पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता; जहाजांवरील हल्ल्यांनंतर अमेरिकेकडून इराणमधील 80 ठिकाणे लक्ष्य
अमेरिका आणि इराणमधील युद्ध तीन महिन्यांच्या कालावधीनंतर जूनमध्ये थांबले होते. दोन्ही देशांत युद्धविरामाची घोषणा देखील झाली होती. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव हळूहळू कमी होत असतानाच अचानक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इराणबरोबरचा युद्धविरामाचा हंगामी करार संपुष्टात आल्याची घोषणा केली. इराणने दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे अमेरिका बुधवारी मध्यरात्री इराणवर पुन्हा हल्ला करेल, असा धमकीवजा इशारा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दिला. त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, मंगळवारी रात्री उशिरा अमेरिकेने इराणमधील 80 ठिकाणांना लक्ष्य केले. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने बहारिन व कुवैतवर हल्ले केले.
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन व्यावसायिक तेलवाहू जहाजांवर इराणने मंगळवारी हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिकेने इराणवर जोरदार हवाई हल्ले केले. अमेरिकेने 80 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी झालेला सामंजस्य करार संपल्याची घोषणा केली. त्यामुळे पश्चिम आशियात अमेरिका-इराण यांच्यातील तणाव विकोपाला पोहोचला आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन व्यावसायिक तेलवाहू जहाजांवर हल्ला करून इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले, असा आरोप ट्रम्प यांनी टर्कीत सुरू असलेल्या ‘नाटो’ परिषदेत काल केला. इराणच्या नेतृत्वाला त्यांनी खोटे, फसवणूक करणारे आणि कमकुवत म्हटले आहे. इराणशी आपल्याला कोणतीही चर्चा करायची नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराणशी झालेल्या कराराच्या भवितव्याबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले की, मला वाटते आता तो संपलाय. इराण आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. इराणशी वाटाघाटी करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणने जहाजांवर केलेले हल्ले, म्हणजे युद्धविरामाच्या कराराचे उल्लंघन आहे. इराण सध्या जे काही करत आहे, त्याबद्दल मी समाधानी नाही. हा विषय सत्तापालटाचा नाही. मात्र, इराणला अणुशस्त्र मिळावे, अशी आमची अजिबात इच्छा नाही. इराणबरोबरच्या आमच्या करारानुसार, त्यांनी त्यांचा अणुकार्यक्रम थांबवणे आवश्यक आहे, अन्यथा आम्ही स्वतः तो थांबवू, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, इराणबरोबरचा तात्पुरता ‘युद्धविराम करार’ आता अधिकृतपणे संपला आहे; पण युद्धविराम कराराविषयी चर्चा सुरू ठेवण्यास ट्रम्प यांनी संमती दिली.
इराणची प्रतिक्रिया काय?
अमेरिकेच्या हल्ल्यांचा इराणने निषेध केला. इराणचे सशस्त्र सैन्य अमेरिकेच्या या आक्रमकपणाला आणि दहशतवादी कृत्याला जोरदार प्रत्युत्तर देईल, असा इशारा इराणच्या टॉप जॉइंट मिलिटरी कमांड, खतम-अल-अनबियाने दिला. होर्मुझ सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात कोणताही हस्तक्षेप सहन करणार नाही, असा इशाराही इराणने दिला. अमेरिकेने इस्लामाबादमध्ये झालेल्या सामंजस्य करारातील कलमांचे उल्लंघन केल्याचे इराणचे उपपरराष्ट्र मंत्री घरीबाबादी म्हणाले.
अमेरिकेचे 80 हून अधिक ठिकाणांवर हल्ले!
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने काल सकाळी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन हवाई दलाने इराणमधील तब्बल 80 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्याला हे चोख आणि तातडीचे प्रत्युत्तर असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेकडून इराणच्या यंत्रणा उद्ध्वस्त
इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार केंद्रे.
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस्’च्या 60 लढाऊ नौका.
क्षेपणास्त्र डागण्याची केंद्रे आणि लष्करी नियंत्रण कक्ष.
इराणची आर्थिक नाकेबंदी
लष्करी कारवाईसोबतच अमेरिकेने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने इराणला तेल विक्रीसाठी दिलेला विशेष परवाना तडकाफडकी रद्द केला आहे, ज्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
इराणचेही अमेरिकेला प्रत्युत्तर
अमेरिकेच्या या भीषण हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या 85 लष्करी तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा संयुक्त मारा केला. इराणने बहरीनमधील अमेरिकेचा पाचवा नौदल विभाग आणि कुवेतमधील ‘अली अल सालेम’ या हवाई तळावर थेट हल्ला केल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर, या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणारे अमेरिकेचे हायटेक ड्रोन देखील पाडल्याचा दावा इराणने केला आहे.

