इराण-इस्रायलकडून युद्धविरामाचे उल्लंघन; हल्ले सुरुच

0
20

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी अयशस्वी

इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पहाटे 3.32 वाजता केली; मात्र काही तासांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. इराणने तेव अवीव आणि बेअरशेबा शहरावर नव्याने 6 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. यानंतर इस्रायलने देखील तेहरानजवळील इराणी रडार साइटवर हवाई हल्ला केला. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

पश्चिम आशियातील दोन देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष तब्बल 12 दिवसानंतर संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल पहाटे केली होती. इस्त्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचे त्यांनी म्हटले होते; मात्र युद्धविराम झाल्यानंतरही इस्त्रायलमध्ये स्फोटांचे आवाज आणि सायरनचे आवाज ऐकू येत होते. कारण इराणने इस्रायलवर चार हल्ले केल्यानंतर युद्धविरामाची घोषणा केली. इराणच्या या हल्ल्यात दक्षिण इस्त्रायलमधील किमान चार जण ठार झाल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान अनेक इस्त्रायली शहरांमध्ये सायरनचा आवज घुमला. त्यामुळे तेल अवीव येथील नागरिकांना पुन्हा एकदा बॉम्ब शेल्टरमध्ये आश्रय घ्यावा लागला.

यानंतर क्षेपणास्त्र हल्ले करुन इराणकडून युद्धविरामाचे उल्लंघन करण्यात आल्याचे इस्त्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी तेहरानवरील हल्ले पुन्हा सुरू करण्याचे आदेश सैन्याला दिले.
असे असले तरी इराणने हा दावा फेटाळून लावला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी युद्धविराम लागू झाल्यानंतर इस्रायलवर कोणतेही क्षेपणास्त्र डागले गेले नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल व इराण यांच्यात शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली होती. मी दोन्ही देशांशी चर्चा केली आणि दोन्ही देशांनी यासाठी सहमती दर्शवली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
तत्पूर्वी, इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी संघर्ष थांबवण्यास सहमती दर्शवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांचे कौतुक केले. हे असे युद्ध आहे जे अनेक वर्ष चालू शकले असते आणि यामुळे संपूर्ण मध्य पूर्व नष्ट झाले असते, पण तसे झाले नाही आणि कधीही होणार नाही, असे ट्रम्प म्हणाले होते. राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कतारने मध्यस्थी केलेल्या आणि अमेरिकेने मांडलेल्या प्रस्तावावर इराणने सहमती दर्शवली.
इराणने युद्धविरामाचा दावा फेटाळला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रविराम झाल्याची घोषणा केली होती; मात्र इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळण्यात आला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रविराम झाल्याचा दावा फेटाळला. सध्या असा कोणताही करार झालेला नाही, असे अराघची यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचा भंग करणाऱ्या इराण आणि इस्त्रायलवर नाराजी व्यक्त केली आहे. नाटो शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी निघण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी इस्त्रायलच्या भूमिकेवर नाराज असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. युद्धविराम जाहीर झाल्यानंतर इस्त्रायलने मोठे हल्ले करायला नको होते, असे ट्रम्प म्हणाले.

इस्रायलवर डोनाल्ड ट्रम्प नाराज
डोनाल्ट ट्रम्प नाराज डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून माध्यमांशी बोलताना या संपूर्ण घटनेवर नाराजी व्यक्त केली. युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर इस्रायलने इराणवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप केला होता. इराणने त्यापूर्वीच आपण हल्ला केला होता, असे सांगत हे आरोप फेटाळले होते. यानंतर इस्रायलने देखील इराणवर हल्ले चढविले आहेत. यामुळे आता ट्रम्प भडकले आहेत. इराणवर मी खूश नाहीय; पण इस्रायलवर खूप नाराज असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

इराण कधीही शरणागती पत्करत नाही : खामेनी
इराणची जनता आणि इराणचा इतिहास ज्यांना ठाऊक आहे त्यांना हे देखील ठाऊक आहे की इराण कधीही शरणागती पत्करत नाही. शरणागती पत्करणे हा आमच्या देशाचा स्वभावच नाही, अशी पोस्ट इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी केली आहे.

हल्ले थांबवू शकत नाही : नेतन्याहू
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने तेहरानजवळील इराणी रडार साइटवर हवाई हल्ला केल्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. हल्ला थांबवू शकत नाही. इराणच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून काहीतरी करणे आवश्यक आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले आहे.