समारोप सोहळा आज संध्याकाळी ४ वा. सुरू होणार असून तो कांपाल येथील फुटबॉल मैदानावर उभारण्यात आलेल्या शामियान्यात संपन्न होणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यावेळी एका चित्रपटाला १० लाख रु.चा विशेष पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी इफ्फीतील ‘सिनेमा ऑफ धी वर्ल्ड’, ‘इंडिएन पॅनोरमा व स्पर्धा विभाग या तीन विभागातील प्रत्येकी तीन चित्रपट मिळून ९ चित्रपटांचे त्यासाठी नामांकन झाले असल्याचे इफ्फीचे संचालक शंकर मोहन यानी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बुध्ददेव दासगुप्ता, गौतम घोष व किश्वर देसाई यानी या चित्रपटांची निवड केली असल्याचे ते म्हणाले. यावेळी स्पर्धा गटातील उत्कृष्ट चित्रपटांना सोनेरी मयुर व रौप्य मयुर देण्यात येणार आहे. त्याशिवाय अन्य पुरस्कारही प्रदान करण्यात येतील.
नंदमुरी बालकृष्णन प्रमुख पाहुणे
ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक कॉल्स सन्माननीय पाहुणे
सर्वोत्कृष्ट चित्रपटास मिळणार सुवर्ण मयूर
दोन वर्षात महोत्सव संकुल
पुढील दोन वर्षांत इफ्फीसाठी महोत्सव संकुल उभारण्यात येणार असून ३ हजार लोकांना सामावून घेऊ शकेल असे ते संकुल असेल असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव कृष्णमूर्ती यांनी काल इफ्फीत ओपन फोरममध्ये बोलताना सांगितले.
इफ्फीच्या समारोप सोहळ्यात जास्तीत जास्त इफ्फी प्रतिनिधींना सामावून घेता यावे यासाठीच यावेळी कांपाल येथे भव्य शामियाना उभारण्यात आल्याचे ते म्हणाले. इफ्फीचा दर्जा अजून वाढवण्याची गरज असून त्यासाठी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना कोकणी चित्रपट दिग्दर्शक ज्ञानेश मोघे म्हणाले की, राज्यातील चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांना आर्थिक मदत मिळत असली तरी त्याने काम भागत नसून चित्रपट महोत्सव संचालनालयाने राज्यातील होतकरू चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करायला हवे. इफ्फीतील शॉर्ट फिल्म सेंटर बंद करण्यात आल्याबद्दल त्यानी नाराजी व्यक्त केली. ते परत सुरू करण्याची गरज त्यानी व्यक्त केली.

