूर्वीच सुरूवात झालेली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये इस्रायलने दोन तीनशे द्रोन इस्रायलवर पाठवले होते. त्याचा सूड मग बॉम्बहल्ले करून इस्रायलने उगवला होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली होती, त्यालाही इस्रायलने कडवे प्रत्युत्तर दिले होते. मात्र, तरीही हा संघर्ष थेट झडण्याऐवजी अप्रत्यक्ष स्वरूपाचाच अधिक होता. इस्रायलवर हमासने चढवलेल्या हल्ल्यानंतर इराणचा त्यांना असलेला पाठिंबा अधोरेखित झाला होता. नंतर हिज्बुल्ला त्या संघर्षात उतरले, त्यांनाही इराणचाच पाठिंबा होता. इराणबरोबरच सिरिया, लेबनॉन, येमेन आणि गाझामधून इस्रायलवर हल्ले चढवले गेले, त्या सर्वांचा इस्रायल मुकाबला करीत आला. मात्र, इराणने सध्या आपल्या अण्वस्त्रनिर्मितीच्या योजनेला चालना दिल्याचे पाहून इस्रायल चिंतित झाला होता. 2003 साली अमेरिकेच्या दबावाखाली इराणने आपला अणू कार्यक्रम स्थगित करण्याची घोषणा केली व उभय देशांत अणूकरारासंबंधी वाटाघाटी सुरू झाल्या. मात्र, डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी येताच त्यांनी इराणशी अणूकरारातून अमेरिकेचे अंग काढून घेतले. तेव्हापासून इराणने आपल्या आण्विक शस्त्रास्त्र निर्मितीच्या कामाचा वेग वाढवल्याची शक्यता व्यक्त होत होती. युरेनियम नव्वद टक्क्यांहून अधिक शुद्ध असेल तर त्यांचा अण्वस्त्रांत वापर होऊ शकतो. सध्या इराणने साठ टक्क्यांपर्यंतचे उद्दिष्ट गाठल्याची माहिती इस्रायलला मिळाली होती. इराण सध्याच्या आण्विक क्षमतेच्या मदतीने पंधरा अण्वस्त्रे तयार करू शकतो असे इस्रायलचे म्हणणे होते. त्यामुळे आपल्या अस्तित्वापुढील हा संभाव्य आण्विक धोका नष्ट करण्यासाठी इस्रायलने हे हल्ले चढवले. अमेरिका आणि इराणदरम्यान ओमानमध्ये चर्चेची फेरी होण्याआधी आणि ट्रम्प यांनी गेल्या एप्रिलमध्ये इराणला दिलेली साठ दिवसांची मुदत संपताक्षणी एकसष्टाव्या दिवशी इस्रायलने हे हल्ले चढवले हे लक्षात घेण्याजोगे आहे. भले अमेरिकेने ह्या हल्ल्यात आपला हात नसल्याचे सांगत अंग काढून घेतले असले, तरी दोन्हींचा इराण हा शत्रू आहे हे लक्षात घेता अमेरिकेचे छुपे पाठबळ इस्रायलला असू शकते. हल्ला चढवण्यापूर्वी इस्रायलने इराणला कसे गाफील ठेवले तेही पाहण्यासारखे आहे. गाझावर चर्चेसाठी मंत्रिमंडळ बैठक बोलावत असल्याचा बहाणा करून इराणवरील हल्ल्याला मंत्रिमंडळ मंजुरी घेतली गेली. बेंजमीन नेतन्याहू सुट्टीवर जाणार असल्याची हूल वर्तमानपत्रांतून उठवण्यात आली आणि हे धाडसी हल्ले झाले. आपली असंख्य लढाऊ विमाने इस्रायलने पाठवून ठिकठिकाणी इराणचे आण्विक व लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत, इतकेच नव्हे, तर इराणच्या लष्कराच्या मुख्यालयावरही बॉम्बहल्ला झाला. हवाई हल्ल्यांच्या जोडीने इस्रायलच्या सुप्रसिद्ध मोसादने खुद्द इराणमध्ये ह्या मोहिमेस हातभार लावला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाच वर्षांपूर्वी इस्रायलने इराणी अणुशास्त्रज्ञाची दूरनियंत्रित बंदुकीतून गोळी घालून हत्या केली होती. त्याआधी एकदा इराणचा थांगपत्ताही लागू न देता असंख्य गोपनीय कागदपत्रे पळवून आपल्या देशी आणली होती. इस्रायल काय करील सांगता येत नाही, कारण त्याचे अस्तित्वच पणाला लागलेले आहे. ताज्या हल्ल्यानंतर इराणने त्याला प्रत्युत्तरादाखल आपली शेकडो द्रोन इस्रायलच्या दिशेने रवाना केली. ह्या सगळ्यातून मध्य पूर्वेमध्ये प्रादेशिक संघर्ष पुन्हा जोर धरील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. अरब देशांची ह्या संदर्भात काय भूमिका असेल हे पाहावे लागेल. इस्रायलच्या हल्ल्यानंतर कच्चे तेल आणि सोने महागले आहे. हा संघर्ष थेट युद्धामध्ये रूपांतरित झाला तर त्याची मोठी झळ संपूर्ण जगाला बसेल. त्यामुळे हा संघर्ष युद्धाचे रूप घेतो की निवळतो ह्याकडे जगाचे लक्ष आहे.