इस्पितळात दाखल होणार्‍यांचा आकडा वाढतोय

0
2

>> २४ तासांत तब्बल १०६ कोरोना रुग्ण इस्पितळात दाखल; आणखी ८ बळींची नोंद

कोविडमुळे काल राज्यात आणखी ८ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३६२३ वर गेली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत नव्या १७९४ कोरोना रग्णांची संख्या भर पडली असून, सक्रिय रुग्णसंख्या आता १८१९७ एवढी झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तब्बल १०६ कोरोनाबाधितांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले.
गेल्या २४ तासांत ५५९७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील १७९४ नमुने बाधित आढळून आले. गेल्या २४ तासांत कोविड मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही २५२२ एवढी असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९०.६२ टक्के एवढे आहे. गेल्या २४ तासांत बरे झालेल्या ५५ रुग्णांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. गृहविलगीकरणात असलेल्या नव्या रुग्णांची संख्या ही १६०८ एवढी आहे, तर इस्पितळात भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही १०६ एवढी आहे. आतापर्यंत राज्यात सापडलेल्या कोविड रुग्णांची संख्या ही २३२६१९ एवढी आहे, तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही २१०७९९ एवढी आहे.

देशात नवे कोरोना रुग्ण तीन लाखांच्या खाली

मागच्या काही दिवसांपासून देशात सातत्याने ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळत होते; परंतु गेल्या २४ तासांत देशातील रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. देशात अनेक दिवसांनी ३ लाखांपेक्षा कमी बाधित आढळले आहेत. सोमवारी देशभरात २ लाख ५५ हजार ८७४ रुग्ण आढळले आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी ५० हजार १९० कमी बाधितांची नोंद करण्यात आली. याशिवाय सोमवारी ६१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनातून २ लाख ६७ हजार ७५३ जण बरे देखील झाले आहेत. देशात सध्या २२ लाख ३६ हजार ८४२ सक्रिय रुग्ण उपचाराधीन असून, दैनंदिन संक्रमण दर १५.५२ टक्क्यांवर आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९३.१५ टक्के आहे.